India-Pakistan | पाकिस्तानचे पंतप्रधान चर्चेसाठी तयार, पण भारत म्हणाला आधी ही अट पूर्ण करा
भारत-पाकिस्तान यांच्यातील संबंध सामान्य करण्यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान तयार असल्याचं म्हटलं आहे. पण भारताने त्यांना चोख प्रत्यूत्तर दिले आहे.
नवी दिल्ली : पाकिस्तानचे पंतप्रधान ( Pakistan PM ) शाहबाज शरीफ यांनी भारताशी पुन्हा चर्चा सुरू करण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण शाहबाज शरीफ यांना भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने चोख प्रत्युत्तर दिले आहे. गंभीर मुद्द्यांवर शांततापूर्ण पद्धतीने चर्चा होईपर्यंत भारत-पाकिस्तान ( India – Pakistan ) चांगले शेजारी’ होऊ शकत नाहीत, असे शाहबाज म्हणाले होते. आता युद्ध हा पर्याय नाही, असेही ते म्हणाले होते.
परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत त्यांना चोख उत्तर दिले आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी म्हटले की, भारतालाही आपल्या शेजाऱ्यांशी मैत्रीपूर्ण संबंध हवे आहेत पण त्यासाठी दहशतवादमुक्त वातावरण आवश्यक आहे. त्यासाठी दहशतवाद आणि शत्रुत्वमुक्त वातावरण आवश्यक आहे.
मंगळवारी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ म्हणाले होते की, सर्व गंभीर आणि प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी त्यांना भारतासोबत चर्चा करायची आहे. दोन्ही देश गरिबी आणि बेरोजगारीशी लढत असल्याने युद्ध हा दोन्ही देशांसाठी पर्याय नाही. आम्ही सर्वांशी चर्चा करण्यास तयार आहोत, अगदी आमच्या शेजाऱ्याशीही, जर शेजारी गंभीर विषयांवर बोलण्यास गंभीर असेल, कारण युद्ध आता पर्याय नाही.
मोदी सरकारने शरीफ सरकारला सडेतोड उत्तर दिले आहे. आम्हालाही शेजाऱ्यांशी चांगले संबंध हवे आहेत. पण त्यासाठी शत्रुत्व आणि दहशतमुक्त वातावरण आवश्यक आहे. काश्मीरसह सीमापार दहशतवादाला इस्लामाबादच्या समर्थनावरून भारत आणि पाकिस्तानमधील संबंधांमध्ये वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर शरीफ यांचे वक्तव्य आले आहे.
#WATCH हमने रिपोर्टें देखी हैं। भारत का रुख इस बात पर कायम है कि हम सभी देशों के साथ मैत्रीपूर्ण संबंध चाहते हैं…लेकिन इसके लिए आतंक और शत्रुता से मुक्त वातावरण जरूरी है: देशों के बीच बातचीत को लेकर पाकिस्तान के पीएम शहबाज शरीफ की भारत पर टिप्पणी पर विदेश मंत्रालय के प्रवक्ता… pic.twitter.com/GpsATHFJMf
— ANI_HindiNews (@AHindinews) August 3, 2023
दहशतवाद आणि शत्रुत्वमुक्त वातावरण निर्माण करणे ही पाकिस्तानची जबाबदारी असल्याचेही मोदी सरकारने म्हटले आहे. जम्मू-काश्मीर हा नेहमीच देशाचा भाग होता, आहे आणि राहील, असेही भारताने म्हटले आहे. पाकिस्तानच्या पंतप्रधानांची ही टिप्पणी अशा वेळी आली आहे जेव्हा संसदेचा पाच वर्षांचा कार्यकाळ १२ ऑगस्ट रोजी पूर्ण होत आहे आणि त्यांचे आघाडी सरकार निवडणुकीच्या तयारीत आहे. पुढील निवडणुकीसाठी अधिक वेळ देण्यासाठी नॅशनल असेंब्ली, कनिष्ठ सभागृह तिचा कार्यकाळ संपण्याच्या काही दिवस आधी विसर्जित केले जाईल अशी अपेक्षा आहे.