Covid-19 | भारतात पुन्हा कोविडमुळे टेन्शन, किती हजार रुग्ण? किती मृत्यू?
Covid-19 | तीन वर्षांपूर्वी जगात दहशत निर्माण करणाऱ्या कोरोना व्हायरसने पुन्हा एकदा डोक वर काढलं आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. भारतातील या राज्यात कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळून आला आहे. कोरोनामुळे भारतात पुन्हा किती मृत्यू झाले आहेत? रुग्णसंख्या किती आहे? त्या बद्दल जाणून घ्या.
नवी दिल्ली : सन 2020-21 मध्ये कोरोनाने सगळ जग व्यापून टाकल होतं. कोविडमुळे जग ठप्प झालं होतं. Covid-19 ला रोखण्यासाठी जगातील सगळ्याच देशांनी लॉकडाऊनचा मार्ग अवलंबला होता. कारण त्यावेळी लस नसल्याने कोरोनाला रोखण्याचा तोच एक मार्ग होता. कोरोनामुळे जगभरात लाखो मृत्यू झाले. व्यवहार ठप्प झाल्याने लाखो लोक बेरोजगार झाले. 2021 च्या उत्तरार्धात जग कोरोनाच्या धक्क्यातून सावरलं. हळूहळू व्यवहार पूर्वपदावर आला. आता भारतात पुन्हा एकदा कोरोनाचा धोका दिसू लागला आहे. भारतात सध्या सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या 1828 आहे. केरळमध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. केरळमध्येच कोरोनाचा नवीन व्हेरिएंट JN 1 आढळला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या डाटामधून समोर आलेली ही माहिती आहे.
आरोग्य मंत्रालयानुसार, 4.46 कोटी लोक कोरोनामधून बरे झाले आहेत. रिकव्हरीचा राष्ट्रीय रेट 98.81 टक्के आहे. आतापर्यंत 5 लाख 33 हजार 317 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. मंत्रालयाच्या वेबसाइटवरील माहितीनुसार, 220.67 कोटी लोकांना आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लसीचे डोस देण्यात आले आहेत. रविवारी कोरोनाच्या 335 रुग्णांची नोंद झाली. कोरोनामुळे एकूण पाच मृत्यू झाले आहेत. केरळमध्ये चार आणि उत्तर प्रदेशमध्ये एका व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झालाय.
नवीन व्हेरिएंट कधी आढळला?
नियमित तपासणी सुरु असताना एका 79 वर्षीय वृद्ध महिलेच्या शरीरात कोविड-19 चा JN1हा व्हेरिएंट सापडला. RT-PCR टेस्टमध्ये या महिलेला कोविडची बाधा झाल्याच आढळून आलं. कोविड 19 चा नवीन व्हेरिएट आढळला असला, तरी चिंता करण्याची गरज नाही, असं केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी म्हटलं आहे. अनेक महिन्यांपूर्वी सिंगापूर एअरपोर्टवर एका भारतीय प्रवाशाच्या शरीरात हा व्हेरिएंट आढळून आला होता, असं त्यांनी मीडियाशी बोलताना सांगितलं.