ही लक्षणं दिसली तर समजून जा रोगप्रतिकारक शक्ती कमी झालीय; वाढू शकतो संसर्गाचा धोका
रोगप्रतिकारक शक्ती ही शरीराची एकमेव संरक्षणात्मक यंत्रणा आहे, जी भविष्यातील संसर्गापासून शरीराचे संरक्षण करते. पण जर ती कमकुवत झाली असेल तर अनेक रोगजंतूंमुळे संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते.
नवी दिल्ली: आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती (immune system) चांगली असेल तर आपण वारंवार आजारी पडत नाही. अनेकवेळेस आपल्या पैकी काही लोक, पावसात थोडे भिजले किंवा बाहेर काही खाल्लं तर ते (लोक) लगेच आजारी (people fall sick) पडतात. मात्र काही व्यक्ती अशाही असतात, ज्यांनी कितीही वेळा बाहेरचे पदार्थ खाल्ले तरी ते ठणठणीत असतात, लवकर आजारी पडत नाहीत. त्यामागचे कारण आहे रोगप्रतिकारक शक्ती. अनेक लोकांची रोगप्रतिकारक शक्ती उत्तम असते. मात्र काहींची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असते. त्यांना लगेच संसर्ग होऊ शकतो. शरीरात ही लक्षणं दिसतं असतील (symptoms of weak immune system) तर रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली आहे, हे समजावे.
सतत ताप येणे किंवा सर्दी होणे
वारंवार सर्दी होणे किंवा फ्ल्यू येणे हे कमकुवत रोगप्रतिकारक शक्तीमुळे होऊ शकते. जेव्हा आपली रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असते, तेव्हा त्यामध्ये धोकादायक विषाणू व बॅक्टेरियाच्या हल्ल्यापासून आपले संरक्षण करण्याची क्षमता नसते. ज्यामुळे आपल्याला फ्ल्यू आणि सर्दी अगदी सहज आणि वारंवार होते. लोकांना वर्षातून 2 ते 3 वेळा सर्दी होणे अगदी सामान्य आहे. मात्र त्यापेक्षा जास्त वेळा हा त्रास होत असेल तर ते तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्याचे लक्षण आहे.
सतत पोट बिघडणे
रोगप्रतिकारक शक्ती ही आपल्या पचनतंत्राच्या स्थितीशी संबंधित आहे. जर तुम्हाला वारंवार अतिसार, सूज येणे आणि बद्धकोष्ठता यासारखे पोटाचे विकार होत असतील तर हे कमकुवत रोगप्रतिकारक शक्तीचे लक्षण असू शकते. त्यामुळे पोटाशी संबंधित कोणत्याही समस्या असेल तर त्याबाबत बेफिकीर राहू नका, त्याकडे दुर्लक्ष करू नका.
सुस्त वाटणे
शरीर सुस्त वाटणे हे देखील कमकुवत रोगप्रतिकारक शक्तीचे लक्षण आहे. आपले शरीर नेहमीच रोगांविरुद्ध लढा देत असते, त्यामुळे शरीरातील उर्जेचा वापर जास्त होत असतो. ज्यामुळे नियमितपणे झोप घेतल्यानंतरही थकवा आणि आळस जाणवत राहतो. थकवा जाणवणे तसेच अंगात सुस्ती वाटणे हे कमकुवत रोगप्रतिकारक शक्तीमुळे होऊ शकते.
जखम हळूहळू भरणे
बऱ्याच वेळेस शरीराच्या एखाद्या भागाला झालेली जखम आठवडाभर उलटूनही बरी होत नाही. त्याचे कारण म्हणजे कमकुवत झालेली तुमची रोगप्रतिकारक शक्ती होय. त्यामुळे जखम लवकर बरी होत नाही. आपली रोगप्रतिकार शक्ती जेवढी मजबूत असते, तेवढी जखम लवकर बरी होते.