Padma Awards : पद्म पुरस्कार मानकऱ्यांना कोणत्या सुविधा मिळतात ? रोख रकमेचाही असतो का समावेश ?
76 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला 2025 वर्षासाठी पद्म पुरस्कारांची काल घोषणा करण्यात आली. 1954 पासून दर प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कार जाहीर करण्यात येतात. मिळालेल्या माहितीनुसार यंदा देशभरातील एकूण 139 जणांची यासाठी निवड करण्यात आली असून यावर्षी महाराष्ट्रातील तिघांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.
![Padma Awards : पद्म पुरस्कार मानकऱ्यांना कोणत्या सुविधा मिळतात ? रोख रकमेचाही असतो का समावेश ? Padma Awards : पद्म पुरस्कार मानकऱ्यांना कोणत्या सुविधा मिळतात ? रोख रकमेचाही असतो का समावेश ?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/Padma-Award.jpg?w=1280)
पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण, यापैकी कोणताही पुरस्कार जेव्हा एखाद्याला मिळतो तेव्हा तो क्षण त्या व्यक्तीसाठी तसेच त्याच्या कुटुंबासाठी, गावासाठी, जिल्ह्यासाठी आणि राज्यासाठी अतिशय अभिमानास्पद बाब असते. केंद्र सरकारकडून दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या (26 जानेवारी) पूर्व संध्येला हा सन्मान जाहीर केला जातो. नंतर राष्ट्रपती भवनात आयोजित एका कार्यक्रमात या पुरस्कारांचे वितरण पार पडते. यामध्ये पंतप्रधान, उपराष्ट्रपती, केंद्रीय मंत्री यांच्यासह अनेक सेलिब्रिटी सहभागी होतात. यावर्षी महाराष्ट्रातील तिघांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यामध्ये साहित्यिक मारुती चितमपल्ली, वन्यजीव संवर्धन क्षेत्रामध्ये मोठं योगदान असणारे चैत्राम पवार तसेच प्रसिद्ध होमिओपॅथ डॉ. विलास डांगरे यांचा समावेश आहे. या यादीत 7 जणांना पद्मविभूषण, 19 जणांना पद्मभूषण आणि 113 मान्यवरांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले आहे.
काल, अर्थात शनिवारी ( 25 जानेवारी) केंद्र सरकारने 2025 साठी पद्म पुरस्कारांची घोषणा केली. या नागरी पुरस्कारांमध्ये 7 पद्मविभूषण, 19 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. पद्म पुरस्काराने सन्मानित झालेल्यांना काय सुविधा आहेत माहीत आहे का? सोबत रोख रक्कमही मिळते का ? चला जाणू घेऊया.
कधी झाली पद्म पुरस्कारांची सुरूवात ?
भारतरत्न नंतर, भारताचे सर्वोच्च नागरी सन्मान, पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री यांचा समावेश होतो. त्यापैकी दरवर्षी जास्तीत जास्त पद्मश्री पुरस्कार दिले जातात. भारत सरकारने 1954 मध्ये पद्म पुरस्कार सुरू केला होता. 1955 मध्ये याला पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण असे नाव देण्यात आले.
कोणाला मिळतो पद्म सन्मान ?
कला, साहित्य, शिक्षण, क्रीडा, वैद्यक, सामाजिक कार्य, विज्ञान, तंत्रज्ञान, नागरी सेवा, व्यवसाय आणि उद्योग क्षेत्रात असामान्य कार्य करणाऱ्या व्यक्तींना हे पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला जातो. यापैकी डॉक्टर आणि शास्त्रज्ञ हे दोन क्षेत्रातील असे लोक आहेत ज्यांना सरकारी सेवेत असतानाही हा सन्मान मिळू शकतो.
पद्म पुरस्काराने सन्मानित झालेल्या लोकांना काय सुविधा मिळतात ?
पद्म पुरस्काराने सन्मानित व्यक्तीला भारताचे राष्ट्रपती हे प्रमाणपत्र आणि पदक देतात. पैशांबद्दल बोलायचे झाले तर पद्म पुरस्काराने सन्मानित व्यक्तींना एकही रक्कम दिली जात नाही. तो फक्त एक सन्मान आहे. पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण या तिन्ही पुरस्कारांमध्ये रोख रक्कम नसते. तसेच रेल्वे किंवा विमान भाड्यात कोणत्याही प्रकारची सवलत किंवा इतर कोणतीही सुविधा उपलब्ध नाही.
सरकार पुरस्कार मागे घेऊ शकतं ?
मिळालेल्या माहितीनुसार, हा पुरस्कार म्हणजे सन्मानित व्यक्ती त्याच्या नावासोबत वापरू शकेल अशी पदवी नाही. जर कोणी पद्म पुरस्काराचा आपल्या नावासोबत उल्लेख केला तर सरकार त्याच्याकडून पुरस्कार काढून परत घेऊ शकतं.
कसा मिळतो पद्म पुरस्कार ?
यासाठी सरकारकडून दरवर्षी अर्ज मागवले जातात. नमूद केलेल्या क्षेत्रात त्याने उत्कृष्ट काम केले आहे असे ज्या व्यक्तीला वाटतं ते यासाठी अर्ज करू शकतात. सरकारकडून हे अर्ज तपासले जातात. कोणतीही व्यक्ती, संस्था, खासदार, आमदार, मंत्री कोणाच्या तरी नावाची शिफारस करू शकतात. मात्र, याबाबतचा अंतिम निर्णय भारत सरकारने स्थापन केलेल्या समितीतर्फे घेतला जातो.