ऑफीसमध्ये कायम बसून काम करताय? आरोग्यासाठी घातक; चुकीच्या सवयींनी वाढतोय लठ्ठपणाचा आजार, तज्ज्ञांचा इशारा!
वाढत्या वजनाची समस्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व वयोगटातील लोकांमध्ये दिसून येते. आरोग्य तज्ज्ञ जीवनशैलीतील बदल आणि खाण्याच्या सवयी हेच यासाठी प्रमुख घटक असल्याचे मानतात. कार्यालयात तासंतास बसून काम केल्यानेही लठ्ठपणाचा धोका वाढतो. अशाच काही वाईट सवयींबद्दल जाणून घ्या, ज्यांबद्दल आपण आधीच सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
मुंबई : ऑफीसमध्ये दिवसभर बसून काम केल्याने, तुमच्यातील लठ्ठपणा अधिक वाढत असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. विशेषतः: तुम्हीही बैठी जीवनशैली (Sedentary lifestyle) जगत असाल तर त्याच्या धोक्यांबाबत सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, गेल्या काही वर्षांमध्ये ऑफिसमध्ये जास्त वेळ बसून काम करणाऱया लोकांमध्ये वजन वाढण्याची समस्या खूप वेगाने समोर येत आहे. याशिवाय कार्यालयीन कामकाजा वेळी झालेल्या काही चुकाही तुम्हाला हा त्रासदायक ठरतात. डॉक्टरांचे म्हणणे आहे की, केवळ तुमची ऑफिसमध्ये बसण्याची सवय लठ्ठपणाचे कारण (The cause of obesity) नाही तर, ऑफिसमध्ये जाणूनबुजून अशा अनेक चुका आपण रोज करत राहतो. ज्यामुळे वजन झपाट्याने वाढू शकते. साधारणपणे या सवयी अगदी सामान्य मानल्या जातात, ज्याकडे कोणी फारसे लक्ष देत नाही. दरम्यान, त्याचे दुष्परिणाम (Side effects) तुमचे वजन वाढण्यास आणि इतर अनेक आरोग्याशी संबंधित समस्यांना कारणीभूत ठरू शकतात.
उशिरा जेवणाच्या सवयीचे तोटे
बऱ्याच वेळा ऑफिसमध्ये जास्त कामामुळे तुम्ही एकतर जेवण करायला विसरता किंवा उशिरा जेवतात. या वाईट सवयीमुळे वजनही वाढू शकते. ऑफिसमध्ये काम करणाऱ्या बहुतेकांना जेवणाची वेळ ठरवता येत नाही. वेळेवर अन्न न खाल्ल्याने चयापचय क्रियांवर त्याचा परिणाम होतो, ज्याचे अनेक दुष्परिणाम भोगावे लागतात. लठ्ठपणा देखील त्यापैकी एक आहे. या सवयीमुळे पचनाशी संबंधित समस्याही उद्भवू शकतात.
दुपारचे जेवण घाईत करणे
कामाच्या दबावामुळे किंवा कमी वेळेमुळे बहुतेक लोक घाईत जेवण करतात. हे देखील वजन वाढण्याचे एक कारण असू शकते. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, घाईघाईत अन्न खाल्ल्याने पोट भरते, पण अन्न नीट चघळता न आल्याने पचनात समस्या उदभवतात. त्यामुळेच शरीरात चरबी जमा होऊ लागते. परिणामी जेवणाला वेळ देतांना प्रत्येक घास नीट चावूनच खावे. ऑफिसमध्ये जेवणाच्या वेळेची आणि पद्धतीची प्रत्येकाने काळजी घ्यावी.
सूर्यप्रकाशाचा संपर्क नाही
सकाळपासून संध्याकाळपर्यंत ऑफिसमध्ये बसण्याच्या सवयीमुळे सूर्यप्रकाशाचा संपर्क नगण्य आहे. या स्थितीमुळे केवळ व्हिटॅमिन-डी ची कमतरताच नाही. तर, तुमच्या वजनावरही त्याचा परिणाम होऊ शकतो. अभ्यासात, शास्त्रज्ञांना असे आढळून आले की, जे लोक दररोज सूर्यप्रकाशाच्या संपर्कात कमी येतात त्यांना इतर लोकांपेक्षा लठ्ठपणाचा धोका जास्त असतो.
काम करताना काहीतरी खाण्याची सवय
बहुतांश वेळेस आपण बघतो की, काम करताना काहीतरी खाण्याची सवय अनेकांना असते. आरोग्य आणि आहार तज्ज्ञ अशी सवय आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक मानतात. विशेषतः: चिप्स, बिस्किटे किंवा गोड पेये इत्यादींचे सेवन शरीरात जलद चरबी जमा होण्यासाठी काम करते. जर तुम्हालाही अशीच सवय असेल तर त्यापासून ताबडतोब दूर राहा, वाढत्या वजनासोबत रक्तशर्करा (मधुमेह)आणि कोलेस्ट्रॉल सारख्या समस्या देखील उद्भवू शकतात.