Crude Oil | Russia-Ukraine War मुळे अनेक देश कंगाल, पण तेल कंपन्या दाबून कमावतायत पैसा, समजून घ्या गणित
Crude Oil | एका तेल कंपनीच प्रॉफिट 90 हजार कोटीच्या पुढे. यात रिलायन्स इंडस्ट्रीच सुद्धा नाव आहे. तेलाच आर्थिक गणित पाहिल्यानंतर पडद्यामागून युद्धाला का रसद पुरवली जाते? ते लक्षात येईल.
नवी दिल्ली : रशिया-युक्रेन युद्धाला आता जवळपास दीडवर्ष होत आलय. पण अजूनही युद्ध संपण्याची चिन्ह दूर-दूर पर्यंत दिसत नाहीयत. या युद्धामुळे जगातील अनेक देश मंदीच्या गर्तेत अडकले आहेत. जगभरात महागाई वाढत चाललीय. पण या दरम्यान काही तेल कंपन्या मात्र मालामाल होत आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी या तेल कंपन्यांची कमाई पाहून देवापेक्षा जास्त नफा कमावणारे असं म्हणाले होते.
एक्सॉनमोबिलच नोव्हेंबर 2022 पर्यंतच प्रॉफिट पाहून अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी देवापेक्षा जास्त नफा कमवणारे असं म्हटलं होतं. एक्सॉनमोबिल ही जगातील सर्वात मोठी तेल कंपनी आहे. एक्सॉनमोबिलने वर्ष 2023 मधील पहिल्या तिमाहीचे जानेवारी-मार्च पर्यंतचे आकडे जाहीर केले आहेत. कंपनीच प्रॉफिट अनेक देशांच्या जीडीपीच्या बरोबरीच पोहोचलं आहे.
पहिल्या 3 महिन्यात एका तेल कंपनीच प्रॉफिट 93,823 कोटी रुपये
रशिया-युक्रेन युद्धामुळे पाश्चिमात्य देशांनी रशियावर अनेक प्रकारचे निर्बंध घातले आहेत. त्यामुळे जगभरातील तेल व्यापारात मोठं असंतुलन निर्माण झालाय. पाश्चिमात्य देशातील कंपन्या मोठ्या प्रमाणात नफा कमावतायत. सर्वप्रथम आपण एक्सॉनमोबिल बद्दल बोलू. जानेवारी ते मार्च 2023 च्या तिमाहीत कंपनीचा नेट प्रॉफिट 11.43 अब्ज डॉलर पर्यंत पोहोचलाय. म्हणजे जवळपास 93,823 कोटी रुपये होतात. वर्षभरापूर्वी याच अवधीच हेच प्रॉफिट 5.48 अब्ज डॉलर म्हणजे जवळपास 44,982 कोटी रुपये होतं.
रिलायन्स इंडस्ट्री या कंपनीसोबत करते काम
याच प्रमाणे शेवरॉन कॉर्पोरेशनच प्रॉफिट 2023 च्या पहिल्या तिमाहीत 6.6 अब्ज डॉलर आणि शेलच प्रॉफिट 8.7 अब्ज डॉलर होतं. बीपीच नेट प्रॉफिट या दरम्यान 8.2 अब्ज डॉलर राहील. ब्रिटनची प्रमुख तेल कंपनी बीपी भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीसोबत मिळून काम करते. युद्ध काळात रिलायन्स इंडस्ट्रीजने रशियाकडून मोठ्या प्रमाणात स्वस्तात कच्चा तेलाची खरेदी केलीय.
जामनगरमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजची जगातील सर्वात मोठी रिफायनरी आहे. रशियाकडून विकत घेतलेलं कच्च तेल रिफाईन केल्यानंतर युरोपियन देशांना तेलाची सर्वात जास्त निर्यात केली आहे.
युद्धात जय-पराजय सोडा, खरा खेळ तेलाचाच
रशिया-युक्रेन युद्धात पुढे काय होणार? हे भविष्यात समजेल. दोन्ही देशांपैकी कोणाची एकाची सरशी होईल. मागच्या काही वर्षात युरोप आणि अमेरिकेने हस्तक्षेप केलेल्या युद्धांकडे पाहिल्यास खरा खेळ तेलाचा असल्याच तुमच्या लक्षात येईल. इराक युद्ध आणि खाडी युद्धाबद्दल सगळ्यांनाच माहित आहे. यात सर्वात जास्त नफा कमावण्यामध्ये तेल कंपन्याच पुढे होत्या. इराक युद्धानंतर त्या देशात स्थिरता आली नसेल, पण अमेरिकन तेल कंपन्या मालामाल झाल्या. सध्या चालू असलेल्या रशिया-.युक्रेन युद्धाबद्दल बोलायच झाल्यास, अमेरिकेतील सर्वात मोठी तेल कंपनी एक्सॉनमोबिलचा नफा 150 वर्षाच्या इतिहासातील रेकॉर्ड स्तरावर पोहोचला आहे.