काश्मीर सोडा, मुजफ्फराबाद वाचवा, इम्रान खानला घरचा आहेर
पंतप्रधान मोदींनी काश्मीर हिसकावून घेतलं आणि आपले पंतप्रधान झोपेतच राहिले. अगोदर आपलं धोरण होतं की श्रीनगर कसं मिळवायचं. पण आता मुजफ्फराबाद (पाकव्याप्त काश्मीर) वाचवणंही कठीण झालंय, अशा शब्दात भुट्टो (Bilawal Bhutto Zardari) यांनी इम्रान खान यांच्यावर टीका केली.
इस्लामाबाद : काश्मीर प्रश्नावर जगभरातून प्रतिसाद न मिळाल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना आता घरचा आहेर मिळालाय. पाकिस्तान पीपल्स पार्टीचे प्रमुख बिलावल भुट्टो (Bilawal Bhutto Zardari) यांनी इम्रान खान यांच्यावर सडकून टीका केली. पंतप्रधान मोदींनी काश्मीर हिसकावून घेतलं आणि आपले पंतप्रधान झोपेतच राहिले. अगोदर आपलं धोरण होतं की श्रीनगर कसं मिळवायचं. पण आता मुजफ्फराबाद (पाकव्याप्त काश्मीर) वाचवणंही कठीण झालंय, अशा शब्दात भुट्टो (Bilawal Bhutto Zardari) यांनी इम्रान खान यांच्यावर टीका केली.
इम्रान खान नरेंद्र मोदींसमोर अवाक्षरही काढत नाही, मांजर बनून राहतात, असा घणाघातही भुट्टो यांनी केला. इम्रान खान यांना पाकिस्तानच्या जनतेने नव्हे, तर काही लोकांनी कठपुतळी बनून सत्तेत बसवलंय. इम्रान खान नेतृत्त्व करण्यात असक्षम आहे. हे सरकार विरोधकांच्या मागेमागे चालतं. इम्रान खान यांनी नेतृत्त्व करावं, अशी आमची इच्छा आहे. पण ते फक्त त्यांच्या निवडकर्त्यांना खुश करतात. जनता महागाईच्या त्सुनामीत बुडाली आहे आणि काश्मीरही आपल्या हातून गेलंय, असं भुट्टो म्हणाले.
काश्मीर प्रश्नावर भारताची भूमिका काय आहे हे इम्रान खानला माहित होतं. भाजपच्या जाहिरनाम्यात हा मुद्दा होता. जर ही गोष्ट इम्रान खान यांना माहित होती, तर ती त्यांनी जनतेपासून का लपवली? याबाबत आम्हाला का सांगितलं नाही? स्वतःच्या फायद्यासाठी जेव्हा राजकारण केलं जातं तेव्हा अशीच परिस्थिती येते, असं म्हणत भुट्टो यांनी इम्रान खान यांच्यावर जोरदार टीकाही केली.
मोदींना दुसऱ्या देशात सन्मान दिला जातोय आणि तुम्ही विचारता की त्यांनी काश्मीरविषयी असं का केलं? तुम्ही याअगोदर जगाचा दौरा केला नाही, कोणतीही तयारी नव्हती. हे पाकिस्तानच्या परराष्ट्र धोरणाचं मोठं अपयश आहे. मी काय करु असं संसदेत उभा राहून सांगा. परिस्थिती खराब करण्यासाठी तुम्ही मरियम शरीफ यांना अटक करता, मी पीओकेला पोहोचतो तेव्हा तुम्ही साहिबांना अटक करता, असंही भुट्टो म्हणाले.
बिलावल भुट्टो हे पाकिस्तानच्या सर्वात मोठ्या राजकीय घराण्याचे चिरंजीव आहेत. त्यांच्या आई बेनजीर भुट्टो या पाकिस्तानच्या पंतप्रधान होत्या, तर वडील असिफ अली झरदारी हे पाकिस्तानचे राष्ट्रपती होते. आजोबा झुलफीकर अली भुट्टो हे पाकिस्तानचे राष्ट्रपती आणि पंतप्रधानही राहिले आहेत.