Ind vs Aus: सिडनी टेस्टपूर्वी ऑस्ट्रेलियाला झटका, भारताविरोधात 20 विकेट घेणारा गोलंदाज संघाबाहेर
भारताविरुद्धच्या सिडनी कसोटीपूर्वी ऑस्ट्रेलियन संघाला मोठा झटका बसला आहे.
सिडनी : भारताविरुद्धच्या (India) सिडनी कसोटीपूर्वी (Sydney Test) ऑस्ट्रेलियन संघाला (Australian Team) मोठा झटका बसला आहे. ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज जेम्स पॅटिंसन (James Pattinson) दुखापतीच्या कारणाने सिडनी कसोटीमधून बाहेर पडला आहे. सोमवारी (4 जानेवारी) पॅटिंसन त्याच्या घरात पडला, त्यात त्याला दुखापत झाली आहे. त्यामुळे तो तिसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर झाला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये 7 जानेवारीपासून तिसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार असून हा सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर खेळवला जाणार आहे. दोन्ही संघ आज मेलबर्नहून सिडनीला रवाना होणार आहेत. (Ind vs Aus: Fast Bowler James Pattinson Ruled Out Of Sydney Test)
मेलबर्न कसोटी सामन्यानंतर ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने पॅटिंसनला सुट्टी दिली होती. त्यामुळे तो त्याच्या घरी गेला होता. परंतु रविवारी तो त्याच्या घरात पडला. त्यात त्याच्या बरगडीला दुखापत झाली आहे. त्यामुळे तो सिडनी टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियन स्क्वॉडचा हिस्सा बनू शकत नाही. दरम्यान ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने पॅटिंसनच्या जागी कोणत्याही नव्या गोलंदाजाचा संघात समावेश केलेला नाही. कारण त्यांच्याकडे मायकल नेसर आणि शॉन अॅबटच्या रुपाने दोन रिझर्व्ह गोलंदाज आहेत.
मालिकेत एकही सामना खेळला नाही
पॅटिंसनचा या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये अंतिम 11 जणांच्या संघात समावेश करण्यात आला नव्हता. तिसऱ्या कसोटी सामन्यात त्याच्या खेळण्याच्या आशा कमीच होत्या. परंतु ऑस्ट्रेलियन संघातील प्रमुख जलदगती गोलंदाज मिचेल स्टार्क, पॅट कमिंस आणि जॉश हेजलवुड यांच्यापैकी कोणालाही दुखापत झाली असती, तर त्याच्या जागी पॅटिंसनलाच संधी मिळाली असती.
भारताविरुद्ध चांगले रेकॉर्ड्स
जेम्स पॅटिंसनने आतापर्यंत 21 कसोटी सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. त्यामध्ये त्याने 26 च्या सरासरीने आणि 49 च्या स्ट्राईक रेटने 81 विकेट्स मिळवल्या आहेत. भारताविरुद्ध पॅटिंसनचा परफॉर्मन्स चांगला आहे. भारताविरुद्ध त्याने 5 कसोटी सामन्यांमध्ये 20 विकेट्स मिळवल्या आहेत.
सिडनीत कांटे की टक्कर
चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकला आहे. उभय संघांमध्ये अॅडलेड येथे पहिला कसोटी सामना खेळवण्यात आला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 8 विकेट राखून भारताचा पराभव केला होता. या सामन्यातील दुसऱ्या डावात भारतीय संघ अवघ्या 36 धावांवर ऑल आऊट झाला होता. त्यानंतर मेलबर्न येथे खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर 8 विकेटने मात केली होती. दरम्यान सिडनीनंतर दोन्ही संघ ब्रिस्बेनला जातील. या मैदानावर 15 जानेवारीपासून चौथा आणि शेवटचा कसोटी सामना खेळवला जाणार आहे.
संबंधित बातम्या
सिडनी कसोटीत रोहित शर्मा भारतीय संघाचं नेतृत्व करणार? निवड समितीचा महत्त्वपूर्ण निर्णय
उमेश यादव कसोटी मालिकेतून बाहेर, युवा यॉर्कर किंगजी टीम इंडियात निवड
(Ind vs Aus: Fast Bowler James Pattinson Ruled Out Of Sydney Test)