कोरोना उपचारात व्हेंटिलेटरची कमतरता, नौदलाकडून एकाचवेळी 6 रुग्णांसाठी ऑक्सिजन सिलेंडर विकसित
रुग्णांवर उपचारासाठी व्हेंटिलेटर महत्त्वाचे ठरत आहेत. मात्र, त्याचा तुटवडा आहे. यावर भारतीय नौदलाने अनोखा ऑक्सिजन सिलिंडर विकसित केला आहे (Indian Navy innovate Oxygen Cylinder amid Corona).
नवी दिल्ली : जगभरात प्रचंड वेगाने संसर्ग झालेला कोरोना विषाणू हजारो लोकांचे बळी घेत आहे. कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. भारतात 1300 हून अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यापैकी 32 जणांचा जीव गेला आहे. अशास्थितीत रुग्णांवर उपचारासाठी व्हेंटिलेटर महत्त्वाचे ठरत आहेत. मात्र, त्याचा तुटवडा आहे. यावर भारतीय नौदलाने अनोखा ऑक्सिजन सिलिंडर विकसित केला आहे (Indian Navy innovate Oxygen Cylinder amid Corona).
भारतीय नौदलाच्या विशाखापट्टनम डॉकयार्डमध्ये पोर्टेबल मल्टी-फीड ऑक्सिजन मॅनिफोल्डचं (MOM) डिझाईन तयार करण्यात आलं आहे. नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग करुन यात एका सिलिंडरवरच 6 रुग्णांना ऑक्सिजन पुरवता येणार आहे. कोरोना विषाणूमुळे अनेक रुग्णांची श्वसनसंस्था निकामी होत आहे. श्वास न घेऊ शकल्याने अनेक रुग्णांचे प्राणही गेले आहेत. त्यामुळेच अशा रुग्णांच्या उपचारात व्हेंटिलेटरची प्रचंड गरज आहे. मात्र, रुग्णालयांमध्ये एका सिलेंडरवर केवळ एकाच रुग्णाला ऑक्सिजन घेता येतो. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वाढत असताना उपलब्ध सिलेंडर अगदीच तोकडे पडण्याची शक्यता आहे.
तज्ज्ञांच्या अंदाजानुसार कोरोना व्हायरसने बाधित रुग्णांमध्ये जवळपास 5 ते 8 टक्के रुग्णांना व्हेंटिलेटरची गरज लागते. मात्र, सध्याच्या संसर्गाच्या काळात ही ऑक्सिजनची आवश्यकता असणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असेल. आतापर्यंत रुग्णालयांमध्ये असलेली संसाधने दाखल रुग्णांसाठी वापरण्यात आली आहेत. मात्र, नव्याने येणाऱ्या रुग्णांच्या उपचाराचा गंभीर प्रश्न तयार होण्याचा धोका आहे.
विशाखापट्टनम येथील नौदलाच्या डॉकयार्डमध्ये या नव्या डिझाईनची प्राथमिक चाचणी झाली आहे. यानंतर नौदलाने आयएनएचएस कल्याणी रुग्णालयात याचं परिक्षण केलं आहे. यात या डिझाईनचा केवळ 30 मिनिटांमध्ये कोठेही नेता येणारा सेटअप यशस्वीपणे करता आल्याचं समोर आलं.
या नव्या डिझाईनची चाचणी यशस्वी झाल्यानंतर असे 10 पोर्टेबल MOM तयार करण्यात येत आहेत. यात दोन्ही बाजूने 6 रुग्णांना ऑक्सिजन देण्याची व्यवस्था असेल. यामुळे एकाचवेळी 120 रुग्णांना ऑक्सिजन पुरवता येईल.
संबंधित बातम्या :
राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 237 वर, मुंबई शंभरीच्या उंबरठ्यावर, धाकधूक वाढली
केवळ महिन्याचा नको, माझा वर्षाचा पगार घ्या, ‘कोरोना’ लढ्यासाठी आव्हाडांचा सढळ हात
Lock Down | मंगल कार्यालयाचे अॅडव्हान्स परत द्या, प्रशासनाचे आदेश, लॉकडाऊनमुळे लग्न लांबली
सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन कपातीबाबत अफवा पसरवू नका, रोहित पवारांचं आवाहन
Indian Navy innovate Oxygen Cylinder amid Corona