Fish Infection | असं काय घडलं की मासे खाल्ल्याने महिलेचे थेट हातपायच कापावे लागले
रेड मीट खाल्ल्याने कोलेस्ट्रोल वाढत असते. त्यामुळे अनेकजण चिकन किंवा त्यातल्या त्यात मासे खाणे पसंद करीत असतात. परंतू मासे खाल्ल्याने एका महिलेला आपले हात आणि पाय गमवावे लागले आहेत.
न्युयॉर्क | 18 सप्टेंबर 2023 : नॉनव्हेजचे शौकीन असलेल्यांचे मत्स्यप्रेम जगावेगळे असते. मासे खाण्याने आरोग्याला फायदा देखील होत असतो. खवय्यांना मासे खाण्याशिवाय रहावत नाही. परंतू मासे खाल्ल्याने आपले अवयव गमवावे लागल्याचे कधी ऐकले आहे का ? हो अशीच एक भयंकर घटना घडली आहे. अमेरिकेच्या कॅलिफोर्नियात असेच काहीसे घडले आहे. ही बातमी मस्त्यप्रेमीसाठी चिंता वाढविणारी अशीच आहे. एका महिलेने बाजारातून आणलेले मासे खाल्ल्याने तिच्या हाता-पायांना कापावे लागल्याची घटना घडली आहे, तेव्हाच तिला वाचविणे शक्य झाले आहे.
न्युयॉर्क पोस्टच्या बातमीनूसार कॅलिफोर्नियाच्या सॅन जोस येथील लॉरा बाराजस ( वय 40 ) हीच्यावर हा भयंकर प्रसंग ओढविला. लॉरा हीने अर्धकच्ची तिलापिया ही मासळी खाल्ल्यानंतर तिला संक्रमण झाले. हे संक्रमण वेगाने शरीरात पसरले. त्यामुळे तिचे हात आणि पाय कापण्याचा निर्णय डॉक्टरांना घ्यावा लागला. दुषित मासळी खाल्ल्याने ही महिला कोमात गेली होती. अखेर तिचे प्राण वाचविण्यात कसेबसे यश आले आहे.
पिडीत महिलेचे मित्र अन्ना मेसिना याने सांगितले की लॉरा हीने मासे खाताच तिची तब्येत खालावली. लॉराने एका स्थानिक बाजारातून मासे खाल्ले. त्यानंतर काही दिवसांनी ती आजारी पडली. तिने घरी मासे शिजवून खाल्ले होते. मसिना हीचे बोटं आणि पाय तसेच खालचा ओठ काळे पडले होते. केवळ तिचा श्वास सुरु होता.
अन्न नीट शिजवून खाणे गरजेचे
टीलापिया नावाचा मासा खाल्ल्यानंतर तिला इन्फेक्शन झाले. हा मासा बॅक्टेरियाने संक्रमित होता. मासे खाल्ल्यानंतर तिच्या दोन्ही किडन्या फेल झाल्या. तिला सहा वर्षांचा मुलगा देखील आहे. एक महिना उपचारानंतर तिचे प्राण वाचले. परंतू तिला हात आणि पाय नाही. मासळीत विब्रियो विलनिफिकस नावाचा बॅक्टेरीया होता. कच्च्या अन्नात तो असतो. अशात सीफूडला चांगले शिजवणे गरजेचे असते. अन्यथा ते जीवघातक होऊ शकते. तज्ज्ञांच्या मते दरवर्षी संक्रमणाला 150-200 प्रकरणं समोर येत असते. त्यामुळे पिडीत पाचपैकी एकाचा मृत्यू होत असतो.