Kunal Kamra | अर्णवच्या सुटकेनंतर खोचक ट्विट, कुणाल कामरावर अवमानना खटला दाखल करण्याची मागणी
अर्णव गोस्वामी यांची सुटका झाल्यानंतर कुणाल कामराने सोशल मीडियावर खोचक ट्विट करत या प्रकरणावर मार्मिक टीका केली होती.
मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णव गोस्वामी (Arnav Goswami) आणि त्यांच्या सह अन्य आरोपींची अंतरिम जामिनावर सुटका करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी (11 नोव्हेंबर) दिले होते. या आदेशानंतर अर्णव गोस्वामी यांना तुरुंगातून सोडण्यात आले. अर्णव गोस्वामीच्या सुटके नंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. यातच सदर प्रकरणावर स्टँडअप कॉमेडीयन कुणाल कामराने (Kunal Kamra) देखील खोचक ट्विट केले होते. यानंतर वकील रिझवान सिद्दीकी यांनी देशाच्या अॅटर्नी जनरल यांनी पत्र लिहीत अवमानना खटला दाखल करण्याची मागणी केली आहे (Lawyer seeks contempt case against Kunal Kamra over his tweets on SC’s Arnav Goswami verdict).
अर्णव गोस्वामी यांची सुटका झाल्यानंतर कुणाल कामराने सोशल मीडियावर खोचक ट्विट करत या प्रकरणावर मार्मिक टीका केली होती. या ट्विटमुळे आता कुणाल कामरा वादात अडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कुणाल कामराचे ट्विट
‘ज्या वेगाने सर्वोच्च न्यायालयाने या ‘राष्ट्रीय चर्चित’ मुद्द्यावर सुनावणी केली, त्यावरून आता महात्मा गांधींचा फोटो हरीश साळवेंच्या फोटोशी बदलण्याची वेळ आहे’, असे ट्विट कुणाल कामराने केले होते.
The pace at which the Supreme Court operates in matters of “National Interests” it’s time we replace Mahatma Gandhi’s photo with Harish Salve’s photo…
— Kunal Kamra (@kunalkamra88) November 11, 2020
इतकेच नव्हेतर, या प्रकरणावर आणखी एक ट्विट करत कुणाल म्हणाला, ‘डीवाय चंद्रचूड एखाद्या फ्लाईट अटेंडेंट प्रमाणे आहेत, जे प्रथम श्रेणीतील प्रवाशांना शॅम्पेन ऑफर करतात, कारण ते फास्ट ट्रॅक आहेत. सामान्य माणसांना आपण यात बसू की नाही हे देखील माहित नाही. त्यामुळे त्यांना हे मिळण्याची शक्यताच नाही’, अशा आशयाचे दुसरे ट्विट केले आहे.
DY Chandrachud is a flight attendant serving champagne to first class passengers after they’re fast tracked through, while commoners don’t know if they’ll ever be boarded or seated, let alone served. *Justice*
— Kunal Kamra (@kunalkamra88) November 11, 2020
कुणाल कामराच्या या ट्विटमुळे न्यायालयाचा अवमान झाल्याचे बोलले जात आहे. तसेच, न्यायालयाच्या निर्णयाचा मान न ठेवता त्याची खिल्ली उडवल्याबद्दल कुणालवर खटला दाखल करण्यात यावा, अशी मागणी रिझवान सिद्दीकी यांनी केली आहे (Lawyer seeks contempt case against Kunal Kamra over his tweets on SC’s Arnav Goswami verdict).
कुणाल कामराभोवती वादांचे वलय
स्टँडअप कॉमेडीयन कुणाल कामराची वादात अडकण्याची ही पहिली वेळ नाही. या आधीही कुणाल कामराने इंडिगो विमानाने मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या विमानात रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णव गोस्वामी यांच्या जवळ जाऊन, त्यांच्यावर टीका केली होती. कुणाल कामराने त्यावेळी अर्णव गोस्वामींना काही अपमानास्पद प्रश्न विचारले होते. त्यानंतर हा व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला होता. या वादानंतर इंडिगो विमान कंपनीने कुणालवर 6 महिन्यांची प्रवास बंदी लादली होती.
इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक (53) आणि त्यांची आई कुमुद नाईक यांनी अलिबागमधील काविर या ठिकाणच्या फार्महाऊसवर 5 मे 2018 रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणी 4 नोव्हेंबरला अर्णव गोस्वामी यांना मुंबई पोलिसांनी अटक केली होती. मुंबई हायकोर्टाकडून जामीन न मिळाल्याने अर्णव गोस्वामींनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर करत अर्णव गोस्वामींची सुटका केली आहे.
(Lawyer seeks contempt case against Kunal Kamra over his tweets on SC’s Arnav Goswami verdict)