एलियट पेजचा मोकळेपणा, योजेफ शायरचा दुतोंडीपणा, लैंगिक ओळख स्वीकारण्याची गरज अधोरेखित
जगाच्या दोन कोपऱ्यात घडलेल्या या दोन घटनांचा एकत्रित उल्लेख हा केवळ योगायोग नाही. एकाच वेळी घडलेल्या या घटना विरोधाभासी तर आहेत
मुंबई : कॅनडियन कलाकार एलन पेजने (Ellen Page) इन्स्टाग्राम अकाऊण्टवर लांबलचक पोस्ट लिहून आपण ट्रान्सजेंडर असल्याची घोषणा केली. यापुढे आपण एलियट पेज (Elliot Page) असल्याचं तिने जाहीर केलं. पाच वर्षांपूर्वी स्वतःची समलैंगिक अशी ओळख सांगणाऱ्या पेजने आता आपण ट्रान्सजेंडर असल्याचं मनमोकळेपणाने स्वीकारलं आहे. एलियटच्या निमित्ताने अनेकांना स्वतःची खरी ओळख जगजाहीर करण्याची, किंबहुना स्वतःशी कबूल करण्याची ताकद मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (Anti gay Hungarian Politician resigned after being caught by the police in gay party)
एलन ते एलियट… 33 वर्षांचा प्रवास
‘जुनो’ चित्रपटातील भूमिकेसाठी एलन पेज ओळखली जाते. मिनासोटातील हायस्कूलमध्ये शिकणारी 16 वर्षांची तरुणी गर्भवती राहिल्याची कथा या सिनेमात होती. त्यावेळी एलन पेज मुलगी नाही, असं कोणाच्याही मनात डोकावलं नव्हतं. तीन वर्षांनी ख्रिस्तफर नोलनच्या ‘इन्सेप्शन’ सिनेमावेळीही तिच्या लैंगिकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं नाही. मात्र ती 18 वर्षांची असताना ब्रेट रेटनरने ‘एक्स मॅन: द लास्ट स्टँड’ सिनेमाच्या सेटवर ती समलैंगिक असल्याचा आरोप केला. मात्र एलनला स्वतःची ही ओळख स्वीकारण्यासाठी आणखी दहा वर्ष जावी लागली.
वयाच्या 28 व्या वर्षी पेजने पहिल्यांदा आपण समलिंगी असल्याचं कबूल केलं होतं. त्यानंतर पाच वर्षांनी म्हणजे आता वयाच्या 33 व्या वर्षी तिने आपण ट्रान्सजेंडर असल्याचं जाहीर केलं. पेजचा जन्म मुलगी म्हणून झाला, मात्र आता ती स्वतःला मुलगा म्हणवते. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्यासह जगभरातील अनेक सेलिब्रिटींनी एलियटचं समर्थन केलं आहे. तिच्या हिमतीला सर्वांनीच दाद दिली आहे.
कट्टर एलजीबीटी विरोधक योजेफ शायर गे पार्टीत
एकीकडे, एलियट स्वतःची ओळख प्रामाणिकपणे जगासमोर स्वीकारत होती, तेव्हा दुसरीकडे हंगरीमध्ये समलिंगी आणि एलजीबीटी समुदायाला कट्टर विरोध करणारे राजकीय नेते योजेफ शायर (Jozsef Szajer) यांना पोलीस ताब्यात घेत होते. याचं कारण ते एका गे पार्टीमध्ये पकडले गेले.
बेल्जियमची राजधानी ब्रसेल्समध्ये अर्ध्या रात्री पोलिसांनी एका सेक्स पार्टीवर धाड टाकली. तेव्हा तिथे उपस्थित राजनैतिक अधिकाऱ्यांमध्ये योजेफ शायरही होते. योजेफ यांनी ड्रेन पाईपच्या मदतीने पळ काढण्याचाही प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्यांची धरपकड केलीच. योजेफ हे हंगरीमधील सत्ताधारी फिदेस पक्षाचे नेते आणि युरोपियन संसदेचे वरिष्ठ सदस्य आहेत. योजेफ गे पार्टीला गेले, याहून महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते सार्वजनिकरित्या गे, लेस्बियन म्हणजेच एलजीबीटी समुदायातील सदस्यांचा विरोध करत होते. म्हणजेच आत एक बाहेर दुसरं.
