हाहाकार ! चीनमध्ये भीषण भूकंपामुळे शेकडो दगावले, 200 हून अधिक जखमी
चीनच्या उत्तर भागात बसलेल्या भूकंपाच्या भीषण धक्क्यामुळे हाहाकार माजला आहे. चीनच्या गान्सू आणि किंघई प्रांतात सोमवारी रात्री उशीरा भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. या भूकंपामुळे 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून 200 पेक्षा अधिक नागरिक जखमी झालेत.
China Earthquake : चीनच्या उत्तर भागात बसलेल्या भूकंपाच्या भीषण धक्क्यामुळे हाहाकार माजला आहे. चीनच्या गान्सू आणि किंघई प्रांतात सोमवारी रात्री उशीरा भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 6.2 इतकी मोजण्यात आली. गान्सूच्या प्रांतीय आपत्कालीन व्यवस्थापन विभागातील अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार, भूकंपाचे हे धक्के एवढे तीव्र होते की, त्यामुळे अनेक इमारती कोसळल्या, घरं उद्ध्वस्त झाली. यामुळे सगळीकडे हाहाकार माजला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या भूकंपामुळे 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून 200 पेक्षा अधिक नागरिक जखमी झाले आहेत.
प्रशासनातर्फे तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. यूएस जिओलॉजिकल सर्व्हेनुसार, गान्सूपासून सुमारे 37 किमी अंतरावर असलेल्या लिंक्सिया चेंगगुआनझेन, सुमारे 100 किमी अंतरावर लान्झू येथे हा भूकंप झाला.
सरकारी मीडिया एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री उशीरा भूकंपाचे धक्के बसले. यामुळे सर्वात जास्त नुकसान हे काऊंटी, डियाओजी आणि किंघाई प्रांतात झालं आहे. तेथे इमारती कोसळल्यामुळे शेकडो लोक ढिगाऱ्याखाली दाबले गेले. त्यांना बाहेर काढून उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात बचाव पथकाचे अधिकारी व्यस्त आहेत. मात्र मृतांचा आणि जखमींचा आकडा आणखी वाढू शकतो, अशी भीती व्यक्त होत आहे.
An earthquake in northwestern China killed at least 95 people in Gansu and Qinghai provinces. More than 200 people were injured, reports AP citing Xinhua
— ANI (@ANI) December 19, 2023
लोकं रस्त्यावर सैरावैरा पळू लागले चीनमध्ये बसलेल्या या भूकंपाच्या धक्क्यामुळे मोठं नुकसान झालं आहे. भूकंपामुळे घरं, इमारती कोसळल्याने बरंच नुकसान झालं आणि भेदरलेले लोक रस्त्यावर उतरून सैरावैरा पळू लागले. सगळीकडे एकच हाहाकार माजला. शिन्हुआच्या अहवालानुसार, चीनचे राष्ट्रीय आपत्ती निवारण, शमन आणि मदत आयोग आणि आपत्कालीन व्यवस्थापन मंत्रालयाने स्तर-IV आपत्ती निवारण आणीबाणी सक्रिय केली आहे. मात्र, उंचावरील भाग असल्याने येथे कडाक्याची थंडी असल्याने बचाव कार्यात अनेक अडचणी येत आहेत.
पाकिस्तानातही हादरली जमीन
सोमवारी पाकिस्तानातही अनेक ठिकाणी भूंकप झाला. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 5.8 इतकी मोजण्यात आली. मात्र यामध्ये कोणतेही नुकसान अथवा जीवितहानी झाली नाही. राजधानी इस्लामाबादसह इतर शहरांमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले.