यामुळे NASA ने केली सुनिता विलियम्सची निवड?
सुनिता विलियम्स यांच्या यशस्वी परत येण्याचे अंतराळ संशोधनात महिलांची भूमिका अधिक दृढ होत आहे. सुनिता विलियम्स यांच्या प्रवासाने अनेक नवोदित वैज्ञानिक आणि अंतराळवीरांना प्रेरणा दिली आहे. त्यांची मेहनत, जिद्द आणि शौर्य ही केवळ अमेरिकेच नव्हे, तर संपूर्ण जगासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे.

भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनिता विलियम्स यांचा अद्वितीय अंतराळ प्रवास अखेर संपला, आणि १९ मार्चला त्या पृथ्वीवर परत आल्या. २८६ दिवसांच्या या विलक्षण सफरीत सुनिता आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर यांनी अनोख्या अनुभवांचा सामना केला. सुरुवातीला ८ दिवसांचे असलेले मिशन तांत्रिक अडचणींमुळे लांबले आणि दोन्ही अंतराळवीरांनी पृथ्वीपासून दूर राहण्याचा नवीन रेकॉर्ड तयार केला. आता, त्यांचा पृथ्वीवर परत येण्याचा प्रवास सुरू झाला आहे. NASA ने जाहीर केले की, २ वाजून ४१ मिनिटांनी अंतराळ यान डीऑर्बिट बर्न सुरू करत आहे, म्हणजेच पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडण्याची प्रक्रिया सुरू होईल. हवामानाच्या अनुकूलतेवर आधारित या प्रवासात सुमारे १७ तास लागणार आहेत. चला, जाणून घेऊयात की सुनिता विलियम्सचा हा अद्वितीय अंतराळ प्रवास कसा सुरू झाला व कसा त्यांनी रचला इतिहास ?
सुनिता विलियम्स यांचा प्रवास
१९६५ मध्ये अमेरिका येथील ओहायो येथे सुनिता विलियम्स यांचा जन्म झाला. त्यांचे वडिलांचे नाव दीपक पंड्या असून ते मूळचे गुजरात, अहमदाबादचे होते. सुनिता विलियम्स यांनी नीडहॅम हायस्कूल ( मॅसाचुसेट्स ) मधून शालेय शिक्षण घेतले आणि १९८७ मध्ये अमेरिकन नौसेना अकादमीतून शारीरिक विज्ञान ( Physical Science ) मध्ये पदवी मिळवली. त्यानंतर १९९५ मध्ये त्यांनी फ्लोरिडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीमधून अभियांत्रिकी व्यवस्थापन ( Engineering Management ) मध्ये मास्टर डिग्री घेतली.
नौसेनेतून करिअरची सुरूवात-
सुनिता विलियम्स यांनी १९८७ मध्ये अमेरिकन नौसेनेत कमिशन मिळवले आणि हेलिकॉप्टर पायलट म्हणून प्रशिक्षण घेतले. त्यांनी खाडी युद्ध (पर्शियन गल्फ वॉर) आणि इराकमध्ये नो-फ्लाय झोन लागू करण्याच्या मोहिमांमध्ये सहभाग घेतला. तसेच, मियामीतील हरिकेन एंड्र्यू दरम्यान बचाव मोहिमेतही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या उत्कृष्ट उड्डाण कौशल्यांमुळे आणि कठीण परिस्थितीत काम करण्याच्या क्षमतेमुळे नासाच्या निवड प्रक्रियेत त्यांनी सर्वांचे लक्ष वेधले. त्यांनतर जून १९९८ मध्ये नासाने सुनिता विलियम्स यांची निवड केली.




नासामध्ये अंतराळवीर म्हणून निवड होण्यासाठी अनेक निकष असतात. सुनिता विलियम्स यांच्या निवडीमागील प्रमुख कारणे पुढीलप्रमाणे होती:
उत्कृष्ट वैमानिक कौशल्य
नौसेनेतील हेलिकॉप्टर पायलट म्हणून त्यांनी विविध महत्त्वाच्या मोहिमांमध्ये काम केले होते.
अभियांत्रिकी व विज्ञानातील पारंगतता
सुनिता विलियम्स यांनी अंतराळ मोहिमांसाठी महत्त्वाचे ठरणारे उच्च शिक्षण घेतले होते.
टीमवर्क
नौसेनेतील बचाव कार्यादरम्यान त्यांनी दाखवलेले टीमवर्क आणि कठीण परिस्थितींशी जुळवून घेण्याची क्षमता नासासाठी उपयुक्त ठरली.
शारीरिक आणि मानसिक सहनशक्ती
अंतराळ प्रवास अत्यंत आव्हानात्मक असतो. आणि त्या दृष्टीने सुनिता विलियम्स योग्य उमेदवार होत्या.
नासात निवड झाल्यानंतर त्यांनी रोबोटिक्स विभागात काम केले आणि आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या ( ISS ) रोबोटिक आर्म आणि अन्य महत्त्वाच्या यंत्रणांवर संशोधन केले. तसेच, त्यांनी नासाच्या NEEMO2 मिशनमध्ये भाग घेतला. तिथे त्या 9 दिवस पाण्याखालील प्रयोगशाळेत राहून संशोधन करत होत्या.
सुनिता विलियम्स यांनी आतापर्यंत 9 स्पेसवॉक पूर्ण केले असून, एकूण 62 तास 6 मिनिटे अंतराळात चालण्याचा विक्रम केला आहे. त्या एका प्रवासात सर्वाधिक 286 दिवस अंतराळात राहिलेल्या तिसऱ्या क्रमांकाच्या महिला ठरल्या आहेत. त्यांच्या आधी क्रिस्टीना कोच (328 दिवस) आणि पेगी व्हिटसन ( 289 दिवस) या महिलांनी अधिक काळ अंतराळात राहण्याचा विक्रम केला आहे. अंतराळ स्थानकात सर्वाधिक दिवस राहण्याचा विक्रम फ्रँक रूबियो ( 371 दिवस ) यांच्या नावावर आहे. तर पेगी व्हिटसन (675 दिवस) या सर्वाधिक कालावधीसाठी अंतराळात राहिलेल्या आहेत.