महिन्याला 8 लाख पगार, आठवड्याला 2 सुट्ट्या, तरी ‘या’ देशात मिळत नाहीयेत सफाई कामगार
भारतात प्यून आणि सफाई कामगारांचे वेतन 18 हजार रुपयांच्या आसपास असते, तिथे याच कामासाठी ऑस्ट्रेलियामध्ये 8 लाख रुपये प्रति महिना पॅकेज मिळत आहे.
कोणतंही काम छोटं किंवा मोठं नसतं, कोण काय काम करतो, यान एखाद्याची परीक्षा करू नये असं म्हणतात. पण भारतात (India) पियुन आणि सफाई कामगार यांचे काम कमी दर्जाचे समजले जाते. तरीही या नोकरीसाठी सर्व वर्गांतून लाखो अर्ज येत असतात. नोकरीच्या जागांपेक्षा त्यासाठी आलेले अर्ज कितीतरी प्रमाणात अधिक असतात. डी ग्रुप अंतर्गत येणाऱ्या सफाई कामगारांचे वेतन 18 हजार रुपयांच्या आसपास असते. पण जर याच कामासाठी कोणाला 8 लाख रुपये मिळत आहेत, असे तुम्हाला कोणी सांगितले तर तुमचा विश्वास बसेल का? हे खरं आहे. ऑस्ट्रेलियामध्ये (Australia) प्यून आणि सफाई कर्मचाऱ्यांना (peon and sweeper) कामासाठी महिन्याला 8 लाख रुपये पगार तसेच आठवड्यातून 2 दिवस सुट्टी असे पॅकेज देण्यात येत आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, ऑस्ट्रेलियात सध्या सफाई कामगारांची कमतरता आहे. त्यामुळेच त्यांना एवढ्या मोठ्या पॅकेजची ऑफर देण्यात येत आहे. मात्र त्यानंतरही हे काम करण्यासाठी कोणीही तयार नाही. या पॅकेजमध्ये 8 लाख रुपये पगार, आठवड्याला दोन सुट्ट्या आणि इतर सुविधांचाही समावेश आहे.
आठवड्यातून केवळ 5 दिवस काम
ऑस्ट्रेलियामध्ये प्यून आणि सफाई कर्मचारी यांना उत्तम पगारासह दर आठवड्याला 2 सुट्ट्या देखील मिळणार आहेत. म्हणजेच त्यांना आठवड्यातून केवळ 5 दिवसच काम करावे लागेल. तसेच त्यांच्या दिवसभरात 08 तासच काम करावे लागणार आहे. काही ठिकाणी या कामासाठी 72 लाख ते 1 कोटी रुपयांचे वार्षिक पॅकेजही ऑफर करण्यात आले आहे.
ओव्हर टाइम केल्यास अधिक वेतन
रिपोर्ट्सनुसार, ऑस्ट्रेलियात सध्या सफाई कर्मचारी आणि प्यून यांची कमतरता आहे. कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे कंपन्यांद्वारे नवनवीन ऑफर्स जाहीर करण्यात येत आहे. जर एखाद्या कर्मचाऱ्याला जास्त वेळ काम( ओव्हर टाईम) करावे लागले , तर त्यांना प्रति तासासाठी 3600 रुपये अधिक मिळतील, अशी माहिती ॲबसोल्युट डोमेस्टिक्स कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली. यापूर्वी ही रक्कम प्रति तासासाठी 2700 रुपये इतकी होती. मात्र आता ती वाढवण्यात आली आहे. पण एवढ्या ऑफर्सनंतरही या कामासाठी कामगार मिळत नाहीत, असेही त्यांनी सांगितले.
अर्बन या ऑस्ट्रेलियन कंपनीनुसार, सफाई कामगारांचे वेतन दुपटीने वाढवण्यात आले आहे. कंपनीच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सफाई कर्मचाऱ्यांना प्रति तासासाठी 4700 रुपये देण्यासही कंपनी तयार आहे. त्या हिशोबाने सफाई कर्मचाऱ्याचे वार्षिक पॅकेज 97 लाख रुपयांच्या आसपास होईल. मात्र अद्यापही या कामासाठी जास्त उमेदवार इच्छुक दिसत नाहीत.