मोदींची श्रीलंकेच्या राष्ट्रपतींशी चर्चा; तीन दिवसाच्या श्रीलंका दौऱ्यात काय घडणार?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा तीन दिवसीय कोलंबो दौरा द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यावर केंद्रित आहे. ऊर्जा, व्यापार, संपर्क, डीजिटलीकरण आणि संरक्षण या क्षेत्रातील सहकार्यावर भर देण्यात येणार आहे. श्रीलंकेच्या आर्थिक संकटानंतरच्या पुनर्बांधणीत भारताच्या मदतीचेही महत्त्व आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी संध्याकाळी तीन दिवसाच्या कोलंबो दौऱ्यावर गेले आहेत. द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यासाठीच्या प्रयत्नांचा शोध घेणं हा या दौऱ्याचा हेतू आहे. भारत आणि श्रीलंकेदरम्यान ऊर्जा, व्यापार, संपर्क, डीजिटलीकरण आणि संरक्षणाच्या क्षेत्रातील संबंध मजबूत करण्यावर मोदींच्या दौऱ्यात भर राहणार आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या दौऱ्याकडे जगाचं लक्ष लागलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कोलंबोत पोहोचल्यावर श्रीलंकेचे परराष्ट्र मंत्री विजिता हेराथ, आरोग्य मंत्री नलिंदा जयतिसा आणि मत्स्य पालन मंत्री रामलिंगम चंद्रशेखरसहीत पाच वरिष्ठ मंत्र्यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं. कोलंबोत गेल्यावर मोदींनी ट्विट केलं आहे. मी कोलंबोत पोहोचलो आहे. विमानतळावर माझं स्वागत करआणाऱ्या मंत्री आणि सन्मानिय व्यक्तींचा मी आभारी आहे. मी श्रीलंकेत होणाऱ्या कार्यक्रमांची वाट पाहत आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
बँकॉकवरून श्रीलंकेत
पंतप्रधान मोदी हे बँकॉकला गेले होते. बँकॉकचा दौरा आटोपल्यानंतर ते श्रीलंकेच्या राजधानीत आले. या ठिकाणी त्यांनी बिम्स्टेक शिखर संमेलनात भाग घेतला होता. मोदी आज राष्ट्रपती अनुरा कुमारा दिसानायके यांच्यासोबत व्यापक चर्चा करणार आहेत. या बैठकीनंतर भारत आणि श्रीलंकेदरम्यान संरक्षण, ऊर्जा आणि डीजिटलीकरण क्षेत्रात सहयोग वाढवण्यावर भर दिला जाणार आहे.
तीन महिन्यापूर्वी श्रीलंकेच्या राष्ट्रपतींच्या नवी दिल्लीतील दौऱ्यावेळी संयुक्त दृष्टीकोन स्वीकारला होता. ज्या करारांना अंतिम स्वरुप दिलं जाऊ शकतं अशा सात करारांपैकी संरक्षण सहकार्यावरील एक करार महत्त्वाचा असू शकतो. त्याशिवाय तीन आणखी परिणामही समोर येऊ शकतात.
या करारावर स्वाक्षऱ्या झाल्यास संरक्षण सहकार्याने भारत-श्रीलंकेचा संरक्षण क्षेत्रातील प्रगतीचा मार्ग मोकळा होणार आहे. यामुळे सुमारे 35 वर्षांपूर्वी भारताने श्रीलंकेतून भारतीय शांतता फौज (IPKF) मागे घेतल्याच्या कटू अध्यायावर पडदा टाकला जाईल.
मोदी- दिसानायके बैठक
द्वीपदेश आर्थिक तणावातून सावरण्याचे संकेत देत असताना मोदींचा श्रीलंका दौरा होत आहे हे महत्त्वाचे. दोन वर्षांपूर्वी श्रीलंकेने मोठ्या आर्थिक संकटाचा सामना केला होता, आणि भारताने श्रीलंकेला 4.5 अब्ज अमेरिकी डॉलर्सची आर्थिक मदत दिली होती. मोदी आणि दिसानायके यांच्यातील चर्चेनंतर, कर्ज पुनर्रचनेबाबत भारताची मदत आणि चलन विनिमयावर आणखी एक दस्तऐवज जाहीर होण्याची शक्यता आहे.
कोलंबोमधील भारतीय उच्चायुक्त संतोष झा यांनी सांगितले की, भारताची श्रीलंकेला दिलेली मदत जगात इतर कोणत्याही देशाला दिलेल्या मदतीच्या तुलनेत “अभूतपूर्व” होती. झा म्हणाले, “ही एक अत्यंत मोठी मदत होती आणि आम्ही विविध क्षेत्रांमध्ये श्रीलंकेला मदत देत राहण्यासाठी त्यांच्यासोबत काम करत आहोत, याचे येथे मोठे कौतुक केले जाते.”
आयएमएफने श्रीलंकेला विस्तारित निधी सुविधा (Extended Fund Facility) प्रदान करण्याचा निर्णय घेण्यासाठी भारत हा आर्थिक हमी देणारा पहिला देश होता, आणि ही योजना सध्या श्रीलंकेत कार्यरत आहे, असंही त्यांनी सांगितलं.