मैत्रिणींनो, मेनोपॉजच्या काळात तुमचंही वजन वाढतंय का ? अशी घ्या काळजी
वजन नियंत्रणात ठेवणे आव्हानात्मक असते, विशेषत: रजोनिवृत्तीनंतर ते अधिकच कठीण असते.
नवी दिल्ली : वयाच्या 40-50 व्या वर्षी, प्रत्येक स्त्रीच्या शरीरातील चयापचय प्रक्रिया (Metabolism) मंदावतात. यामुळे वजन कमी होण्याची प्रक्रियाही मंदावते. व्यायाम करण्यात अडचण, स्नायू कमकुवत होणे आणि शरीराची कॅलरी जाळण्याची क्षमता कमी झाल्यामुळे वजन झपाझप वाढू लागते. स्त्रियांमध्ये, हे जास्त ठळकपणे दिसून येते कारण या वयात मेनोपॉज अर्थात रजोनिवृत्ती (Menopause) देखील येते आणि हार्मोनल बदल वजन वाढण्यास कारणीभूत ठरतात. मासिक पाळीची सुरुवात (Periods)आणि शेवट स्त्रीच्या आयुष्यात अनेक बदल घडवून आणतो. अशा परिस्थितीत रजोनिवृत्तीनंतर वजन वाढणे ही देखील एक सामान्य समस्या आहे.
जर तुम्हीही वयाच्या चाळीशीत असाल आणि तुमचेही वजन वाढत असेल तर रजोनिवृत्ती हे कारण असू शकते. या लेखाच्या माध्यमातून रजोनिवृत्तीच्या काळात वजन नियंत्रित ठेवण्यासाठी काय करू शकतो हे जाणून घेऊया. पण त्याआधी हे का होते त्याचे कारण जाणून घेऊया.
रजोनिवृत्ती दरम्यान वजन का वाढते?
पेरीमेनोपॉज (Perimenopause) आणि मेनोपॉजमध्ये (Menopause)वजन वाढणे सामान्य आहे. हे इस्ट्रोजेनच्या पातळीत चढ-उतार झाल्यामुळे होते. भूक आणि कॅलरी जाळण्याच्या प्रक्रियेवर त्याचा परिणाम होतो. रजोनिवृत्तीमुळे इस्ट्रोजेन हार्मोनला चालना मिळते आणि चढउतार होतात, ज्यामुळे वजन वाढू शकते. रजोनिवृत्तीच्या आसपास वजन वाढण्यात इतर अनेक घटक भूमिका बजावतात, ते म्हणजे –
स्नायूंचे वजन कमी होणे – हे वय, हार्मोनल बदल आणि शारीरिक हालचालींच्या अभावामुळे होते.
अपुरी झोप – रजोनिवृत्ती दरम्यान अनेक महिलांना झोपेचा त्रास होतो. कमी झोपेचा संबंध वजन वाढण्याशी आहे.
वाढलेली इन्सुलिन प्रतिरोधकता – स्त्रिया वयानुसार इन्सुलिन प्रतिरोधक बनतात, ज्यामुळे वजन कमी करणे अधिक कठीण होते.
वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी टिप्स
आपल्या आहाराची काळजी घ्या
योग्य आणि संतुलित आहार घेतल्यास वजन नियंत्रित ठेवता येते. म्हणून, प्रथिने, फळं, भाज्या, संपूर्ण धान्य, दुग्धजन्य पदार्थ आणि ओमेगा -3 फॅटी ॲसिड असलेले आहार घ्या. हे पदार्थ रजोनिवृत्तीची लक्षणे टाळण्यास मदत करतात. प्रथिनेयुक्त पदार्थांचा समावेश केला पाहिजे. तसेच साखरयुक्त पदार्थ आणि रिफाइंड पदार्थ टाळावेत कारण ते त्यामुळे हार्मोन्सची पातळी बिघडू शकते.
व्यायाम सुरु ठेवा
फिटनेस राखण्यासाठी व्यायाम हा महत्त्वाचा भाग आहे. हे स्त्रियांना गमावलेले स्नायू मिळवण्यास मदत करते आणि वजन कमी करण्यास मदत करते. हाडे मजबूत करणे आणि चयापचय सुधारणे हे व्यायामाचे इतर परिणाम आहेत जे वजन टिकवून ठेवण्यास मदत करू शकतात.
गोड कमी खावे
रजोनिवृत्ती दरम्यान तुम्हाला गोड खाण्याची इच्छा होऊ शकते. जास्त साखर खाल्ल्याने तुमच्या आहारात 300 कॅलरीज वाढू शकतात. त्यामुळे कुकीज, केक, डोनट्स, आइस्क्रीम आणि कँडीजपासून दूर राहा, ते तुमचे वजन वाढवू शकतात.
मदयपान कमी करा
जर तुम्ही मद्यपान करत असाल तर अल्कोहोलचे सेवन मर्यादित करा. अल्कोहोलयुक्त पेये तुमच्या आहारात अतिरिक्त कॅलरी वाढवतात आणि वजन वाढण्याचा धोका वाढवतात. तसेच ते आरोग्यासाठीही चांगले नाही.
पुरेशी झोप घ्या आणि तणाव कमी करा
वजन नियंत्रित ठेवण्यासाठी पुरेशी झोप घेणे खूप महत्त्वाचे आहे. तसेच, तुम्हाला कमी ताण घ्यावा लागेल हे लक्षात ठेवा. या दोन्ही घटकांमुळे वजन वाढते.