वाढत्या प्रदूषणामुळे होऊ शकतो दृष्टीवर परिणाम, या गोष्टींची घ्या काळजी
तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, प्रदूषणात असलेले नायट्रिक ऑक्साइड आणि सल्फर डायऑक्साइड यासारख्या गॅस आणि विषारी पदार्थांचा डोळ्यांशी संपर्क येतो, ज्यामुळे अनेक प्रकारच्या समस्या उदभवू शकतात.
नवी दिल्ली – राजधानी दिल्ली एनसीआरमध्ये प्रदूषणाची पातळी (pollution) सातत्याने वाढत आहे. त्यामुळे लोकांना अनेक प्रकारचा त्रास होत आहे. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, अशा परिस्थितीत लोकांना डोळ्यांचे अनेक (eyes) प्रकारचे आजार होऊ शकतात. डोळ्यांची जळजळ, डोळ्यांतून पाणी येणे आणि डोळे लाल होणे यांसारख्या समस्या होऊ शकतात. ही समस्या तशी छोटी दिसते , पण त्यावर वेळीच उपचार न केल्यास (eye care) दृष्टी गमवावी लागू शकते. अनेक संशोधनातून अशी माहिती समोर आली आहे की वाढत्या प्रदूषणामुळे डोळ्यांमध्ये ग्लूकोमा आणि कंजंक्टिव्हायटिस सारख्या समस्या उद्भवू शकतात.
डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, वाढत्या प्रदूषणामुळे डोळ्यांच्या अनेक पेशींचे नुकसान होऊ शकते, ज्यामुळे डोळे कोरडे होणे, लाल होणे व डोळ्यांत जळजळ होणे असा त्रास सहन करावा लागू शकतो. प्रदूषणात असलेले नायट्रिक ऑक्साइड आणि सल्फर डायऑक्साइड यासारख्या गॅस आणि विषारी पदार्थांचा डोळ्यांशी संपर्क येतो, ज्यामुळे अनेक प्रकारच्या समस्या उदभवू शकतात. WHOच्या संशोधनात असे दिसून आले आहे की वायू प्रदूषणामुळे दृष्टी जाण्याचा धोकाही संभवतो.
नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. अजय कुमार सांगतात की, डोळे हा आपल्या शरीरातील सर्वात संवेदनशील अवयव आहे. डोळ्यांमध्ये सतत होणारी ॲलर्जी आणि डोळे लाल होणे, ही देखील एक गंभीर समस्या बनू शकते. अनेकदा या महिन्यांत प्रदूषण वाढते, त्यामुळे डोळ्यांच्या या सर्व समस्या सुरू होतात. ज्या लोकांना आधीपासूनच काचबिंदू किंवा डोळ्याचे इतर आजार आहेत त्यांनी यावेळी विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. डोळ्यांची ही समस्या वृद्ध आणि मुलांमध्येही दिसून येते, असे डॉ. कुमार सांगतात. अनेकदा लहान मुलं या समस्यांकडे दुर्लक्ष करतात. अशावेळी त्यांच्या पालकांनी मुलांकडे लक्ष देऊन त्यांना सांभाळून घ्यावे, तसेच त्यांना धूळ किंवा मातीत खेळू देऊ नये, हे महत्त्वाचे आहे.
अशी घ्या डोळ्यांची काळजी –
अशावेळी डोळ्यांची विशेष काळजी घ्यावी, असे डॉ. अजय कुमार यांनी स्पष्ट केले. सकाळी उठल्यावर डोळे स्वच्छ धुवावेत. धूळ, धूर आणि प्रदूषणापासून डोळ्यांचे संरक्षण करण्याचा प्रयत्न करावा. तसेच बाहेर जाताना शरीर हायड्रेटेड ठेवावे, दर काही वेळानंतर पापण्या वारंवार उघडाव्यात. खूप प्रदूषण असेल तर पुन्हा पुन्हा घराबाहेर पडू नये. बाहेर जाताना डोळे झाकण्यासाठी चष्मा घालावा. रात्री झोपण्यापूर्वी डोळे पूर्णपणे स्वच्छ करावेत. डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही आयड्रॉप वापरू शकता. जर डोळ्यांना अधिक त्रास होत असेल तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा.