Russia Cancer Vaccine : कॅन्सरवर रामबाण इलाज, रशियाच्या दाव्यात काय खास, भारतासह जगभरातील लाखो रुग्णांचे वाढणार आयुष्य?
Cancer Vaccine : रशियाने कॅन्सरवर लस शोधल्याचा दावा केला आहे. येत्या नवीन वर्षात रशियात सार्वजनिक लसीकरणाचा प्रयोग होईल. कॅन्सर रुग्णांना लस देण्यात येईल. ही लस मोफत देण्यात येणार आहे. तरीही या लसीकरणाविषयी अनेक प्रश्न कायम आहेत.
कॅन्सर, दुर्दम्य इच्छाशक्ती आणि महागड्या उपचारानंतर बरा झाल्याच्या अनेक प्रेरणादायी व्यक्तित्व समाजात आहेत. पण गेल्या काही दशकात कॅन्सर रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. कॅन्सरवरील उपचार आणि त्यात रुग्णासह नातेवाईकाची ससेहोलपट वेदनादायी आहे. भारतासारख्या देशात प्रत्येक वर्षी कॅन्सरचे 14 लाखांहून अधिक प्रकरणं समोर येतात. तर कॅन्सरवर रामबाण उपाय शोधल्याचा दावा रशियाने केला आहे. जर हा प्रयोग सर्वच प्रकारच्या कर्करोगांवर यशस्वी झाला तर हा या दशकातील सर्वात मोठा शोध ठरणार आहे. हे मानवजातीसाठी एखाद्या वरदानापेक्षा कमी नसेल. काय आहे रशियाचा दावा, ही लस कधीपासून बाजारात दाखल होणार, त्याचा कोणत्या रुग्णांना फायदा होणार याविषयी उत्सुकता आहे.
कॅन्सर वॅक्सीन खरंच यशस्वी होणार का? ही लस कोणत्या प्रकारच्या कॅन्सरवर प्रभावी ठरणार? भारतासह जगभरातील रुग्ण ठीक होतील का? अशा अनेक प्रश्नावर टीव्ही 9 ने या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत जाणून घेतले. त्यात धर्मशिला नारायणा रुग्णालयातील सर्जिकल ऑन्कोलॉजी विभागातील संचालक डॉ. अंशुमन कुमार, मॅक्स रुग्णालयातील डॉ. रोहित कपूर आणि राजीव गांधी रुग्णालयातील प्राध्यापक डॉ. अजित कुमार यांचा समावेश आहे.
रशियाची कॅन्सरवरील लस ठरेल रामबाण उपाय?
या प्रश्नावर डॉ. अंशुमन कुमार यांनी उत्तर दिले. त्यांनी माहिती दिली की, कॅन्सर समूळ नष्ट व्हावा यासाठी रशियाच नाही तर अमेरिकेत सुद्धा वैयक्तिक लस संशोधनाचे काम प्रगतीपथावर आहे. ही लस MRNA या तंत्रज्ञानावर काम करते. यामध्ये कॅन्सर रुग्णाच्या शरीरात सध्याचा जो ट्यूमर आहे, त्यावर RNA चा मारा करण्यात येतो. ही लस कॅन्सर पेशीविरोधात रोग प्रतिबंधक म्हणून वापरता येते. या लस कॅन्सरच्या पेशी शोधून त्यांना नष्ट करते. रशियाची लस जर कॅन्सर रुग्णावर प्रभावी ठरली तर हे जगभरातील रुग्णांसाठी वरदान असेल असे डॉ. कुमार म्हणाले.
रशियाची लस कोणत्या कॅन्सरवर प्रभावी?
डॉ. रोहित कपूर यांनी या प्रश्नाचे उत्तर दिले. त्यांच्या मते, ही व्हॅक्सीन कॅन्सर रुग्णावर प्रभावी ठरेल. त्यांच्या मते, ही लस ट्यूमर तयार होण्यास प्रतिबंध करण्यासाठी नाही तर कॅन्सर रुग्णांसाठी आहे. ही लस सर्व प्रकारच्या कॅन्सर रुग्णावर प्रभावी ठरण्याची शक्यता त्यांनी वर्तवली. अथवा एक अथवा दोन प्रकारच्या कॅन्सरवर सुद्धा ही लस प्रभावी ठरू शकते, असे ते म्हणाले. रशियात, कोलन, ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यादृष्टीने हे संशोधन असू शकते. पण याविषयी कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नसल्याचे डॉ. कपूर म्हणाले.
Vaccine घेतल्यानंतर केमोथेरपी, सर्जरीची नाही गरज?
जर रशियाची लस रुग्णांवर प्रभावी ठरली तर रुग्णांवर केमोथेरपी करण्याची आवश्यकता नाही का? त्यांच्यावर शस्त्रक्रियेची गरज नाही का? ही लस कर्करोगाच्या पेशीवर हल्ला करून त्यांना नष्ट करेल का? असं प्रश्न विचारण्यात आला असता, त्यावर डॉ. कपूर यांनी उत्तर दिले. कॅन्सरवर जर लस प्रभावी ठरली तर शस्त्रक्रिया करण्याची, केमोची गरज कमी होईल. पण ही लस नेमकी कशी काम करेल, हे समोर येईपर्यंत त्यावर भाष्य करणे त्यांनी टाळले. शस्त्रक्रियेदरम्यान HPV लस घेणाऱ्या रुग्णात कॅन्सर परत येण्याची शक्यता खूप कमी असल्याचा दावा त्यांनी केला.
भारतासह जगभरातील रुग्ण होतील ठीक?
