Weather: धुक्यात हरवले औरंगाबाद, थंडीचे संकेत, येत्या दोन दिवसात राज्यातून परतीच्या पावसाची एक्झिट!
दौलताबाद, खुलताबाद, शुलिभंजन, सारोळा, हर्सूल, सलीम अली सरोवर, देवळाई-सातारा डोंगर परिसर, विद्यापीठ परिसरात अशा सर्वच ठिकाणी हेच चित्र होते. मॉर्निंग वॉकला निघालेल्या लोकांसाठी वातावरणाचे बदललेले हे चित्र अधिक सुखावणारे वाटले.
औरंगाबाद: शहर आणि ग्रामीण भागात रविवारपासून सकाळच्या वेळी दाट धुक्यांचं साम्राज्य पसरलेलं (Fog in Aurangabad) दिसून येत आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यातील अतिवृष्टीमुळे हैराण झालेल्या औरंगाबादकरांसाठी रविवारची सकाळ आशेचा किरण घेऊन आलं. आकाशात फार ढग नव्हते आणि रस्त्यांवर दूर-दूरवर पसरलेलं धुकं.. हे चित्र औरंगाबादकरांसाठी आल्हाददायक ठरलं. दरम्यान, येत्या दोन दिवसात राज्याच्या विविध भागांमधून पाऊस माघार घेऊ शकतो, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
हिवाळ्याचे संकेत देणारी पहाट…
रविवारी 10 ऑक्टोबर रोजी औरंगाबाद परिसरात सकाळी मोठ्या प्रमाणवार धुक्याचे साम्राज्य दिसून आले. सोमवारी त्या तुलनेत धुके काहीसे कमी होते. मात्र रविवारी अगदी 15 फुटांवरचे चित्र पाहणे कठीण झाले होते. सकाळी 8.30 वाजेपर्यंत वाहनांचे लाइट लावून वाहने चालवावी लागत होती. दौलताबाद, खुलताबाद, शुलिभंजन, सारोळा, हर्सूल, सलीम अली सरोवर, देवळाई-सातारा डोंगर परिसर, विद्यापीठ परिसरात अशा सर्वच ठिकाणी हेच चित्र होते. मॉर्निंग वॉकला निघालेल्या लोकांसाठी वातावरणाचे बदललेले हे चित्र अधिक सुखावणारे वाटले. कारण मागील दोन महिन्यांपासून औरंगाबादकरांना सतत ढगांचा गडगडाट, मुसळधार पाऊस आणि कडाडणाऱ्या वीजांचा सामना करावा लागत होता. आता मात्र नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला आहे.
धुके म्हणजे नेमके काय?
धुके हे एक दृश्य ढगासमान असते, ज्यात पाण्याचे अथवा बर्फाचे सुक्ष्म बिंदू असतात. पृथ्वीच्या पृष्ठभागावर किंवा त्याजवळ हे हवेत तरंगत असतात. त्यास एक निम्न पातळीवर असणारा एक प्रकारचा ढग असेही म्हणता येते. नजिकच्या पाण्याच्या स्रोतांचा, उंचसखलतेचा व वाऱ्याच्या वेगाचा यावर फार जास्त प्रभाव पडतो. भूपृष्ठालगतची आर्द्र (ओलसर) हवा थंड होऊन तिचे तापमान दवांकाखाली गेल्यास बहुधा धुके निर्माण होते. पृथ्वीवरील पाण्याचे बाष्पीभवन होऊन हवा संपृक्त झाल्यासही धुके पडते. सूर्यप्रकाशामुळे वातावरणातील उष्णता जसजशी वाढायला लागते, तसतसा धुक्याचे प्रमाण कमी होते. म्हणूनच आपणांस सकाळी जास्त धुके दिसते.
शहरातील आजचे तापमान
औरंगाबाद शहरातील एमजीएम वेधशाळेच्या वेबसाइटनुसार आज शहराचे तापमान 31 अंश सेल्सियसचत्या दरम्यान असून हवेतील आर्द्रतेचे प्रमाणव 54% आहे. तसेच वाऱ्याचा वेग ताशी 5 किलोमीटर एवढा आहे. सकाळच्या वेळी वातावरणात आर्द्रतेचे प्रमाण 80 टक्क्यांच्या पुढे असल्यामुळे धुक्यांचे प्रमाणही जास्त दिसून येत आहे.
परतीच्या पावसाची विश्रांती
मराठवाड्यात परतीच्या पावसाने विश्रांती घेतली आहे. गेल्या 24 तासात 8.7 मिलीमीटर पाऊस पडला आहे. लातूर जिल्ह्यात सर्वाधिक 15.9 मिमी पाऊस झाला. तर औरंगाबादेत 6.7, जालन्यात 6.4, बीडमध्ये 11.2, उस्मानाबादेत 8.5, नांदेडमध्ये 3.7 आणि परभणीत 8.1 तसेच हिंगोलीत 12.6 मिमी अशी जिल्हानिहाय पावसाची नोंद झाली आहे. जायकवाडी धरणात 99.45 टक्के पाणी साठा आहे. मोठ्या धरणात पूर्ण क्षमतेने पाणीसाठा झाला असून काही धरणांतून अजूनही विसर्ग सुरु आहे.
इतर बातम्या-
Aurangabad: जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन स्थळे खुली, 10 ऑक्टोबरपासून सर्व वयोगटातील नागरिकांना प्रवेश
औरंगाबाद शहरात दोन देवींच्या मंदिरात कोरोना चाचणी, मोफत लसीकरणाचीही सोय, वाचा कुठे?