Migraine Home Remedies: मायग्रेनच्या वेदनांनी झालात त्रस्त ? ‘या’ घरगुती उपायांनी मिळू शकतो आराम
धावपळीच्या जीवनात लोकांना आरोग्याच्या अनेक समस्या सतावतात. मायग्रेनचा त्रास तर आजकाल खूप सामान्य झाला आहे. बऱ्याच लोकांना त्याचा त्रास होतो.
नवी दिल्ली – कामाचा ताण आणि दिवसभराची धावपळ यामुळे लोकांना अनेकदा तणाव (stress) जाणवतो आणि आरोग्याच्या समस्यांना ते बळी पडतात. डोकेदुखी देखील या समस्यांपैकी एक असून अनेक कारणांमुळे डोकेदुखी (headache) होऊ शकते. पण जर तुम्हाला सतत डोकेदुखी होत असेल तर ते खूप गंभीर असू शकते. हा मायग्रेनचा त्रासही असू शकतो, त्यामुळे सतत होणाऱ्या डोकेदुखीकडे अजिबात दुर्लक्ष न करता लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. मायग्रेनचे दुखणे अगदी असह्य (pain) असते, एकदा हा त्रास सुरू झाला की लवकर थांबत नाही.
खराब जीवनशैली, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, मोबाईल-लॅपटॉपचा अतीवापर यामुळे मायग्रेन उद्भवू शकते. अनेक वेळेस लोकं मायग्रेनच्या दुखण्यापासून आराम मिळवण्यासाठी पेनकिलरचा अवलंब करतात. जर तुम्हीही मायग्रेनच्या समस्येने त्रस्त असाल तर काही घरगुती उपायांच्या मदतीने तुम्ही हा त्रास दूर करू शकता.
दालचिनी
गरम मसाला म्हणून वापरण्यात येणारी दालचिनी ही मायग्रेनच्या समस्येवर खूप प्रभावी आहे. जर तुम्हाला सतत मायग्रेनचा त्रास होत असेल तर तो कमी करण्यासाठी तुम्ही दालचिनीचा वापर करू शकता. यासाठी दोन चमचे दालचिनी पावडर पाण्यात मिसळून पेस्ट बनवा. आता ही पेस्ट 20-25 मिनिटे कपाळावर लावून ठेवा. असे केल्याने तुम्हाला मायग्रेनच्या दुखण्यापासून त्वरित आराम मिळेल.
लिंबाची साल
व्हिटॅमिन सीने समृद्ध असलेले लिंबू हे आपल्यासाठी खूप फायदेशीर आहेच, पण त्याची सालंही खूप उपयुक्त आहेत. मायग्रेनचा त्रास कमी करण्यासाठी तुम्ही लिंबाची साल वापरू शकता. लिंबाची साले बारीक करून त्याची पेस्ट कपाळावर लावावी, याने त्रास कमी होतो
कापूर
बहुतांश वेळेस पूजेत वापरला जाणारा कापूर, मायग्रेनच्या समस्येतही फायदेशीर ठरतो. कापूर हा डोकेदुखीपासून आराम देतो. मायग्रेनचा त्रास होत असेल कापूर बारीक करून त्यात तूप टाकावे आणि ही पेस्ट कपाळावर लावून हलक्या हाताने मसाज करावा.
काळी मिरी व बदाम आणि दूध
मायग्रेनच्या दुखण्यापासून मुक्त होण्यासाठी तुम्ही काळी मिरी, बदाम आणि दुधाचे सेवन करू शकता. 5-6 भिजवलेले बदाम सोलून त्यात 3 ते 4 काळ्या मिरी घालून बारीक करावे. हे मिश्रण एक दुधात मिसळून चांगले उकळावे. दुधाला उकळी आल्यानंतर त्यात एक चमचा तूप आणि एक चमचा साखर घालून थंड करा. हे दूध प्यायल्याने मायग्रेनचे दुखणे कमी होईल.
गाईच तूप
गाईचे तूप आपल्या आरोग्याला खूप फायदेशीर ठरते. मायग्रेनच्या दुखण्यावरही हे खूप प्रभावी ठरते. जर तुम्हाला मायग्रेनचा त्रास असेल तर तुम्ही गाईचे तूप पोळी किंवा भातासोबत खाऊ शकता. तसेच गाईच्या तुपाचे दोन थेंब नाकात टाकल्यानेही दुखण्यापासून त्वरित आराम मिळतो.