कर वाचवण्याची धडपड! टॅरिफमुळे Apple ने भारतातून 5 विमाने अमेरिकेला पाठवली
टॅरिफची डोकेदुखी वाढली असून कर कसा वाचवता येईल, यासाठी कंपन्या प्रयत्न करत आहेत. अॅपलने तीन दिवसांत भारतातून आयफोन आणि इतर उत्पादनांनी भरलेली पाच विमाने अमेरिकेला पाठवली आहे. अमेरिकेत 5 एप्रिलपासून लागू झालेला 10 टक्के नवीन 'रेसिप्रोकल टॅरिफ' टाळण्यासाठी हे आपत्कालीन पाऊल उचलण्यात आले.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या रेसिप्रोकल टॅरिफमुळे कंपन्यांची डोकेदुखी वाढली आहे. भरमसाठ कर टाळण्यासाठी आता वेगवेगळ्या युक्ती कंपन्यांकडून लढवल्या जात आहे. अशीच एक माहिती समोर आली आहे. अॅपल कंपनीने देखील कर वाचवण्यासाठी एक युक्ती केली आहे. आता ही युक्ती नेमकी काय आहे, याविषयी पुढे विस्ताराने जाणून घेऊया.
अॅपलने मार्चच्या शेवटच्या आठवड्यात अवघ्या तीन दिवसांत भारतातून आयफोन आणि इतर उत्पादनांनी भरलेली पाच विमाने अमेरिकेला पाठवली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, एका वरिष्ठ भारतीय अधिकाऱ्याने याला दुजोरा दिला आहे. अमेरिकेत 5 एप्रिलपासून लागू झालेला 10 टक्के नवीन ‘रेसिप्रोकल टॅरिफ’ टाळण्यासाठी हे आपत्कालीन पाऊल उचलण्यात आले. मात्र, अॅपलने अद्याप भारतात किंवा अन्य कोणत्याही बाजारपेठेत आपल्या उत्पादनांच्या किंमती वाढवण्याची कोणतीही योजना आखलेली नाही.
कर टाळण्याचे धोरण
टॅरिफचा प्रभाव कमी करण्यासाठी अॅपलने भारत आणि चीनमधील मॅन्युफॅक्चरिंग सेंटरमधून मोठ्या प्रमाणात माल अमेरिकेत पाठवण्यास सुरुवात केली. हा असा काळ आहे जेव्हा शिपिंग सहसा कमी असते, परंतु कर वाढला तर त्याचा किंमतींवर परिणाम होणार नाही याची तयारी अॅपलने आधीच सुरू केली होती.
साठा जमा केल्याने कशी मदत होईल?
रिपोर्टनुसार, अॅपलच्या या पावलामुळे सध्या किंमती स्थिर राहण्यास मदत होईल. वाढीव करांचा परिणाम टाळण्यासाठी अॅपल कंपनीने अमेरिकेतील आपल्या गोदामात काही महिन्यांचा साठा पाठवला आहे. पण ही परिस्थिती दीर्घकाळ कायम राहिल्यास अॅपलला भारतासारख्या जागतिक बाजारात किंमती वाढवाव्या लागू शकतात. विविध देशांतील पुरवठा साखळीवर कर रचनेचा कसा परिणाम होईल, याचे विश्लेषण कंपनी सध्या करीत आहे.
भारत बनला अॅपलचा विश्वासार्ह उत्पादन पर्याय
ट्रम्प प्रशासनाने 9 एप्रिलपासून 26 टक्के परस्पर शुल्क जाहीर केले आहे, ज्यामुळे अॅपलला आपली उत्पादन रणनीती बदलावी लागेल. भारत अॅपलसाठी सुरक्षित आणि फायदेशीर पर्याय म्हणून उदयास येत आहे. चीनमधून आयात होणाऱ्या वस्तूंवर अमेरिकेत 54 टक्क्यांपर्यंत कर आकारला जात आहे, तर भारतातून निर्यात होणाऱ्या वस्तूंवर हा कर केवळ 26 टक्के आहे. 28 टक्क्यांचा हा फरक अॅपलला भारतात उत्पादन वाढवण्यासाठी आकर्षित करत आहे.
अॅपल आधीच भारतात आयफोन आणि एअरपॉड्सचे उत्पादन करत आहे आणि अमेरिकेला सुमारे 9 अब्ज डॉलर्सच्या स्मार्टफोन निर्यातीत त्याचा मोठा वाटा आहे. जर अमेरिकेने इतर देशांसोबत शुल्क निश्चित केले तर अॅपलच्या उत्पादन धोरणात आणखी बदल होऊ शकतात.