उत्पन्नापेक्षा 2 कोटी 75 लाख रुपयांची बेकायदा मालमत्ता, पुण्यात एसीबीकडून नगररचना सहसंचालकावर गुन्हा दाखल
राज्याच्या नगर रचना विभागातील नगररचना सहसंचालकाविरुद्ध उत्पन्नापेक्षा अधिक बेहिशोबी मालमत्ता आढळून आली आहे (ACB raid against City planning director).
पुणे : राज्याच्या नगर रचना विभागातील नगररचना सहसंचालक हनुमंत जगन्नाथ नाझीरकर (वय 53 वर्षे) यांच्याविरुद्ध उत्पन्नापेक्षा अधिक बेहिशोबी मालमत्ता आढळून आली आहे (ACB registered case against City planning director). याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी (18 जून) सकाळी पुण्यातील अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या प्रकारामुळे पुण्यासह राज्यात एकच खळबळ उडाली आहे. या निमित्ताने पुन्हा एकदा सरकारी कर्मचाऱ्यांच्या भ्रष्टाचाराविषयी चर्चा सुरु झाली आहे.
दरम्यान, नाझीरकर हे सध्या अमरावती येथे नियुक्तीला आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर नाझीरकर यांच्या पुण्यातील कोथरुडमधील स्वप्नशील सोसायटीतील घरी आणि इतर ठिकाणी असलेल्या मालमत्तेवर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकांनी छापे टाकण्यास सुरुवात केली आहे. मालमत्तेची तपासणी सुरु आहे. मागील 6 ते 7 महिन्यांपासून त्यांच्याकडील बेहिशोबी मालमत्तेबाबत उघड चौकशी सुरु होती. त्यांच्या एकूण उत्पन्नापैकी त्यांच्याकडे अंदाजे 2 कोटी 75 लाख रुपयांची बेहिशोबी मालमत्ता आढळून आली.
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या तपासात सहसंचालकांना या मालमत्तेचे स्पष्टीकरण ते देऊ शकले नाही. त्यामुळे ही मालमत्ता त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करुन भष्ट्राचारातून कमावल्याचा ठपका लाच लुचपत विभागाने ठेवला. तसेच त्यांच्याविरुद्ध लाच लुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाझीरकर हे पूर्वी पुण्यातील नगररचना कार्यालयात सहसंचालक म्हणून काम पहात होते. त्यावेळीही त्यांच्याविरुद्ध अनेक तक्रारी आल्या होत्या. त्यानंतर त्यांची अमरावती येथे बदली झाली. सध्या त्यांच्या घरात पोलिसांकडून तपासणी केली जात आहे. त्यातून अन्य मालमत्तेचा शोध घेतला जात आहे, अशी माहिती लाच लुचपत विभागाचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे यांनी दिली.
हेही वाचा :
खारघरमध्ये लहानग्यांच्या शाळेत कैद्यांची ‘भरती’, 200 कैदी विलगीकरणात, 11 पोलिसांवर जबाबदारी
फॉर्च्युनरवर पोकलेन कोसळून अपघात, ताफा थांबवून शरद पवारांकडून विचारपूस!
ACB registered case against City planning director