फ्रान्स हा स्वातंत्र्य मानणारा देश, राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं, मोदींपाठोपाठ शिवसेनेचा जाहीर पाठिंबा
पैगंबर मोहम्मद यांचं कार्टून दाखवणाऱ्या फ्रान्समधील एका शिक्षकाच्या हत्येनंतर राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या 'कट्टरवादी इस्लाम'बाबतच्या वक्तव्यांनी अनेक मुस्लीम देशांची नाराजी ओढवली आहे.
मुंबई : पैगंबर मोहम्मद यांचं कार्टून दाखवणाऱ्या फ्रान्समधील (France) एका शिक्षकाच्या हत्येनंतर राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन (President Emmanuel Macron) यांच्या ‘कट्टरवादी इस्लाम’बाबतच्या वक्तव्यांनी अनेक मुस्लीम देशांची नाराजी ओढवली आहे. जगभरात अनेक ठिकाणी मुस्लीम सामुदाय मॅक्रॉन यांचा विरोध करत आहेत. अशात शिवसेनेने मात्र मॅक्रॉन यांच्या पाठीशी उभं राहण्याची भूमिका घेतली आहे. तसेच सर्वांनी मॅक्रॉन यांच्या पाठीशी उभं राहायला हवं, असं मतही शिवसेनेने ‘सामना’ या मुखपत्रातील अग्रलेखाद्वारे मांडलं आहे. याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील मॅक्रॉन यांना पाठिंबा दर्शवला आहे. (France is Freedom-loving country, it needs to stand behind President Emmanuel Macron, Says Shivsena)
काय म्हटलंय अग्रलेखात?
मोहम्मद पैगंबर यांचे कोणतेही चित्र अस्तित्वात नाही. ही श्रद्धा आहे. त्यामुळे असे चित्र काढणे हा मुसलमानांनी गुन्हा ठरवला, पण त्या गुन्ह्यासाठी ‘अल्ला हो अकबर’चे नारे देत लोकांना गळे चिरून मारा, असेही पवित्र कुराणात लिहिलेले नाही किंवा पैगंबर साहेबांनी सांगितलेले नाही. त्यामुळेच फ्रान्समध्ये ज्यांनी धर्माच्या नावावर गळे चिरण्याचा अमानुष, अघोरी प्रकार केला ते मानवतेचे, जगाचेच शत्रू आहेत. मॅक्रॉन यांच्या पाठीशी त्यासाठीच उभे राहणे गरजेचे आहे. हिंदुस्थानातील राजकीय पक्षांनी व मुस्लिम समुदायाने फ्रान्सच्या अंतर्गत भानगडीत पडण्याचे कारण नाही!
फ्रान्समध्ये एक ठिणगी पडली आहे व त्याचा वणवा जगभरात पसरताना दिसत आहे. फ्रान्समध्ये जे घडले त्याचा संबंध पुन्हा एकदा पैगंबर मोहम्मदांच्या व्यंगचित्राशी आहे. प्रेषित मोहम्मदांचे व्यंगचित्र काढल्यामुळे मुस्लिमांच्या भावना भडकल्या. त्या इतक्या की, धर्मांध मुसलमानांनी लोकांचे गळे चिरून हत्या केल्या आहेत व कॅनडापासून फ्रान्सपर्यंत निरपराध लोकांवर चाकूहल्ले सुरू झाले आहेत. मुंबई-ठाण्यातील मुस्लिमांनीही फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांच्या विरोधात निदर्शने केली. भाजपचे राज्य असलेल्या भोपाळमध्ये मॅक्रॉनविरोधात हजारो मुसलमान जमले व त्यांनी घोषणाबाजी केली.
राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्या विरोधात जगभरातील मुस्लिम समुदाय छाती बडवत आहे. मॅक्रॉन यांनी इस्लाम आणि दहशतवादाचा संबंध जोडला व फ्रान्समधील इस्लामी दहशतवाद मुळापासून उखडून काढण्याचा निश्चय त्यांनी केला. मॅक्रॉन यांची भूमिका वादग्रस्त ठरवली जात आहे. फ्रान्स हा सर्वच प्रकारचे स्वातंत्र्य मानणारा देश आहे. हिंदुस्थानच्या संकटकाळी फ्रान्स नेहमीच आपल्या पाठीशी उभा राहिला आहे. 1998 साली पोखरण अणुचाचणीनंतर हिंदुस्थानवर अमेरिकेसह अनेक राष्ट्रांनी निर्बंध लादले असताना फ्रान्स हिंदुस्थानचा मित्र म्हणूनच वागला. ‘युनो’मध्ये जेव्हा जेव्हा गरज पडली तेव्हा फ्रान्सने हिंदुस्थानचे समर्थन केले. पाकिस्तान, चीनसारख्या दुश्मनांशी मुकाबला करण्यासाठी फ्रान्सने हिंदुस्थानला संरक्षणसामग्रीही पुरवली. मिराज, राफेलसारखी लढाऊ विमाने फ्रान्सकडून हिंदुस्थानला मिळाली आहेत. अशा फ्रान्समध्ये धर्मांधतेचा उद्रेक घडवून दहशतवाद निर्माण होणे व त्यातून हिंसाचाराचा भडका उडणे हिंदुस्थानलाही परवडण्यासारखे नाही.
फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांनी दहशतवादाविरुद्ध युद्ध पुकारले आहे व पंतप्रधान मोदी यांनी युद्धात प्रे. मॅक्रॉन यांना पाठिंबा जाहीर केला आहे हे योग्यच झाले. दहशतवादाविरुद्ध लढणाऱ्या प्रत्येकास समर्थन देणे आपले कर्तव्यच आहे. दहशतवादाच्या भयंकर अंधारातून आपण आजही प्रवास करीत आहोत. धार्मिक उन्माद व त्यातून निर्माण झालेल्या दहशतवादाने हिंदुस्थानला मोठी किंमत चुकवावी लागली. कश्मीरात आजही हिंसाचार सुरूच आहे व तो हिंसाचार धर्माच्या नावाखाली आहे.
एक लादेन अमेरिकेने पाकिस्तानात घुसून मारला व पाताळात गाडला. तरी ‘लादेन’छाप दहशतवादाचा अंत झाला नाही. इराण, अफगाणिस्तान, इराक, सीरिया, लिबिया, पाकिस्तान, कश्मीरात हिंसाचार सुरूच आहे. अधूनमधून हिंदुस्थानातही रस्त्यावर त्याचे पडसाद उमटत असतात. हिंदुस्थानने गेल्या अनेक वर्षांत अशा दहशतवादाची मोठी किंमत चुकवली व आता फ्रान्ससारखी आधुनिक विचारसरणीची राष्ट्रे त्या वणव्यात होरपळून निघत आहेत. फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांची भूमिका स्पष्टच आहे. ते म्हणतात, ‘‘मी मुस्लिमांचा एक व्यक्ती, एक समाज म्हणून सन्मानच करतो. पैगंबर मोहम्मद यांचे व्यंगचित्र काढल्याने मुस्लिमांचे व्यथित होणे मी समजू शकतो. पण त्यावर प्रतिक्रिया म्हणून लोकांचे गळे चिरणे सहन केले जाणार नाही.’’ मॅक्रॉन यांची भूमिका योग्यच व मानवतेच्या हिताची आहे. पैगंबर मोहम्मदांचं व्यंगचित्र वर्गात दाखवल्याने विद्यार्थ्याने शिक्षकाचा गळा चिरला. नंतर निस शहरांत चर्चबाहेर गळा चिरून तिघांना मारले. शनिवारी एका फादरवर गोळ्या झाडून त्यांना ठार केले. हे लोण आता पसरत चालले आहे. याआधी पैगंबरांचेच याआधी पैगंबरांचेच व्यंगचित्र छापले म्हणून ‘चार्ली हेब्दो’ या साप्ताहिकाच्या कार्यालयात घुसून दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्यात मोठे हत्याकांड घडले होते. आता पुन्हा व्यंगचित्रानेच तुफान निर्माण केले.
पैगंबर हे शांततेचे, सद्भावनेचे, संयमाचे प्रतीक आहेत. त्या विचारांचा खून त्यांचे अुनयायी म्हणवणारे करीत आहेत व संपूर्ण इस्लामपुढे त्यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. फ्रान्समधील घटनेची दखल मुस्लिम राष्ट्रांनी घेतली व तेथे मॅक्रॉनविरोधात फतवे वगैरे जारी केले, पण सर्वप्रथम या ‘फतवे’ बहाद्दरांनी दहशतवादी कृत्याचा धिक्कार करायला हवा. गळे चिरून मारणे अशी आज्ञा ना कुराणात आहे ना प्रेषित पैगंबर साहेबांनी दिली आहे. परमेश्वराने माणसाला उपदेश करण्यासाठी वेळोवेळी प्रेषित पाठवले. हे प्रेषित सर्व जगात, सर्व देशांत परमेश्वराने पाठवले आहेत. या प्रेषितांपैकी सर्व मानवजातीसाठी परमेश्वराने पाठवलेले शेवटचे प्रेषित सलीबुल्ला वसल्लम मोहम्मद पैगंबर आहेत. आता यानंतर नवे प्रेषित येणार नाहीत. म्हणून शेवटच्या प्रेषितांनी जे सांगितले आहे तेच शेवटपर्यंत म्हणजे मानवजातीच्या अंतापर्यंत सर्व मानवजातीला वंदनीय व आचरणीय असले पाहिजे, ही मुसलमानांची श्रद्धा आहे. मोहम्मद पैगंबर यांचे कोणतेही चित्र अस्तित्वात नाही. ही श्रद्धा आहे. त्यामुळे असे चित्र काढणे हा मुसलमानांनी गुन्हा ठरवला, पण त्या गुन्हय़ासाठी ‘अल्ला हो अकबर’चे नारे देत लोकांना गळे चिरून मारा, असेही पवित्र कुराणात लिहिलेले नाही किंवा पैगंबर साहेबांनी सांगितलेले नाही. त्यामुळेच फ्रान्समध्ये ज्यांनी धर्माच्या नावावर गळे चिरण्याचा अमानुष, अघोरी प्रकार केला ते मानवतेचे, जगाचेच शत्रू आहेत. मॅक्रॉन यांच्या पाठीशी त्यासाठीच उभे राहणे गरजेचे आहे. हिंदुस्थानातील राजकीय पक्षांनी व मुस्लिम समुदायाने फ्रान्सच्या अंतर्गत भानगडीत पडण्याचे कारण नाही!
संबंधित बातम्या
तिघांच्या हत्येनंतर फ्रान्समध्ये ‘मॅक्सिमम अलर्ट’, भारत सोबत असल्याचं सांगत मोदींकडून धीर
भेंडी गल्ली ते भोपाळ, फ्रान्समधील वादाचे जगात पडसाद, नेमकं कारण काय?
(France is Freedom-loving country, it needs to stand behind President Emmanuel Macron, Says Shivsena )