डॉ. अजित कुमार यांनी या प्रश्नाचे उत्तर दिले. त्यानुसार, रशियाने दावा केल्यानुसार, जर या लसीमुळे रुग्ण तंदुरुस्त होतील, तर हा मोठा चमत्कार असेल. ही लस प्रभावी ठरली तर जगभरातील रुग्णांसाठी वरदान असेल. अर्थात सध्या आपल्याला रशियाच्या लसीकरणाचे आणि रुग्ण बरे होण्याचे प्रमाण, याची वाट पाहावी लागेल. जर रुग्ण बरे होतील, त्यांच्यात कर्करोग पुन्हा उद्भवणार नाही असे जर झाले तर हे मानवजातीसाठी मोठे संशोधन असेल.
भारतात तयार होऊ शकते का लस?
भारतात पण कॅन्सरची लस तयार केल्या जाऊ शकते, असे डॉ. अंशुमन कुमार म्हणाले. देशातील अनेक संशोधन संस्था आणि विद्यापीठात कॅन्सरवर संशोधन सुरू आहे. कर्करोगावर प्रभावी औषध शोधण्यात येत आहे. पण त्यासाठी निधीची अधिक तरतूद करणे, त्यासाठी प्रोत्साहन देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. भारतात जीडीपीच्या केवळ 1.9 % रक्कम आरोग्यासाठी खर्च करण्यात येते. तर त्यातील केवळ 1.2 % रक्कम संशोधनासाठी वापरण्यात येत असल्याचा दावा त्यांनी केला. भारताने सुद्धा या क्षेत्रात मोठे संशोधन करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे कर्करोगावरील उपचारासाठीचा खर्च कमी होईल. देशातील गरीब रुग्णांना त्याचा सर्वाधिक फायदा होईल.
या पूर्वी पण लस, पण त्यानेही कॅन्सर पूर्णपणे बरा नाही
सध्या सर्वाईकल कॅन्सरसाठी HPV Vaccine उपलब्ध आहे. भारतात पण त्याची लस आहे. पण अनेक लोकांना त्याची माहिती नसल्याचे डॉ. रोहित कपूर म्हणाले. कारण सरकारी रुग्णालयात ही लस उपलब्ध नाही. तर खासगी दवाखान्यात, रुग्णालयात त्याची किंमत सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे सर्वाईकल कॅन्सरचे रुग्ण वाढत असल्याचे ते म्हणाले.
रशियात जर ही लस प्रभावी ठरली तर भारत त्याची एकत्र तर आयात करेल. अथवा ही लस देशात तयार करेल, त्यावेळी त्याची माहिती समोर येईल. या लसीची किंमत कमी ठेवणे आवश्यक आहे, कारण तसे केले तर सर्वसामान्य लोकांना त्याचा फायदा होईल. त्यांना कमी किंमतीत हे औषध खरेदी करता येईल.
रशियात पण रुग्णांची मोठी संख्या
रशियाने तयार केलेल्या या वॅक्सिनचे, लसीचे नाव अद्याप समोर आलेले नाही. जगातील इतर देशांप्रमाणेच रशियात पण कॅन्सर ही मोठी समस्या आहे. कॅन्सरचे रूग्ण सातत्याने वाढत आहेत. 2022 मध्ये 6,35,000 हून अधिक रुग्णांची नोंद या काळात झाली आहे. या देशात स्तन, फुप्फुसांचा कर्करोग वाढला आहे. ही लस केवळ ट्युमरची गती कमी करणार नाही तर तिचा आकार सुद्धा कमी करेल.
काय होता पुतिन यांचा दावा?
काही दिवसांपूर्वी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतिन यांनी वैज्ञानिक कर्करोगावरील लस तयार करण्यात रशिया अगदी जवळ असल्याचा दावा केला होता. नवीन पिढीच्या इम्युनोमोड्युलेटरी औषधाची निर्मिती करत असल्याचे ते म्हणाले होते. इम्युनोमोड्युलेटरी म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारं औषध. ही लस शरीराला कर्करोग, संसर्ग अथवा इतर रोगांशी लढण्यास मतद करणारी असेल असा दावा आहे. मॉस्को फोरम ऑन फ्यूचर टेक्नॉलॉजीच्या मंचावरून त्यांनी या लसबद्दल घोषणा केली होती.
भारतात 5 वर्षांपूर्वी 9.3 लाख मृत्यू
बीसीडी शून्य झाल्याने भारतीय बाजारात कर्करोगावरील काही औषधांची किंमत कमी होण्याची शक्यता आहे. देशात कॅन्सरच्या रुग्णात वृद्धी होत असल्याचे दिसून आले आहे. एका संशोधनानुसार, 2019 मध्ये भारतात जवळपास 12 लाख नवीन कॅन्सरचे प्रकरण नोंदवण्यात आले आहे. तर 9.3 लाख मृत्यू झाले आहेत. आशिया खंडात कॅन्सरचे सर्वाधिक रुग्ण असणारा भारत हा दुसरा देश आहे.
देशात ही औषध स्वस्त
भारत सरकारने तीन अँटी-कॅन्सर औषधांच्या किंमतीत कपात करण्याचा आदेश दिला आहे. कॅन्सर रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना त्याचा फायदा होणार आहे. केंद्रीय रसायन आणि त्यानुसार, Trastuzumab Deruxtecan, Osimertinib आणि Dervalumab या औषधांच्या कमाल किंमतीत कपतीचे निर्देश देण्यात आले आहेत. या औषधांवरील बेसिक कस्टम ड्युटी शुन्यावर आणण्यात आली आहे. तर जीएसटी दर 12 टक्क्यांवरून 5 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे.