News9 Global Summit : वडिलांच्या काळात परिस्थिती कठीण, आजचा भारत बदललाय – रामू राव जुपल्ली
देशातील नंबर -1 न्यूज नेटवर्क TV9 च्या News9 ग्लोबल समिटच्या जर्मन आवृत्तीसाठी महामंच सज्ज झाला आहे. या समिटच्या पहिल्या दिवशी माय होम ग्रुपचे व्हाईस चेअरमन रामू राव जुपल्ली यांनी एंटरप्रेनरशिपवरआपले विचार मांडले. आजचा भारत बदलला असून नव्या उत्साहाने, उर्जेने पुढे जात असल्याचे त्यांनी नमूद केलं.
News9 ग्लोबल समिटला प्रचंड उत्साहात सुरूवात झाली आहे. या समिटमध्ये सहभागी होता आल्यामुळे मला खूप आनंद होतोय, अशी भावना माय होम ग्रुपचे व्हाईस चेअरमन रामू राव जुपल्ली यांनी व्यक्त केली. त्याच्या काही वेळ आधी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव आणि संचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी भारताला गतिमान करणाऱ्या उर्जेबद्दल त्यांचे विचार मांडले.
रामू राव जुपल्ली यांनी मांडले विचार
मी एका बिझनेस फॅमिलीमधून आहे. माझ्या वडिलांच्या काळात असलेल्या भारतापेक्षा आजचा भारत किती वेगळा आहे, हे मी निश्चितपणे सांगू शकतो. माझे वडील रामा राव जुपल्ली यांनी होमिओपथी डॉक्टर म्हणून करिअर सुरू केलं. पण त्यांना उद्योग करायचा होता, रोजगार निर्माण करायची त्यांची इच्छा होती. स्वत:साठी आणि गुंतवणूकदारांसाठी त्यांना संपत्ती वाढवायची होती.
ते शेतकरी कुटुंबातून होते, त्यामुळे त्यांच्याकडे कोणताही आर्थिक आधार नव्हता ना त्यांना सपोर्ट करण्यासाठी कोणी होतं. पण त्यांनी करिअर स्विच केलं आणि एका प्लॉटपासून सुरूवात केली. त्यांना एक रिअल इस्टेट कंपनी सुरू करण्याची संधी मिळाली आणि नंतर ते सिमेंट उद्योगाच्या दिशेने (पुढे) वळले. माझ्या वडिलांनी सुरू केलेल्या कंपनीने आज 50 दशलक्ष चौरस फुटांपेक्षा जास्त बांधकाम केले आहे आणि अनेक दशलक्ष चौरस फूट विकसित केले आहे. एवढंच नव्हे तर सिमेंट उद्योगात दरवर्षी 12 दशलक्ष टन सिमेंटचे उत्पादन होत असून ते भविष्यात 20 दशलक्ष टनांपर्यंत वाढवण्याचे आमचे लक्ष्य आहे.
वडिलांनी केला कठोर संघर्ष
माय होम ग्रुपचे व्हाईस चेअरमन रामू राव जुपल्ली म्हणाले – माझ्या वडिलांनी हा उद्योग यशस्वी करण्यासाठी कठोर संघर्ष केला. पण खेददायक गोष्ट म्हणजे त्यावेळी भारतात उद्योगासाठी अनुकूल असं वातावरण नव्हतं. मात्र आजची परिस्थिती वेगळी आहे. आज भारताचे स्टार्टअप मूल्य हे 1 अब्ज डॉलरपेक्षा अधिक आहे. जगाच्या कानाकोपऱ्यातून असंख लोक भारतात गुंतवणूक करत आहेत, कारण त्यांना असा विश्वास आहे की भारत हा हुशार आणि तरूण लोकांचा देश आहे.
आज देशात आव्हानं आणि संधी दोन्ही आहे. मला माझ्या वडिलांपेक्षा चांगली कामगिरी करायची आहे, असं एक तरूण उद्योजक म्हणून माझं मत आहे. भविष्यातील एंटरप्राइज बिल्डिंगचा व्यवसाय म्हणून महत्त्वाच्या ठरतील अशा चार गोष्टी माझ्या मनात नेहमी असतात. यापैकी पहिलं म्हणजे स्केल आहे, माझा विश्वास आहे की सोडवायची समस्या जगातील शक्य तितक्या लोकांशी संबंधित असावी. दुसरी गोष्ट म्हणजे तंत्रज्ञान. भविष्यात आपण काहीही करू, पण तंत्रज्ञान त्यात केंद्रस्थानी असेल. एक उद्योजक म्हणून, मला माझ्या व्यवसायाला एक मजबूत डिजिटल आधार द्यायचा आहे. तिसरी गोष्ट म्हणजे शाश्वतता आणि चौथी भांडवलशाही.