Hyderabad Election Results: हैदराबादमध्ये भाजपची लाट; 49 जागांवर दणदणीत विजय, असदुद्दीन ओवेसी म्हणाले…
आम्ही भाजपशी लोकशाही मार्गाने लढा दिला. | AIMIM President Asaduddin Owaisi
हैदराबाद: ओवेसी बंधुंच्या एमआयएम पक्षाचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या हैदराबाद महानगरपालिका निवडणुकीत (Hyderabad Election Results) भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. गेल्या निवडणुकीत भाजपला (BJP) याठिकाणी अवघ्या चार जागा मिळाल्या होत्या. मात्र, या निवडणुकीत भाजपने थेट 49 जागांवर विजय मिळवत हैदराबादमधील राजकीय समीकरणेच बदलून टाकली आहेत. (Hyderabad Election Results TRS emerges single largest party BJP makes significant inroads)
या निकालानंतर ‘एमआयएम’चे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi ) यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी म्हटले की, आम्ही भाजपशी लोकशाही मार्गाने लढा दिला. तेलंगणाची जनता भविष्यात भाजपचा विस्तार होण्यापासून रोखेल, असा विश्वास आम्हाला आहे. आमच्या पक्षाचे 44 नगरसेवक निवडून आले. या सर्वांना उद्यापासून कामाला लागण्याचे आदेश देण्यात आल्याचे असदुद्दीन ओवेसी यांनी सांगितले.
हैदराबाद महानगरपालिका निवडणुकीत भाजपला मिळालेले घवघवीत यश हे एमआयएमसाठी मोठा धक्का मानला जात आहे. या निवडणुकीसाठी भाजपने अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण ताकद पणाला लावली होती. भाजपचे अनेक केंद्रीय मंत्री हैदराबाद निवडणुकीच्या प्रचारासाठी आले होते. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपकडून ध्रुवीकरणाचे प्रयत्न झाले होते. आजचे निकाल पाहता भाजपची ही रणनीती चांगलीच यशस्वी ठरल्याचे दिसत आहे. गेल्यावेळी दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या एमआयएमला भाजपने तिसऱ्या क्रमांकावर फेकले आहे. त्यामुळे या निवडणुकीत ओवेसींचं संस्थान खालसा झाल्याचं राजकीय निरीक्षकांचं मत आहे.
We will fight the BJP in a democratic way. We are confident that people of Telangana will stop BJP from expanding its footprints in the state: AIMIM President Asaduddin Owaisi in Hyderabad https://t.co/ENu2UZ0UaB pic.twitter.com/0I112H0A4V
— ANI (@ANI) December 4, 2020
ग्रेटर हैदराबाद पालिका निवडणुकीच्या सर्वच्या सर्व 150 जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. या निवडणुकीत टीआरएसने 56 जागा जिंकल्या आहेत. तर भाजपने 49 आणि एमआयएमने 43 जागा जिंकल्या आहेत. काँग्रेसला केवळ दोनच जागांवर विजय मिळविता आला.
एमआयएमला एका जागेचं नुकसान, पण…
2016च्या पालिका निवडणुकीत टीआरएसने 99 जागा जिंकल्या होत्या. यावेळी त्यांना केवळ 56 जागा मिळाल्याने त्यांचं 43 जागांचं नुकसान झालं आहे. तर एमआयएमला 44 जागा मिळाल्या होत्या. यावेळी त्यांना एका जागेचं नुकसान झालं आहे. काँग्रेसला गेल्या निवडणुकीत अवघ्या दोन जागा मिळाल्या होत्या. त्यांना हे संख्याबळ राखण्यात यश आलं आहे.
परंतु गेल्या निवडणुकीत अवघ्या चार जागा जिंकणाऱ्या भाजपने थेट 49 जागा जिंकल्या आहेत. म्हणजे भाजपने तब्बल 45 जागा अधिकच्या जिंकून हैदराबादमधील राजकीय समीकरणंच मोडीत काढले आहेत. भाजपने टीआरएसच्या मतदारसंघांमध्ये सर्वाधिक विजय मिळवून टीआरएसच्या बालेकिल्ल्यांनाही सुरुंग लावला आहे.
संबंधित बातम्या:
‘हैदराबाद संस्थानात’ भगवी लाट; पालिका निवडणुकीत भाजपची जोरदार मुसंडी; 49 जागांवर दणदणीत विजय
हैदराबाद पालिका निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर; तरीही भाजपचा दक्षिणेवरील स्वारीचा मार्ग मोकळा?
(Hyderabad Election Results TRS emerges single largest party BJP makes significant inroads)