बंदरावर उतरण्यास स्थानिकांचा विरोध, डहाणूचे 700 खलाशी समुद्रात अडकले
डहाणू तलासरी भागातील जवळपास 600 ते 700 मच्छीमार कामागर (खलाशी) समुद्रात अडकले (maharashtra sailors stuck in sea) आहेत.
पालघर : डहाणू तलासरी भागातील जवळपास 600 ते 700 मच्छीमार कामागर (खलाशी) समुद्रात अडकले (maharashtra sailors stuck in sea) आहेत. हे सर्व कामगार दरवर्षी गुजरातमधील पोरबंदर, सौराष्ट्र, वेरावळ या भागात कामासाठी जात असतात. गुजरातवरुन पुन्हा सर्वजण घरी म्हणजे आपल्या गावी परतण्यासाठी बोटींनी उंबरगाव येथे पोहोचले. मात्र स्थानिकांनी त्यांना या भागात उतरण्यास विरोध केला. त्यामुळे ते नारगोल बंदरावर गेले तेथेही विरोध झाल्याने ते पुन्हा गुजरातमधील मरोलीपासून पाच नॉटिकल मैल अंतरावर समुद्रात विसावले होते. गेल्या 24 तासांपेक्षा अधिक तास समुद्रात अन्न-पाण्यापासून वंचित असल्याने त्यांचे अतोनात हाल सुरु झाले आहेत. यावेळी त्यांनी संपर्कात असलेल्याशी संपर्क करून मदतीचे (maharashtra sailors stuck in sea) आवाहन केले.
समुद्रात अडकलेल्या सर्वांना गुजरात प्रशासन अन्य ठिकाणी क्वारंटाईन करण्यासाठी नेत होते. परंतु गुजरात प्रशासनाने उंबरगाव याठिकाणी गुजरातमधील स्थानिक खलाशी, कामगाराना उतरवून तपासणी करून महाराष्ट्रातील कामगारांच्या बाबतीत हात वर केले. तसेच त्यांना बोटीतच ठेवण्यात आले. त्यामुळे गुजरातमधून 30 ते 40 मच्छिमार नौका महाराष्ट्राकडे येण्यास निघाल्या होत्या. निघालेल्या मच्छिमार नौका गुजरातमधील नारगोल आणि झाई बंदराकडे आणि काही मच्छिमार नौका महाराष्ट्रातील डहाणू सातपाटी अर्नाळा या भागात येण्याची शक्यता होती. त्यामुळे महाराष्ट्रात आल्यास त्यांची समुद्रामध्येच तपासणी करुन प्रशासनाने निर्णय घ्यावा, अशी मागणी स्थानिकांनी केली.
गुजरात प्रशासनाने गुजरातीमधील कामगार, खलाशी यांची तपासणी करुन त्यांची व्यवस्था केली. पण महाराष्ट्रातील खलाशी, कामगार वर्गाच्या जीवाशी खेळ सुरु केला.
बोटीतील महाराष्ट्रामधील तलासरी आणि डहाणू तालुक्याच्या खलाशांना किनाऱ्यावर उतरवून घेण्यासाठी गुजरात जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी हात वर केले. त्यामुळे पाचशे खलाशांचा परतीचा प्रश्न गंभीर बनला आहे. तसेच खलाशांना पुन्हा गुजरात राज्यातील मुंद्रा बंदरांमध्ये नेण्याच्या प्रयत्न सुरु असल्याचे सांगितले जात आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गुजरात-महराष्ट्र प्रशासनाने नक्कीच कठोर पावलं उचलावीत. मात्र हातावर पोट असणाऱ्या आणि लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या कामगारांची जेवण व्यवस्थेसह राहण्याची योग्य सोय करावी. तसेच सीमेजवळील नागरिकांनी त्यांची तपासणी करुन त्यांना त्यांच्या घरी पोहोचवण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.