israel hamas war | गाझा करा खाली, अन्यथा…इस्रायलचा शेवटचा इशारा
इस्रायल आणि हमासमध्ये 7 ऑक्टोबर पासून युद्ध सुरु आहे. गाझात रॉकेटद्वारे हल्ले सुरु असताना आता गाझातील रहिवाशांना शेवटची वॉर्निंग देत शहर खाली करायला सांगण्यात आले आहे.
तेल अवीव | 22 ऑक्टोबर 2023 : इस्रायली सैन्याने ( IDF ) पॅलेस्टिनी लोकांना गाझापट्टी रिकामी करण्याचे आदेश दिले आहेत. गाझातील लोकांना उत्तर गाझातून दक्षिणेकडे सरकण्यास सांगितले आहे. जर असे केले नाही तर हमासचे सुहानुभूतीदार म्हणून तुमच्यावर अतिरेकी म्हणून कारवाई केली जाईल असा शेवटचा इशारा इस्रायलने दिला आहे. अरबी भाषेत तशी पत्रके छापून हवाईमार्गाने गाझात टाकण्यात आली आहेत. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीत गाझापट्टीत मोबाईल फोनवर असे ऑडीओ संदेश देखील पाठविण्यात आले आहेत.
इस्रायल आणि हमासमध्ये 7 ऑक्टोबर पासून युद्ध सुरु आहे. गाझात रॉकेटद्वारे हल्ले सुरु असताना आता गाझातील रहिवाशांना शेवटची वॉर्निंग देत शहर खाली करायला सांगण्यात आले आहे. गाझाच्या उत्तरेला राहून तुम्ही तुमच्या जीवाला धोक्यात टाकत आहात. जो दक्षिणेला जाणार नाही त्यांना अतिरेकी म्हणून समजण्यात येईल असे इस्रायलने म्हटले आहे. हा संदेश अशा वेळी देण्यात आला आहे. ज्यावेळी गाझात हवाईहल्ले केल्यानंतर आता जमीनीवरील युद्धाची वेळ आली आहे. गाझाच्या सीमेवर मोठ्या शस्रसाठ्यांसह इस्रायलचे सैन्य मोठ्या लढाईसाठी सज्ज झाले आहे.
इस्रायली सैन्याने म्हटले आहे, जो उत्तरी गाझाचा परिसर रिकामा करणार नाही, अशा लोकांचा कोणताही मुलाहिजा बाळगला जाणार नाही. अशा स्थितीत जे येथून हटणार नाहीत त्यांना हमासचा पाठिराखा किंवा सुहानुभूतीदार मानले जाऊन अतिरेकी ठरविले जाईल असे इस्रायलने म्हटले आहे. सामान्य नागरिकांना या कारवाईतून जीव गमवावा लागू नये यासाठी गाझातील उत्तर क्षेत्रातील लोकांना वाडी गाझाच्या दक्षिण भागात जायची विनंती केली जात आहे.
वेगाने आक्रमण सुरु
गाझाच्या जमिनीवरील कारवाईबाबत रियर एडमिरल डॅनियल हगारी यांनी शनिवारी रात्री सांगितले की, इस्रायल आधीपासूनच परिस्थिती आपल्यासाठी अनुकूल बनविण्याचा प्रयत्न करीत आहेत हगारी यांनी सांगितले की युद्धाच्या पुढील टप्प्यात सैन्यासाठी धोका कमी करण्यासाठी आम्ही आमचे आक्रमण अधिक वेगावान करणार आहोत. आम्ही आतापासून वेगाने हल्ले सुरु करणार आहोत अस सांगत हगारी यांनी गाझावासियांनी दक्षिण दिशेला तातडीने निघून जावे असे सांगितले.
सीमा उघडल्याने पॅलेस्टिनींना मदत सुरु
हमासने दक्षिणी इस्रायली शहरांवर सात ऑक्टोबर पासून हल्ले केल्यानंतर गाझापट्टीची घेराबंदी करण्यात आली असून पाठोपाठ प्रत्युत्तरादाखल इस्रायलने कारवाई सुरु केली आहे. इजिप्त आणि गाझा दरम्यानची सीमा शनिवारी उघडण्यात आली. त्यामुळे गेल्या दोन आठवड्यात इस्रायलच्या घेराबंदीमुळे जेवण, औषधे आणि पाणी यांच्या तुटवड्याने त्रस्त झालेल्या पॅलेस्टिनी नागरिकांना मदत पोहचविण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.