Washim Corona Updates : वाशिममध्ये 229 विद्यार्थ्यांना कोरोना, प्रशासन खडबडून जागं
Maharashtra Washim Corona Updates : कोरोनाबाधित विद्यार्थ्यांना योग्य उपचार मिळण्यासाठी आरोग्य विभागकडून दोन डॉक्टरांसह दोन आरोग्य पथके आळीपाळीने 24 तास निवासी शाळेमध्ये तैनात
वाशिम : वाशिम जिल्ह्याच्या रिसोड तालुक्यातील देगावमधील निवासी शाळेतील चार शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि वसतिगृहात राहणारे 229 विद्यार्थी दोन दिवसात कोरोनाबाधित (Washim School Students Corona Positive) आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी तातडीने निवासी शाळेला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच कोरोनाबाधित विद्यार्थ्यांना योग्य उपचार आणि इतर आवश्यक सुविधा पुरवण्याबाबत सूचना केल्या. (Maharashtra Washim Corona Updates 229 Residential School Students Teachers tested COVID Positive)
प्रशासनाकडून काय काय खबरदारी?
या सर्व कार्यवाहीवर देखरेख ठेवण्यासाठी सहाय्यक जिल्हाधिकारी वैभव वाघमारे यांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी वैभव वाघमारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, तहसीलदार अजित शेलार, पोलीस निरीक्षक एस. एम. जाधव, तालुका आरोग्य अधिकारी शंकर वाघ यांच्यासह शिक्षक, महसूल, आरोग्य विभागाचे कर्मचारी व शाळेचे प्राचार्य, शिक्षक उपस्थित होते. बाधित विद्यार्थ्यांना पुरवण्यात येत असलेल्या सुविधा, त्यांची आरोग्यविषयक सद्यस्थिती, आढळलेली लक्षणे याविषयी जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी माहिती घेतली.
जिल्हाधिकाऱ्यांच्या विशेष सूचना
कोरोनाबाधित विद्यार्थ्यांना योग्य उपचार मिळण्यासाठी आरोग्य विभागाने दोन डॉक्टरांसह दोन आरोग्य पथके आळीपाळीने 24 तास निवासी शाळेमध्ये तैनात ठेवावीत. या पथकाने ठराविक अंतराने सर्व विद्यार्थ्यांच्या शरीराचे तपामान, ऑक्सिजन पातळी तसेच त्यांना इतर काही लक्षणे असल्यास त्याची तपासणी करुन त्यानुसार तातडीने उपचार करावेत. शाळा व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांचे एक पथक 24 तास तैनात ठेवावे. विद्यार्थ्यांना कोणताही त्रास होत असल्यास तातडीने आरोग्य पथकाच्या निदर्शनास आणून द्यावे. सर्व विद्यार्थ्यांना वेळेवर आणि योग्य आहार मिळेल याची खबरदारी घ्यावी. कोणत्याही विद्यार्थ्याची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घ्यावी. गट शिक्षणाधिकारी यांनी रोज सकाळी शाळेला भेट देऊन सर्व विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत आढावा घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस यांनी दिल्या.
निगेटिव्ह विद्यार्थ्यांबाबतही खबरदारी
शाळेमध्ये निवासी स्वरुपात राहणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी जे विद्यार्थी निगेटिव्ह आहेत, त्यांची संपूर्ण व्यवस्था स्वतंत्र ठेवावी. तसेच बाधित आढळलेल्या विद्यार्थ्यांच्या संपर्कात आलेले इतर स्थानिक विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांची कोरोना चाचणी तातडीने करुन घ्यावी. यासाठी आरोग्य विभाग आणि शिक्षण विभागाने समन्वय साधून विशेष कॅम्पचे आयोजन करावे. बाधित विद्यार्थ्यांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याची आणि इतर व्यक्तींची चाचणी होणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी सांगितले. यावेळी त्यांनी शाळेचे प्राचार्य, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांची बैठक घेऊन त्यांना सूचना दिल्या.
कोरोना बाधित विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थ्यांना थोडीशी सर्दी आहे. उर्वरित विद्यार्थ्यांना कोणतीही लक्षणे किंवा त्रास जाणवत नसल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी अविनाश आहेर यांनी सांगितले. या सर्व विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीसाठी 24 तास आरोग्य पथके तैनात करण्यात येथील, असेही त्यांनी सांगितले. (Maharashtra Washim Corona Updates 229 Residential School Students Teachers tested COVID Positive)
कन्टेन्मेंट झोन घोषित
तहसीलदार अजित शेलार यांनी निवासी शाळेमधील कोरोनाबाधित विद्यार्थ्यांची माहिती दिली. या शाळेचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र (कन्टेन्मेंट झोन) घोषित करण्यात आला आहे. बाधित आढळलेले सर्व विद्यार्थी शाळेच्या वसतिगृहात निवासी स्वरुपात राहणारे आहेत. यामध्ये अमरावती जिल्ह्यातील 151, यवतमाळ जिल्ह्यातील 55, वाशिम जिल्ह्यातील 11, बुलडाणा जिल्ह्यातील 3, अकोला जिल्ह्यातील 1, हिंगोली जिल्ह्यातील 8 विद्यार्थ्यांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.
संबंधित बातम्या :
तुम्हाला कोरोना लस आता मिळू शकते का? लस मिळवण्याची संपूर्ण प्रक्रिया
एक मार्चपासून 60 वर्षांवरील सर्व नागरिकांना मोफत कोरोना लस, जावडेकरांची घोषणा
(Maharashtra Washim Corona Updates 229 Residential School Students Teachers tested COVID Positive)