नेपाळमध्ये मोठं राजकीय संकट! पंतप्रधान केपी शर्मा ओली विश्वासदर्शक ठराव हरले
नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांना सोमवारी मोठा झटका बसलाय. संसदेत त्यांना विश्वासदर्शन ठराव जिंकता आलेला नाही.
नवी दिल्ली : नेपाळमध्ये पुन्हा एकदा राजकीय संकट गहीरं बनलं आहे. कारण पंतप्रधान केपी शर्मा ओली यांना सोमवारी मोठा झटका बसलाय. संसदेत त्यांना विश्वासदर्शन ठराव जिंकता आलेला नाही. सोमवारी संसदेत झालेल्या मतदान प्रक्रियेत ओली यांच्या समर्थनात फक्त 93 मतं पडली. त्यांच्या विरोधात 124 जणांनी मतदान केलं. तर 15 जणांनी मतदान न करणंच पसंत केलं. (Nepal’s PM KP Sharma Oli lost the confidence vote)
पुष्पकमल दहल ‘प्रचंड’ यांच्या नेतृत्वातील नेपाळ कम्युनिस्ट पार्टीने ओली सरकारला दिलेला पाठिंबा काढून घेतला होता. त्यामुळे ओली यांना बहुमत सिद्ध करावं लागणार होतं. कोरोना संकटाच्या काळात नेपाळमध्ये विश्वासदर्शक ठरावावरील मतदानासाठी सोमवारी विशेष सत्र बोलावण्यात आलं होतं. ओली यांना 275 सदस्यीय सदनात बहुमत सिद्ध करण्यासाठी विश्वासमत जिंकणं गरजेचं होतं. सोमवारी एकूण 232 सदस्यांनी मतदानात हिस्सा घेतला.
समर्थन काढल्यानं ओली सरकार अल्पमतात
पुष्पकमल दहल यांच्या नेतृत्वातील नेपाळ कम्युनिस्ट पार्टीने सरकारचं समर्थन काढून घेतलं. त्यानंतर ओली सरकार अलपमतात आलं होतं. त्यामुळे नेपाळमध्ये मोठं राजकीय संकट निर्माण झालं आहे. नेपाळमधील राजकीय अस्थिरतेची चर्चा जगभरात सुरु होती. इतकंच नाही तर चीनने या प्रकरणात हस्तक्षेप करण्याचाही प्रयत्न केला होता.
ओली यांची बहुमताची अपेक्षा फोल
संसदेची कार्यवाही सुरु होण्यापूर्वी केपी शर्मा ओली यांनी आपल्या आपल्या पार्टीतील सदस्यांना मतदान करण्याचं आवाहन केलं होतं. त्यांनी एक ट्वीट करुन आपण विश्वासदर्शक ठराव जिंकू असा दावा केला होता. जर काही अंतर्गत असहमती किंवा असंतोष असेल तर तो चर्चा करुन सोडवला जाऊ शकतो. त्यांनी पक्षातील सदस्यांना कुठलाही निर्णय विचारपूर्वक करण्याचंही आवाहन केलं होतं.
केपी शर्मा ओली हे फेब्रुवारी 2018 मध्ये प्रचंड यांची नेपाळ कम्युनिस्ट पार्टीच्या पाठिंब्यावर पंतप्रधानपदी विराजमान झाले होते. मात्र मार्चमध्ये सर्वोच्च न्यायालयाने पक्षाचं विलिनीकरण रद्द केलं होतं. ओली सरकारवर आरोप करण्यात येत होते की त्यांनी संविधानाचं उल्लंघन केलं आणि राष्ट्रीय सार्वभौमत्वाचा धोका निर्माण केला.
इतर बातम्या :
भारतात कोरोना संपण्यासाठी ‘हा’ एकमेव उपाय, अमेरिकेच्या मुख्य आरोग्य सल्लागारांकडून सुतोवाच
वादळी वाऱ्याने चीनच्या प्रसिद्ध Glass bridge चं नुकसान, पर्यटक 330 फुटांवर लटकतानाचा फोटो
Nepal’s PM KP Sharma Oli lost the confidence vote