सतेज पाटलांच्या हाती स्टिअरिंग, कोल्हापुरात काँग्रेसची ट्रॅक्टर रॅली, थोरात, पृथ्वीराज चव्हाणांची हजेरी
केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात देशभरातील शेतकऱ्यांत असंतोष आहे. हा कायदा लागू केल्यापासून काँग्रेससह मित्रपक्ष सातत्याने त्याचा विरोध करत आहेत
कोल्हापूर : केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात देशभरातील शेतकऱ्यांत असंतोष आहे. हा कायदा लागू केल्यापासून काँग्रेससह मित्रपक्ष सातत्याने त्याचा विरोध करत आहेत. काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी या कायद्याविरोधात पंजाबमध्ये ट्रॅक्टर रॅली काढली होती. अशीच ट्रॅक्टर रॅली कोल्हापुरात सुरु आहे. (Kolhapur : Congress leader Satej Patil Organised Tractor rally against central government’s new agriculture law)
गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या नियोजनात सुरु असलेल्या या ट्रॅक्टर रॅलीमध्ये काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची उपस्थिती आहे. निर्माण चौक येथून या रॅलीला सुरुवात झाली असून दसरा चौक येथे रॅलीचा शेवट होईल. दरम्यान सतेज पाटलांनी ट्रॅक्टरचं स्टिअरिंग स्वतःच्या हाती घेतलं असून मंत्री बाळासाहेब थोरात त्यांच्यासोबत बसल्याचे पाहायला मिळाले.
हे विधेयक महाराष्ट्रात कोणत्याही परिस्थितीत लागू होऊ देणार नाही, अशी भूमिका राज्यातील काँग्रेस नेत्यांनी यापूर्वीच घेतली आहे. काही दिवसांपूर्वी एका पत्रकार परिषदेत बोलताना महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले होते की, “कृषी विधेयकाला आम्ही विरोध केला आहे. त्याविरोधात आम्ही आंदोलनदेखील करत आहोत. या विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेसनेदेखील विरोध केला आहे. शिवसेनेचं मतदेखील तेच आहे. कोणत्याही परिस्थितीत हा कायदा लागू होऊ नये, याची आम्ही काळजी घेऊ”.
कायद्याबाबत काँग्रेसची भूमिका काय?
“केंद्राचा नवा कायदा कृषी उत्पन्न बाजार समितीला संपवणारा आहे. नव्या कायद्यात व्यापाऱ्याला मुक्तपणे परवानगी देण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य किंमत मिळेल याची हमी या कायद्यात देण्यात आलेली नाही, ती हमी कृषी उत्पन्न बाजार समितींची होती. तसेच आधारभूत किंमतीत धान्य खरेदीत कृषी उत्पन्न बाजार समितीची महत्त्वाची भूमिका होती. केंद्राच्या कृषी कायद्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती संपेल. त्याचबरोबर आधारभूत किंमत मिळवण्यासाठी जी व्यवस्था निर्माण केली आहे तीदेखील संपून जाईल”, असे थोरात यांनी सांगितले आहे.
LIVE: केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी कायद्यांविरोधात कोल्हापूर येथे भव्य ट्रॅक्टर रॅली https://t.co/rTz3gyTqWM
— Satej (Bunty) D.Patil (@satejp) November 5, 2020
राज्य सरकारचा सावध पवित्रा
केंद्र सरकारने कृषीविषयक जे कायदे केले आहेत, त्यासंदर्भात राज्य सरकारने सावध पवित्रा घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या कायद्यांना थेट विरोध केलेला नाही किंवा स्वीकारलेले देखील नाहीत.
‘केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी धोरणासंदर्भात अभ्यास सुरू आहे. तसंच त्यासाठी राज्यातल्या विविध शेतकरी संघटनांशी आम्ही बोलत आहोत. सर्व शेतकरी संघटनांशी बोलून पुढील निर्णय घेतला जाईल. या कृषी कायद्यांचे फायदे काय आहेत? त्याचे आपल्याला होणारे तोटे काय आहेत? याबाबत अभ्यास सुरू असून सदर कायद्यांबाबत लोकांकडून काही सूचनादेखील येत आहेत. यातील काही बाबींवर शेतकरी संघटनांचा आक्षेप आहे. त्यामुळे कृषी कायद्यांच्या अनुषंगाने राज्यातील विविध शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींशी बोलून, त्याचा पूर्ण अभ्यास करून निर्णय घेतला जाईल’, असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.
संबंधित बातम्या
…तर शेतकऱ्यांच्या पायावर धोंडा पाडणारं कृषी धोरण स्वीकारणार नाही; मुख्यमंत्र्यांचा इशारा
कृषी विधेयक महाराष्ट्रात लागू होणार नाही, याची काळजी घेऊ : बाळासाहेब थोरात
केंद्राचा कृषी कायदा राज्यात नको, महाराष्ट्र सरकारनं नवा कायदा करावा: आशिष देशमुख
काँग्रेस सत्तेत येताच तिन्ही कृषी कायदे रद्द करणार, राहुल गांधी यांची घोषणा
(Kolhapur : Congress leader Satej Patil Organised Tractor rally against central government’s new agriculture law)