इस्राइल-हमास युद्धामुळे कच्च्या तेलाचे भाव भडकले, पेट्रोल-डीझेलवर काय होणार परिणाम ?
युद्ध सुरु होताच कच्च्या तेलाते भाव भडकले आहेत. दोन्ही देशाच्या संघर्षात कच्चे तेल 4 टक्के महागले आहे. क्रुड ऑईलचे भाव भडकल्याने देशात महागाई वाढण्याची शक्यता आहे.
मुंबई | 10 ऑक्टोबर 2023 : इस्राईल आणि पॅलेस्टाईन या देशांमध्ये युध्द सुरु झाल्याने त्याचा परिणाम आता जगभरात होणार आहे. पॅलेस्टाईनच्या काही भागावर वर्चस्व असलेल्या हमास या अतिरेकी संघटनेने इस्राईलवर हल्ला केल्याने 1100 हून अधिक जणांचे प्राण गेले आहे. तर या घडामोडींमुळे आंतराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर 4 टक्क्यांनी वाढले आहेत. ब्लुमबर्ग एनर्जीवर दिलेल्या ताज्या दरानूसार ब्रेंट क्रुड 4.02 टक्के वाढून प्रति बॅरल 87.98 डॉलरवर पोहचले आहे. तर डब्ल्यूटीआय 4.26 टक्के वाढून 86.32 डॉलर प्रति बॅरलवर पोहचले आहे. यादरम्यान, भारतात पेट्रोल-डीझेलचे दर 511 व्या दिवशी अजून प्रभाव पडलेला नाही. परंतू युद्ध जसे लांबेल तशी दरात वाढ होऊ शकते असे म्हटले जात आहे.
इस्राईलवर हमास या अतिरेकी संघटनेने अचानक रॉकेटने हल्ला करीत युद्ध सुरु केले आहे. त्यामुळे बेसावध असलेला इस्राईलला मोठी मनुष्यहानी सहन करावी लागली आहे. या युद्धाचा परिणाम जगभरातील शेअरबाजारासह आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या दरांवरही झाला आहे. भारतालाही याची झळ बसू शकते. घरगुती शेअर बाजारातील घसरणीमुळे युद्धाचा परिणाम दिसायला सुरुवात झाली आहे. युद्ध लांबले तर भारतावर याचा चारबाजूंनी परिणाम होणार आहे.
तर तेलाचे भाव तात्काळ वाढतील
युद्ध सुरु होताच कच्च्या तेलाते भाव भडकले आहेत. दोन्ही देशाच्या संघर्षात कच्चे तेल 4 टक्के महागले आहे. क्रुड ऑईलचे भाव भडकल्याने देशात महागाई वाढण्याची शक्यता आहे. भारत त्याच्या गरजेपैकी 85 टक्के कच्चे तेल दुसऱ्या देशांकडून आयात करतो. ब्लुमबर्गच्या मते रॅपिडन एनर्जी ग्रुपचे अध्यक्ष आणि व्हाईस हाऊसचे माजी अधिकारी बॉब मॅकनेली यांनी म्हटले आहे की जर इस्राइलने इराणच्या तेलाच्या संबंधित जागांवर हल्ले केले तर तेलाचे भाव तात्काळ वाढतील. सोमवारी जागतिक बाजाराची सुरुवात कच्चा तेलाच्या दरवाढीने झाली आहे. ब्रेंट क्रुड 2.28 टक्के वाढून 86.86 डॉलर प्रति बॅरल पोहचले आहे. तर डब्ल्यूटीआयमध्ये 3 टक्के वाढ झाली आहे.
भाव 100 च्या खाली असणे गरजेचे
इस्राइल आणि हमास यांच्यातील युद्ध लांबणे चिंताजनक होईल असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. क्रुड तेलाच्या किंमती भडकल्या तरी भारत याबाबतीत सध्या चांगल्या स्थितीत आहे. तरीही तेलाचे भाव 100 डॉलर प्रति बॅरल रहाणे गरजेचे आहे. पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांनी भारताच्या स्थितीवर आपण नजर ठेवून असल्याचे म्हटले आहे. पुढे कोणती पावले उचलायची याचा निर्णय घेऊ असे हरदीप पुरी यांनी म्हटले आहे. अदानी पोर्ट्स एण्ड एसईझेड यांनी सोमवारी म्हटले की इस्राइलमधील हाइफा पोर्ट येथील त्यांची सर्व कर्मचारी सुरक्षित असल्याचे म्हटले आहे.