Global Worming: ग्लोबल वॉर्मिंगचा फटका! येत्या काही वर्षात हा देश जाणार पाण्याखाली?
ग्लोबल वार्मिंचा फटका एका देशाला इतका मोठा बसला आहे की, येत्या काही वर्षात हा देश पाण्याखाली जाण्याची भीती निर्माण झाली आहे.
मुंबई, तुम्ही ज्या देशात राहता, तो देश येत्या काही वर्षांत जगाच्या नकाशावरून गायब झाला तर तुम्हाला कसे वाटेल? हा विचार देखील अंगावर काटा आणणारा आहे, परंतु अनेक देश प्रत्यक्षात अशा परिस्थितीच्या मार्गावर आहेत. खरं तर, सध्या इजिप्तमध्ये (Egypt) झालेल्या COP27 शिखर परिषदेत (Summit) सेशेल्स या आफ्रिकन देशाच्या एका विद्यार्थिनीनेही भाग घेतला आणि तिच्या देशातील हवामान बदलामुळे (Climate change) भविष्यात उद्भवणाऱ्या संकटांबाबत संपूर्ण जगाला इशारा दिला.
सेशेल्समधील 21 वर्षीय नथालिया लॉवेनने तिच्या देशाची प्रतिनिधी म्हणून COP27 मध्ये भाग घेतला. वयाच्या 21 व्या वर्षी, नथालिया प्रदूषणामुळे होत असलेल्या दुष्परिमाणामाबद्दल जनजागृती करते. तिच्या देशात हवामान बदलामुळे होणारे नुकसान कमी करण्याचा ती प्रयत्न करत आहे.
सेशेल्स कसा होता हे भविष्यातल्या पिढीला कधीच कळणार नाही
सेशेल्समध्ये हवामानात अचानक बदल होत असून समुद्राच्या पातळीतही वाढ होत असल्याचे नथालिया यांनी या परिषदेत सांगितले. नथालिया म्हणाल्या की, आम्ही आता ठोस पाऊलं उचलली नाही तर सेशेल्स कसा होता हे आमच्या पुढच्या पिढीला कधीच कळणार नाही. हे अत्यंत भयानक वास्तव असल्याचेही ती म्हणाली.
ही चिंता केवळ आपल्या भूमीची नसून संस्कृती आणि सभ्यतेची आहे, असे नथालिया यांनी सांगितले. नथालिया म्हणाल्या की, काही देश म्हणतात की, ही त्यांची समस्या नाही, मात्र हवामान निर्वासित आणि स्थलांतरामुळे येणाऱ्या काळात संपूर्ण जगाला प्रभावित करणारी ही एक मोठी समस्या असेल.
सेशेल्सच्या राष्ट्राध्यक्षांनीही दिला दुजोरा
शिखर परिषदेदरम्यान, सेशेल्सचे अध्यक्ष वावेल रामक्लावन म्हणाले की, त्यांच्या देशाला हवामान बदलाचा सर्वाधिक फटका बसला आहे, विशेष म्हणजे यासाठी जगातले इतर देश कारणीभूत आहेत.
राष्ट्रपती वाव्हेल पुढे म्हणाले की, आपल्या बेटावरील जंगल संपूर्ण देशाचे उत्सर्जन शोषून घेतात. यामुळे, हवामान बदलामध्ये आपला वाटा पूर्णपणे शून्य आहे, तरीही आपली बेटे नाहीशी होत आहेत. जगातील सर्व महासागरांचे रक्षण करण्यासाठी पावले उचलली जावीत, असे नथालियाने सांगितले.