निवडणूकांपूर्वी होणार बालाकोट सारखा हल्ला, पाकिस्तानच्या पंतप्रधानांना वाटतेय भीती
भारत लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा बालाकोट सारखा एअरस्ट्राईक करु शकतो अशी भीती पाकिस्तानला वाटत आहे. यामुळे पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान काकर यांनी भारताने असे साहस केल्यास त्याला गेल्यावेळेसारखे चोख उत्तर दिले जाईल असे म्हटले आहे.
मुंबई | 10 जानेवारी 2024 : पुलवामा हल्ल्यानंतर भारताने चार वर्षांपूर्वी साल 2019 मध्ये 14 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानच्या हद्दीत घुसून बालाकोट येथे एअर स्ट्राईक केला होता. या हल्ल्यानंतर पाकिस्तान हादरला होता. या हल्ल्यात काही अतिरेकी प्रशिक्षण शिबिरांना उद्धवस्त केले होते. या दरम्यान भारत आणि पाकिस्तानची जेट फायटर विमाने एकमेकांना भिडली होती. त्यामुळे दोन्ही देशात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पाकिस्तानने विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर पाकिस्तानने वर्धमान यांना सहीसलामत सोडून दिले होते.
आता पाकिस्तानचे कार्यकारी पंतप्रधान अनवारुल हक काकर यांना वेगळीच भीती सतावत आहे. भारत लोकसभा निवडणूकीपूर्वी पाकिस्तानवर पुन्हा बालाकोट सारखा एअर स्ट्राईक करु शकतो अशी भीती काकर यांना सतावत आहे. पाकचे पंतप्रधान काकर यांनी भारताने जर पुन्हा साल 2019 सारखा एअर स्ट्राईक केला तर आम्ही त्यांना योग्य ते उत्तर देऊ अशी दर्पोक्ती पाकिस्तानचे काळजी वाहू पंतप्रधान काकर यांनी केली आहे.
एका पॉडकास्टमध्ये पाक पंतप्रधान काकर यांनी म्हटले आहे की, ‘आमच्या भूमिवर हल्ला केला तर आम्ही साल 2019 मध्ये जशी कारवाई केली तशीच करु. आम्ही भारताच्या विमानांना पाडू टाकू. आमच्या युद्ध साहित्य, गोळ्या जुन्या झालेल्या नाहीत आणि आमचा निर्धारही देखील कमजोर झालेला नाही. आमच्याकडे गोळ्या देखील नवीन आहेत. आणि आमचा निर्धार देखील नव्या दमाचा आहे. अशा स्थितीत कोणीही पाकिस्तानच्या उत्तराबद्दल भ्रमात राहू नये,’ असेही काकर यांनी म्हटले आहे.
काश्मीर बाबत वल्गना
पाकिस्तान आणि भारताने एकत्र येऊन काश्मीरची समस्या हाताळली पाहीजे. काश्मीर वाद सुटल्याशिवाय येथील संघर्ष संपणार नाही. आणि तणाव वाढतच राहील. काश्मीरचा मुद्दा केवळ काश्मीरचे लोक आणि भारत-पाकिस्तान पुरता मर्यादित नाही तर संपूर्ण साऊथ आशियाला प्रभावित करणारा असल्याची दर्पोक्ती पाकिस्तानचे पंतप्रधान काकर यांनी केली आहे.
निवडणूकांवर दहशतवादाचा धोका
पाकिस्तानमध्ये पुढच्या महिन्यात निवडणूका आहेत. या निवडणूकांवर दहशतवादाचा धोका आहे. विशेष करून दक्षिणी खैबर पख्तूनख्वा आणि बलुचिस्तान काही क्षेत्रात दहशतवादी हल्ल्याची भीती आहे. यामुळे निवडणूकीतील उमेदवारांना भीती वाटत आहे. काही अडचणी आहेत, परंतू संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर संशय घेणे चुकीचे असल्याचे पंतप्रधान काकर यांनी म्हटले आहे.