औरंगाबाद | सोयगावात बिबट्याचा तडफडून मृत्यू, वेळेवर उपचाराअभावी जनावर दगावलं, स्थानिकांचा आरोप
स्थानिकांच्या मते, वनविभागाच्या पथकाकडून घटनास्थळाचा ताबा दुपारीच घेण्यात आला होता. औरंगाबादवरून सायंकाळी चार वाजता वनविभागाचे शीघ्र कृती दलाचे पथक दाखल होताच बिबट्याने प्राण सोडला. अखेरीस पथकातील वैद्यकीय तज्ञांनी बिबट्याला मृत घोषित केले.
औरंगाबाद : सोयगाव तालुक्यातील जरंडी परिसरातील (Aurangabad soygaon) काटीखोरा शिवारात अत्यंत अत्यवस्थ असलेल्या बिबट्याचा (Leopard death) मृत्यू झाला. बुधवारी सकाळी जिवंत अवस्थेत तो परिसरातील कोल्हापुरी बंधाऱ्याच्या भिंतीवर आढळला. मात्र दुपारी दोन वाजेपर्यंत उपचार न मिळाल्याने त्याने प्राण सोडले. या परिसरात दहा महिन्यांपूर्वी एप्रिल 2021 मध्येदेखील घोसला गावा शेजारील जोगेश्वरी शिवारात अशाच प्रकारे दोन बिबट्याचे कुजलेल्या अवस्थेत शव आढळून आले होते. बुधवारी आढळलेला बिबटा जिवंत असल्याची चर्चा शेतमजुरांमध्ये होती. मात्र बिबट्याने औरंगाबादचे रेस्क्यू पथक (Rescue team) पोहचण्याच्या आधीच दुपारी प्राण सोडल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तिविरुद्ध वनजीव संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती वनक्षेत्रपाल राहुल सपकाळ यांनी दिली.
बिबट्याच्या मृत्यूमुळे सोयगावात खळबळ
स्थानिक पत्रकार भारत पगारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बिबट्याचा असा तडफडून मृत्यू झाल्यामुळे येथील शेतमजूरांमध्ये खळबळ माजली आहे. जरंडी गावालगत असलेल्या काटीखोरा शिवारातील कोल्हापुरी बंधाऱ्याच्या भिंतीवर काही शेतमजुरांना बुधवारी बिबट्या आढळून आला होता. यावेळी सदरील बिबट्या हा अत्यवस्थ अवस्थेत जिवंत असल्याची माहिती वनविभागाला परिसरातील मजुरांनी दिली. घटनेची माहिती मिळताच सोयगाव वनविभागाचे पथक घटनास्थळी पोहचल्यावरही बिबट्या जिवंत अवस्थेत विव्हळत होता. मात्र त्याला वेळेवर उपचार न मिळाल्याने त्याचा जागेवरच तडफडून मृत्यू झाला आहे, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.
वेळेवर उपचार मिळाले नाहीत, स्थानिकांचा आरोप
स्थानिकांच्या मते, वनविभागाच्या पथकाकडून घटनास्थळाचा ताबा दुपारीच घेण्यात आला होता. औरंगाबादवरून सायंकाळी चार वाजता वनविभागाचे शीघ्र कृती दलाचे पथक दाखल होताच बिबट्याने प्राण सोडला. अखेरीस पथकातील वैद्यकीय तज्ञांनी बिबट्याला मृत घोषित केले. त्यानंतर शवविच्छेदनासाठी हलविण्यात आले आहे. दरम्यान मृत बिबट्याचा मृत्यू काही विषारी खाद्य खाण्यात आल्याने झाला किंवा अन्न पाण्याअभावी तडफडून मृत झाल्याची ग्रामस्थांमध्ये चर्चा आहे . दहा महिन्यांपूर्वी घोसला गावशेजारील जोगेश्वरी शिवारात अश्याच प्रकारे शेतकऱ्यांच्या शेतात बिबट्याचे कुजलेल्या अवस्थेत शव मिळून आले होते. या प्रकरणातील बिबट्याचा शवविच्छेदन अहवाल अद्याप आलेला नसल्याने या प्रकरणाची कारवाई गुलदस्त्यातच असल्याचे समजते.
इतर बातम्या-