Nishikant Kamat | प्रख्यात दिग्दर्शक निशिकांत कामत याचे निधन
निशिकांत कामत याच्यावर लिव्हर अर्थात यकृताशी संबंधित आजारामुळे हैदराबादमधील रुग्णालयात उपचार सुरु (Director Nishikant Kamat passed away) होते.
हैदराबाद : मराठमोळा दिग्दर्शक निशिकांत कामत याचे आज (17 ऑगस्ट) निधन झाले. वयाच्या 50 व्या वर्षी हैदराबादमधील ‘एआयजी रुग्णालयात त्याने अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून निशिकांत कामत याच्यावर लिव्हर अर्थात यकृताशी संबंधित आजारामुळे हैदराबादमधील गच्चीबोली येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते.(Director Nishikant Kamat passed away) ‘डोंबिवली फास्ट’, ‘दृश्यम’, ‘लय भारी’ यासारख्या सुपरहिट सिनेमांचे दिग्दर्शन निशिकांत कामत यांनी केले आहे.
“निशिकांत कामत यांना 31 जुलैला ताप आणि थकवा आल्याने AIG रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर गोळ्या आणि इतर औषधोपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांची प्रकृती थोडी सुधारली.
त्यानंतर मात्र त्यांचे यकृत निकामी झाले. त्यामुळे त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं असताना त्यांचे अवयव निकामी झाले. दरम्यान आज त्यांची प्रकृती जास्त खालवली. दुपारी 4 वाजून 26 मिनिटांनी त्यांचे निधन झाले,” अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.
Director #NishikantKamat passed away at 1624 hours today. He was suffering from Liver Cirrhosis for the past two years: AIG Hospitals, Hyderabad https://t.co/86NL4bEJR4
— ANI (@ANI) August 17, 2020
निशिकांत कामत यांचा परिचय
निशिकांत कामत यांचा जन्म 17 जून 1970 रोजी मुंबईतील दादर भागात झाला. रुईया कॉलेजमध्ये त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण झाले. निशिकांत कामत यांनी 2004 मध्ये ‘सातच्या आत घरात’ सिनेमातून लेखक आणि अभिनेता म्हणून मनोरंजन विश्वात पाऊल ठेवले. त्याच वर्षी निशिकांत यांनी ‘डोंबिवली फास्ट’ या मराठी चित्रपटाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले. या सिनेमाला सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही मिळाला होता. त्यानंतर त्यांनी आर माधवनसह या सिनेमाचा तामिळमध्ये रिमेक केला.
निशिकांत कामत यांनी ‘डोंबिवली फास्ट’, ‘लय भारी’, ‘फोर्स’, ‘मुंबई मेरी जान’, ‘दृश्यम’ यासारख्या एकापेक्षा हिट चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. याशिवाय ‘सातच्या आत घरात’, ‘रॉकी हॅण्डसम’, ‘ज्युली 2’, ‘मदारी’, ‘भावेश जोशी’, फुगे, ‘डॅडी’ सारख्या हिंदी-मराठी चित्रपटात अभिनयही केला आहे.
अजय देवगणचा ‘दृश्यम’ सिनेमा दिग्दर्शित केल्यानंतर प्रकृतीच्या कारणांमुळे त्यांनी दिग्दर्शन थांबवून केवळ अभिनेता म्हणूनच काम केलं. ‘दरबदर’ या आगामी सिनेमाचे ते दिग्दर्शनही करणार आहेत.
मुंबई बॉम्बस्फोटावर आधारित हिंदीतील ‘मुंबई मेरी जान’ या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. त्यानंतर निशिकांत कामत यांनी ‘दृश्यम’, ‘मदारी’, ‘फुगे’ यासारख्या सिनेमांचंही दिग्दर्शन केलं. ‘रॉकी हॅण्डसम’ या सिनेमात त्यांनी साकारलेली खलनायकाची भूमिका चांगलाच भाव खाऊन गेली. (Director Nishikant Kamat passed away)
संबंधित बातम्या :
प्रख्यात दिग्दर्शक निशिकांत कामत व्हेंटिलेटरवर, रुग्णालयाचे हेल्थ बुलेटीन