एसटीमध्ये 150 महिला चालक दाखल, आदिवासी महिलांसाठी विशेष योजना
मुंबई बेस्ट बसने काही दिवसांपूर्वीच बेस्ट बसची स्टेअरिंग महिलांच्या हाती देण्याचा निर्णय घेतला होता. त्यापाठोपाठ आता राज्यातील एसटी महामंडळातही महिला चालकांची भरती करण्यात आली आहे.
मुंबई : मुंबई बेस्ट बसने काही दिवसांपूर्वीच बेस्ट बसची स्टेअरिंग महिलांच्या हाती देण्याचा निर्णय घेतला होता. त्यापाठोपाठ आता राज्यातील एसटी महामंडळातही महिला चालकांची भरती करण्यात आली आहे. त्यामुळे आता बेस्ट बस आणि एसटीमध्ये महिला चालकांसाठीही संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेत आदिवासी महिलांसाठी एसटी महामंडळाने विशेष योजना सुरु केली आहे. या माध्यमातून आदिवासी महिलांना बस चालवण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
एसटी महामंडळाने चालक-वाहक म्हणून केल्या जाणाऱ्या भरतीत 150 महिलांची निवड केली. ऑगस्टपासून या महिलांचे एक वर्ष प्रशिक्षण होणार आहे. त्यानंतर त्यांना सेवेत दाखल केले जाईल.
एसटी महामंडळाने महिलांसाठी भरती प्रक्रियेत राखीव जागा ठेवल्या. तसेच त्यांचे प्रोत्साहन वाढवण्यासाठी अटींमध्येही बदल केले. यासोबतच आदिवासी मुलींसाठी ‘वाहन चालक प्रशिक्षण योजना’ सुरु करण्यात आली. यामध्ये आतापर्यंत 21 आदिवासी मुलींनी प्रशिक्षण घेतलं आहे.
नुकतेच एसटी महामंडळाने एसटीच्या चालक पदासाठी भरती घेतली होती. यामध्ये महिलांसाठी राखीव जागा ठेवण्यात आल्या होत्या. महिलांनीही यामध्ये जास्तीत जास्त अर्ज करावे यासाठी अटींमध्ये बदल केले होते. पुरुष आणि महिलांसाठी अवजड वाहन परवाना आणि तीन वर्ष वाहन चालण्याचा अनुभव अशी अट यापूर्वी होती. मात्र यामध्ये बदल करुन महिलांकरीता हलकी वाहने चालवण्याचा एक वर्षाचा परवाना अशी अट ठेवण्यात आली.
एसटी महामंडळात भरती झालेल्या महिलांना आता एक वर्षाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामध्ये सुरुवातीला त्यांना छोट्या अंतरावरील वाहन चालवण्याचे प्रशिक्षण दिले जाईल. यानंतर त्यांना लांब पल्ल्याचा मार्गावर त्यांची नियुक्ती केली जाईल.