दीड वर्षांची बेबी अरिहा दोन वर्षांपासून जर्मनीत अडकली, आई-वडीलांचे गुजरातमध्ये आंदोलन
गुजरातचे एक दाम्पत्य आपल्या दीड वर्षीय मुलीसह वर्क व्हीसावर बर्लीनला गेले होते. त्याचे हसत्या खेळत्या कुटुंबाला एका घटनेने नजर लागली.
नवी दिल्ली | 3 ऑगस्ट 2023 : जर्मनीत अडकलेल्या अवघ्या दीड वर्षांची बेबी अरिहा शाह हीच्या सुटकेसाठी तिच्या आई-वडीलांचा संघर्ष सुरु आहे. अरिहा हीला जर्मनीच्या फोस्टर केअरमध्ये गेल्या 20 महिल्यापासून ठेवले आहे. या प्रकरणात केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा अशी मागणी तिच्या आई-वडीलांनी केली आहे. या प्रकरणात आता केंद्र सरकारने या आठवड्यात जर्मनीच्या राजदूतांना समन्स बजावण्यात आले होते. काय आहे हे नेमके प्रकरण पाहूया
भारतीय बालिका अरिहा हीच्या सुटकेसाठी भारताने या आठवड्यात जर्मनीचे राजदूत फिलीप एकरमॅन यांना विनंती केली होती. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता अरिंदम बागची यांनी म्हटले आहे की अरिहा प्रकरणात आम्ही जर्मनीला विनंती केली आहे की मुलीला धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक वातावरण गरजेचे आहे. गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांनीही अरिहा प्रकरणात जर्मनीचे परराष्ट्र मंत्री एनालेना बायरबॉक यांच्या समोर चिंता व्यक्त केली होती. कुटुंबियांनी आरोप केला आहे एका ख्रिश्चन दाम्पत्याकडे मुलीला सोपविण्यात आले असून आता आपली मुलगी जर्मनी बोलत आहे.
काय आहे नेमके प्रकरण
गुजरातचे एक दाम्पत्य आपल्या दीड वर्षीय मुलीसह वर्क व्हीसावर बर्लीनला गेले होते. त्याचे हसत्या खेळत्या कुटुंबाला एका घटनेने नजर लागली. मुलगी अरिहा हीच्या प्रायव्हेट पार्टला जखम झाल्याने तिला तेथील रुग्णालयात नेले असता आई-वडीलांवर लैंगिक शोषणाचा आरोप लावण्यात आला. त्यानंतर तेथील प्रशासनाने तिला फोस्टर केअरमध्ये मुलीची रवानगी केली. सप्टेंबर 2021 पासून हे आई-बाप मुलीला ताब्यात देण्यासाठी कायदेशीर लढाई लढत आहेत. डॉक्टरांना अरिहाच्या डायपरवर रक्त आढळले तेव्हा पासून तिची रवानगी बर्लिन प्रशासनाने फोस्टर केअर होममध्ये केली. जर्मन सरकारच्या नियमानूसार जर एखादी मुलाला फोस्टर केअरमध्ये दोन वर्षांपेक्षा अधिक काळ रहाते तेव्हा त्याला त्याच्या आई-वडीलांच्या ताब्यात दिले जात नाही.
अरिहासाठी आंदोलन
या प्रकरणाचा खटला लढायला अनेक वर्षे लागतील. तोपर्यंत मुलीला आमच्या ताब्यात देणार नाही का ? असा सवाल तिची आई धारा शाह यांनी केला आहे. मुलीचा ताबा मिळावा यासाठी गुजरातच्या भाजपा कार्यालयाबाहेरही धारा यांनी आंदोलन करीत पंतप्रधानांनी या प्रकरणात लक्ष घालावे अशी मागणी धारा आणि भावेश शाह यांनी केली आहे. या दाम्पत्याने दिल्लीतील जंतरमंतरवरही आंदोलन केले आहे.