दातांच्या दुखण्याला करा बाय बाय… हे घरगुती उपाय ठरतील परिणामकारक
दातांच्या दुखण्याकडे एक सामान्य समस्या म्हणून त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असते. परंतु असे न करता जर तुम्हालाही ही समस्या असेल काही घरगुती उपाय आहेत, ज्यांच्यापासून दातदुखीची समस्या कायमची दूर होण्यात मदत होईल.
दात दुखण्याची अनेक कारणे असू शकतात. अनेकदा लोकांकडून दातदुखीच्या (toothache) समस्येला सामान्य असल्याचे सांगत त्याकडे सर्रास दुर्लक्ष करण्यात येत असते. परंतु यामुळे अनेकदा गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. त्यामुळे या समस्येकडे दुर्लक्ष न करता त्यावर उपाय योजना करणे आवश्यक आहे. दात दुखणे अत्यंत वेदनादायी असते. दातांच्या दुखण्यामुळे डोके, जबडा आणि कानही प्रभावीत होत असतात. दात दुखीच्या वेदनाही वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. काही लोकांसाठी ही वेदना कायमस्वरुपी ठरते. तर काही लोकांना थोड्या थोड्या वेळाने वेदना जाणवतात. दातदुखीची ही समस्या सामान्यतः दातांमध्ये घाण, बॅक्टेरिया आणि दात खराब होण्यामुळे (oral hygiene) होत असते. कधीकधी वेदना अशा वेळी होतात की डॉक्टरकडे जाणे देखील शक्य नसते. अशा परिस्थितीत तुम्ही काही घरगुती उपाय (home remedies) करून पाहू शकता. हे उपाय तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरतील.
- लवंगाचा वापर करा लवंगमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी, अँटी-बॅक्टेरियल, अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म असतात, जे दातदुखी बरे करण्यासाठी उपयुक्त मानले जातात. दात दुखत असल्यास लवंग पाण्यात उकळून थंड करून त्या पाण्याने गुळण्या करा. याशिवाय लवंग दातांमध्ये दाबावी किंवा कापसात लवंगाचे तेल लावून दुखणाऱ्या जागेवर ठेवावे, यातून दातांना आराम मिळेल.
- पेरूची पाने पेरूची पाने धुवून पाण्यात टाका त्यात थोडे मीठ घाला. हे पाणी उकळून थंड झाल्यावर स्वच्छ धुवा. हे दिवसातून दोन ते तीन वेळा करा. त्यामुळे दुखत्या दातांना बराच दिलासा मिळेल.
- कांदा कांद्यामध्ये बॅक्टेरिया नष्ट करण्याचे गुणधर्मदेखील असतात. कांदा सोलून त्याचा तुकडा दुखणाऱ्या भागावर काही काळ ठेवा. यामुळे तुम्हाला दुखण्यापासून आराम मिळेल. हा कांद्याचा तुकडा काही वेळाने फेकून द्या
- ऑईल पुलींग दातदुखी कमी करण्यासाठी ऑईल पुलींगदेखील उपयुक्त आहे. हे दातांमध्ये असलेले बॅक्टेरिया मारून टाकते. यासाठी नारळाचे किंवा तिळाचे तेल तोंडात घ्यावे. सुमारे 10 मिनिटे तोंडात ठेवा आणि सर्व बाजूंनी फिरवा. हे तेल सुमारे 10 मिनिटांनंतर थुंकून टाका आणि कोमट मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवा.
- मिठाचे पाणी दात दुखण्यासोबतच हिरड्या सुजल्या असतील तर कोमट पाण्यात मीठ टाकून दिवसातून दोन ते तीन वेळा गुळण्या कराव्यात. यामुळे दातांच्या दुखण्यापासून खूप आराम मिळेल