मोकळेपणा आणि लपवाछपवी
जगाच्या दोन कोपऱ्यात घडलेल्या या दोन घटनांचा एकत्रित उल्लेख हा केवळ योगायोग नाही. एकाच वेळी घडलेल्या या घटना विरोधाभासी तर आहेतच, मात्र सत्य-असत्य, मोकळेपणा आणि लपवाछपवी, आदर आणि लाज असे अनेक पैलू या दोन घटनांशी निगडीत आहेत.
योजेफ शायर यांचं नाव गे पार्टीतील उपस्थितीमुळे चर्चेत नाही, तर स्वतःबद्दल खोटारडेपणा, स्वतःची ओळख लपवणे यासोबतच दुहेरी भूमिका घेतल्यामुळे चर्चेचा विषय ठरत आहे. याआधी स्वतःची लेस्बियन अशी उघड ओळख सांगणाऱ्या ‘अलायन्स ऑफ फ्री डेमोक्रेट्स’च्या सदस्या क्लारा उंगर यांनी 2015 मध्ये शायर यांच्यावर गे असल्याचा आरोप केला होता. (Anti gay Hungarian Politician resigned after being caught by the police in gay party)
आपलं ठेवायचं झाकून नि दुसऱ्याचं पाहायचं वाकून
‘आपलं ठेवायचं झाकून नि दुसऱ्याचं पाहायचं वाकून’ ही तऱ्हा जगाच्या पाठीवर सर्वत्र असल्याचं या निमित्ताने अधोरेखित होत आहे. स्वतःला आहोत तसं स्वीकारण्यात येणारी अडचण हेच इतर समलैंगिकांचा विरोध करण्याचं मुख्य कारण मानलं जातं. माणूस स्वतःला आहोत तसं स्वीकारण्यास तयार नाही. इतर आपल्याला कसं स्वीकारतील, यापेक्षा आपण स्वतःला कसं स्वीकारु, ही भीती त्यांच्या मनात दिसते.
जगात अनेक लग्नं, अनेक नाती या खोट्यावर आधारित आहेत. फक्त जगाशीच नाही, तर स्वतःशी खोटं बोलण्यात अनेकांचं आयुष्य खर्ची पडलं.
सामाजिक मान्यता कधी?
भारतात दोन वर्षांपूर्वी कलम 377 अंतर्गत समलैंगिकता हा गुन्हा होती. सप्टेंबर 2018 मध्ये कलम 377 असंवैधानिक असल्याचं सांगत सुप्रीम कोर्टात जस्टिस इंदू मल्होत्रा यांनी “नैसर्गिक असूनही अपराधी ठरवल्याबद्दल एलजीबीटी समुदायाची आपण ऐतिहासिक रुपात माफी मागितली पाहिजे” असं म्हटलं होतं.
समलिंगी आणि एलजीबीटी समुदायातील व्यक्ती आपली लैंगिक ओळख दीर्घ काळापासून लपवत आले आहेत. समाजात त्यांच्यावर घाबरुन, लपून राहण्याची वेळ येते कारण त्यांना स्वीकारले जात नाही. मात्र जगात हळूहळू बदल घडताना दिसत आहे. विविध देशांमध्ये समलिंगी लग्नांना कायदेशीर मान्यता मिळत आहे. त्यांना सामाजिक मान्यता मिळण्यास आणखी काही काळ जाऊ शकतो. मात्र एलियटच्या निमित्ताने अनेकांना आपलं सत्य स्वीकारण्याची ताकद मिळेल. अखेर टॉलस्टॉयने म्हटलं आहेच, “कोणतंही खोटं इतरांशी बोललं जात नाही, तर स्वतःशीच बोललं जातं”
(Anti gay Hungarian Politician resigned after being caught by the police in gay party)