IAS अधिकाऱ्यांना किती पगार असतो, कोणत्या VIP सुविधा मिळतात?
दरवर्षी लाखो मुले यूपीएससी परीक्षा देतात. अनेकांना आयएएस अधिकारी होण्याचं स्वप्न असते. पण काही लोकांनाच यात यश मिळतं. पण जर जिद्द आणि चिकाटी असेल तर तो व्यक्ती नक्कीच यशस्वी होतो. पण आयएएस अधिकारी झाल्यानंतर त्यांना किती पगार मिळतो आणि कोणत्या सुविधा मिळतात जाणून घ्या.

IAS Officer salary : केंद्रीय लोकसेवा आयोगाने नुकताच नागरी सेवा परीक्षा २०२३ चा निकाल जाहीर केलाय. IAS, IPS आणि IFS बनण्याचे अनेकांचा स्वप्न असते. लाखो मुलं या परीक्षेला बसतात पण मोजक्याच लोकांना यश मिळते. दरवर्षी UPSC नागरी सेवा परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरच उमेदवारांना त्यांच्या श्रेणीनुसार भारतीय प्रशासकीय सेवा (IAS), भारतीय पोलीस सेवा (IPS), भारतीय अभियांत्रिकी सेवा (IES) किंवा भारतीय विदेश सेवा (IFS) यापैकी एकामध्ये पोस्टिंग दिले जाते. पण त्यात सर्वाधिक चर्चा असते ती आयएएस बनणाऱ्यांची. आयएएस अधिकारी बनण्याचं स्वप्न अनेकांचं असतं. भारतात त्याची खूप क्रेझ आहे. पण तुम्हाला माहितीये का की आयएएस अधिकाऱ्याला किती पगार असतो. या शिवाय त्याला कोणत्या सुविधा मिळतात. चला तर मग जाणून घेऊयात.
दरमहा किती पगार मिळतो?
7 व्या वेतन आयोगानुसार, एका IAS अधिकाऱ्याला दरमहा 56,100 रुपये मूळ वेतन मिळते. या सोबतच त्याला टीए, डीए, एचआरए आणि इतर अनेक भत्तेही मिळतात. सर्व भत्त्यांसह एका IAS अधिकाऱ्याला सुरुवातीच्या दिवसांत दरमहा सुमारे 1 लाख रुपये पगार मिळतो. पण नंतर हा पगार वाढत जातो. पदोन्नती आणि पदाबरोबर त्यांचा पगारही वाढतो. जर आपण जास्तीत जास्त किती पगार मिळतो याबद्दल बोलायचे झाले तर IAS अधिकारी जेव्हा कॅबिनेट सेक्रेटरी होतो तेव्हा दरमहा त्याला सुमारे 2.5 लाख रुपये पगार आणि अनेक भत्ते मिळतात. साधारणपणे, आयएएस अधिकाऱ्याचे मूळ वेतन 56,100 ते 2,25,000 रुपये असते.
कोणत्या व्हीआयपी सुविधा मिळतात?
पगाराव्यतिरिक्त, आयएएस अधिकाऱ्यांना वेगवेगळ्या पे बँडनुसार इतर लक्झरी सुविधा देखील मिळतात. मूळ वेतन सोडून एका IAS अधिकाऱ्याला महागाई भत्ता (DA), घरभाडे भत्ता (HRA), अनुदानित बिले, वैद्यकीय भत्ता आणि वाहतूक भत्ता देखील मिळतो. याशिवाय, पे बँडवर अवलंबून, आयएएस अधिकाऱ्याला निवास, सुरक्षा, स्वयंपाकी आणि इतर कर्मचाऱ्यांसह अनेक सुविधा देखील मिळतात.
आयएएस अधिकाऱ्याला कार आणि ड्रायव्हरची सुविधाही दिली जाते. पेन्शनबद्दल बोलायचे झाले तर पूर्वीच्या आयएएस अधिकाऱ्यांनाही इतर सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे पेन्शन मिळत असे. परंतु आता त्यांना नवीन पेन्शन योजनेत केलेल्या गुंतवणुकीनुसार निवृत्तीनंतर पेन्शन मिळते.