शेतकरी बापाची 17 वर्षाच्या मुलासोबत आत्महत्या, शेतात नेलेली भाकरी तशीच ठेवून विहिरीत उडी
सततची नापिकी आणि उरावर झालेल्या लाखो रुपयांच्या कर्जामुळे शेतकऱ्याने (Nanded Farmer Suicide) तरण्याबांड लेकासोबत आत्महत्या केली.
नांदेड : सततची नापिकी आणि उरावर झालेल्या लाखो रुपयांच्या कर्जामुळे शेतकऱ्याने (Nanded Farmer Suicide) तरण्याबांड लेकासोबत आत्महत्या केली. नांदेडमध्ये ही थरारक घटना घडली. यामुळे नांदेड जिल्ह्यातील डोंगराळ भागात असलेल्या वागदरवाडी गावावर शोककळा (Nanded Farmer Suicide) आहे. या गावातील 45 वर्षीय केरबा केंद्रे आणि 17 वर्षीय शंकर केंद्रे या पितापुत्राने दुसऱ्याच्या शेतात जाऊन विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.
केरबा यांच्या मुलीचे गतवर्षीच लग्न झाले होते. तर मुलगा शंकरच्या शिक्षणासाठी खर्च होत होता. खडकाळ असलेल्या जमिनीत फारसे उत्पन्न होत नसल्याने मयत केरबा गेल्या तीन वर्षांपासून हवालादिल झाला होता. त्यातच मुलगी बाळंतपणासाठी माहेरी आली होती. या सगळ्या आर्थिक अडचणीत सापडलेल्या या पितापुत्राने आत्मघातकी निर्णय घेत आपले जीवन संपवलं.
आपली खडकाळ जमीन विकली तरी बँकेचे कर्ज फिटणार नाही असे अशी चर्चा गावात असल्याची कुणकुण केरबा यांना होती. त्यामुळे शेतात नेलेली भाकरी दोघांनी तशीच ठेवत जगाचा निरोप घेतला. या सगळ्या प्रकारामुळे गावकरी हळहळ व्यक्त करत आहेत. विशेष म्हणजे बाप लेकाच्या आत्महत्येनंतर या गावात कोणताही पुढारी अद्याप फिरकला नाही. निवडणुका असत्या तर मात्र गावात नेत्यांनी लाईन लावली असती पण दुर्दैवाने आता कोणत्याही निवडणूका नसल्याने या घटनेकडे कुणाचंही लक्ष नाही.
बाप-लेकांच्या या आत्महत्येनंतर पोलिसांनी सोपस्कार पार पाडले आहेत. मात्र महसूलच्या अधिकाऱ्यांना या गावाला जाण्यासाठी अद्याप वेळ मिळालेला नाही. सरकारची तातडीची मदत तर दूरच राहिली.
सांर जग ज्या शेतकऱ्यांला जगाचा पोशिंदा म्हणून ओळखतो त्याच शेतकऱ्याला अशा पद्धतीने देहत्याग करावा लागत असेल तर यापेक्षा दुसरं दुर्दैवी काय असू शकते? अशी भावना वागदरवाडी गावचे ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. विशेष म्हणजे या शेतकरी बाप लेकाच्या आत्महत्येनंतर या कुटुंबाच्या आर्थिक अडचणी वाढलेल्या आहेत. त्यामुळे दानशूर लोकांनी पुढे येऊन या कुटुंबाला मदत करावी अशी अपेक्षा गावकरी व्यक्त करत आहेत.