मोबाईलशिवाय एक महिना जगून दाखवा आणि आठ लाख मिळवा ? या कंपनीची ऑफर
मोबाईलचे वेड साऱ्या जगाला लागले आहे. त्यामुळे मोबाईलला नाक चिकटवून राहणारी नवीन पिढी तयार झाली आहे. मोबाईलच्या वेडापासून दूर रहाण्यासाठी एका कंपनीने अनोखी ऑफर दिली आहे. एक महिना मोबाईलला दूर करा आणि आठ लाख रुपये मिळवा अशी ती ऑफर आहे.
मुंबई | 22 जानेवारी 2024 : मोबाईल फोनने आपले जीवन व्यापले आहे. एक क्षणही आपण मोबाईल शिवाय दूर राहू शकत नाही. रात्री झोपण्यापासून सकाळी उठल्याबरोबर आपल्याला मोबाईलमध्ये डोकं खूपसून बसावे लागते. लोकल ट्रेन असो किंवा मेट्रो सर्वत्र मोबाईलमध्ये मान वाकून लोक मोबाईल पाहातानाच दिसतात. त्यामुळे मोबाईलपासून आपले पानही हालत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. अबालवृद्ध मोबाईलच्या इतके आहारी गेले आहेत की मोबाईल शिवायच्या जगाची कल्पनाच कोणी करु शकत नाही. अशात एका कंपनीने एक महिना मोबाईलपासून दूर राहील्यास 8 लाख रुपयांचे बक्षिस जाहीर केले आहे.
मोबाईल स्मार्ट फोन झाल्यापासून आता सर्व कामे मोबाईलवर होत आहेत. लाईटचे बिल भरण्यापासून ते बॅंकेची कामे मोबाईलवर चुटकीसरसी होत आहे. त्यामुळे मोबाईल तसा गरजेचा झालेला आहे. परंतू तरुण पिढीपासून ते लहान मुलापर्यंतची मंडळी मोबाईलपासून एक क्षणही दूर राहत नाहीत. त्यामुळे मोबाईलचे व्यसन इतके झाले आहे. लोक या व्यसनात दिवसेंदिवस गुरफटत चालले आहेत. अशात आता एका कंपनीने डिजिटल डिटॉक्स मोहिमे अंतर्गत मोबाईल व्यसनापासून दूर राहण्याचे अनोखे चॅलेंज दिले आहे. या चॅलेंजमध्ये तुम्हाला एक महिना मोबाईलपासून दूर रहावे लागणार आहे. हे चॅलेंज स्वीकारणाऱ्यांना तब्बल 8 लाख रुपये बक्षिस मिळणार आहे.
डिजिटल फ्री होण्याचे आव्हान
अमेरिका स्थित डेअरी कंपनी सिग्गीने (Siggi’s ) डिजिटल डिटोक्स प्रोग्रॅम अंतर्गत अनोखे चॅलेज दिले आहे. तुम्ही मोबाईल फोन पासून एक महिना दूर राहिल्यास तुम्हाला 10,000 डॉलर ( 8.3 लाख रु. ) दिले जाणार आहेत. सिग्गी हा योगर्टचा ब्रॅंड असून त्याची ही ऑफर जगभरात चर्चेला आली आहे. अल्कोहोल या व्यसनापासून दूर रहाण्यासाठी अमेरिकेत डिटॉक्स मोहीमेंतर्गत ड्राय जानेवारी साजरा केला जातो.
रोज सरासरी 5.4 तास मोबाईल स्क्रोल
मोबाईल फोन हे सध्या मनुष्य जीवन विचलित करणारे सर्वात मोठे कारण आहे. त्यामुळे आपले दैनंदिन जीवन डिस्ट्रब झाले आहे. मनुष्य दररोज सरासरी 5.4 तास मोबाईल स्क्रोल करण्यात दवडतो असे या कंपनीच्या वेबसाईटवर म्हटले आहे. ही स्पर्धा जिंकणाऱ्या स्पर्धकांना दहा हजार डॉलर सह स्मार्टफोन लॉक, चांगला फ्लिप फोन, एक महिन्याचे प्री-पेड सिम कार्ड आणि 3 महिन्यांचे सिग्गीचे योगर्ट ( दही ) जिंकण्याची संधी देखील मिळणार आहे. स्पर्धकांनी डिजिटल फ्री होण्यासाठी 31 जानेवारीपर्यंत अर्ज करावे असे कंपनीचे क्रिस्टीना ड्रोसियाक यांनी म्हटले आहे