Aurangabad | औरंगाबादेतही आडनावांवरून मोजणी, ओबीसींची गणना पूर्ण, शहरात 18% तर ग्रामीण भागात 27% नोंद
ओरंगाबाद शहरात महापालिका हद्दीत एकूण मतदारांची संख्या 9 लाख 90 हजार इतकी आहे. यापैकी 18 टक्के मतदार ओबीसी असल्याचे आढळून आले आहे.
औरंगाबादः राज्यात ओबीसींची जनगणना (OBC) केवळ आडनावांवरून केली जात असून ही पद्धत सदोष असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. पण याच पद्धतीनुसार, औरंगाबाद जिल्ह्यातील ओबीसींची जनगणना पूर्ण झाली आहे. महापालिकेने शहरातील तसेच जिल्हा परिषदेच्या वतीने ग्रामीण भागातील ओबीसींची मोजणी पूर्ण केली आहे. मतदारयाद्यांच्या आधारे आडनावांवरून ही गणना करण्यात आली असून त्यात औरंगाबाद शहरात (Aurangabad city) ओबीसी लोकसंख्येचं प्रमाण १८ टक्के आढळून आलं आहे. हा अहवाल आता अंतिम स्वरुपात तयार होणार असून मंगळवार किंवा बुधवारी तो राज्य शासनाकडे सुपूर्द केला जाईल. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचे 27% आरक्षण (Obc Reservation) सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर रद्द करण्यात आले. मात्र हे आरक्षण पुन्हा मिळवण्यासाठी राज्य शासनाकडून ओबीसींचा इम्पेरिकल डेटा तयार करण्याचे काम सुरु आहे. यासाठी माजी मुख्य सचिव जयंत बांठिया यांच्या अध्यतेखाली स्वतंत्र आयोग नियुक्त करण्यात आला आहे. या आयोगाला माहिती देण्यासाठी राज्यात ओबीसींचे सर्वेक्षण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
औरंगाबादेत 880 बूथवर सर्वेक्षण
औरंगाबाद शहरात महापालिकेने मतदार याद्यांच्या आधारे हे सर्वेक्षण पूर्ण केले आहे. शहरातील 880 बूथवर बीएलओंच्या माध्यमातून हे काम करण्यात आले. स्थानिकांची मदत घेऊन मतदार याद्यांमधील आडनावांवरून त्या केंद्रावरील किती मतदार ओबीसी आहेत, हे शोधण्यात आले आहे. आता या अहवालाला अंतिम स्वरुप दिले जात आहे. शहरात सुमारे 18 टक्के ओबीसी असल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले आहे.
प्रत्यक्ष लोकसंख्या किती?
ओरंगाबाद शहरात महापालिका हद्दीत एकूण मतदारांची संख्या 9 लाख 90 हजार इतकी आहे. – यापैकी 18 टक्के मतदार ओबीसी असल्याचे आढळून आले आहे. – ही संख्या सुमारे 1 लाख 79 हजार इतकी आहे. यावरूनच एकूण लोकसंख्येतील ओबीसींचे प्रमाण निश्चित करण्यात येत आहे. – तर एकूण औरंगाबा जिल्ह्यातील 868 ग्रामपंचायतींअंतर्गत 17 लाख 426 मतदार असून या मतदार यादीच्या सर्व्हेत 4 लाख 59 हजार 574 मतदार ओबीसी आहेत. ही टक्केवारी 27 च्या आसपास आहे. या सर्वे७चा डाटा दोन दिवसांपूर्वी समर्पित आयोगाला सादर केल्याची माहिती जि.प. सीईओ तथा प्रशासक निलेश गटणे यांनी दिली.
तालुकानिहाय ओबीसींची टक्केवारी किती?
- सोयगाव- 42%
- फुलंब्री- 21%
- औरंगाबाद- 25 %
- पैठण- 27.85%
- कन्नड- 36.77%
- खुलताबाद-23.04%
- गंगापूर-27.85%
- सिल्लोड-24.18%
- वैजापूर-48%