President Election: राष्ट्रपती पदासाठी भाजपविरोधी पक्षांची मोर्चेबांधणी! ममता बॅनर्जींचा पुन्हा खेला होबे; 15 जून रोजी नवी दिल्लीत बैठक
सर्वच आघाडयांवर यशाची पायदानं चढणा-या भाजपाला रोखण्याचे प्रयत्न तोकडे पडत असतानाच बंगालच्या वाघिणीने राष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा वरचष्मा रहावा यासाठी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विरोधकांच्या एकोप्यासाठी पुढाकार घेतला आहे.
नवी दिल्लीः भाजपाचा यशाचा चौफेर उधळलेला वारु रोखण्यासाठी विरोधकांनी कंबर कसली आहे. वरिष्ठ सभागृह राज्यसभा निवडणुकानंतर उसंत न घेता राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी (President Election) सत्ताधारी आणि विरोधी गटांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. दोन्ही गटांनी अद्यापही त्यांच्या उमेदवारांच्या नावाची घोषणा केली नसली तरी राष्ट्रपती निवडणुकीसाठी अटीतटीचा सामना रंगण्याची चिन्हं आहेत. घोडा और मैदान आमने-सामने असल्याने बंगालच्या वाघिणीने पुढाकार घेत, खेला होबे चा नारा दिला आहे. राष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांची (Opposition Leader) मुठ बांधण्यासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी पुढाकार घेतला आहे. येत्या 15 जून रोजी त्यांनी उजव्या आघाडीला टक्कर देण्यासाठी डाव्यांसह काँग्रेस आणि समविचारी पक्षांना आवतान धाडले आहे. त्यासाठी त्यांनी पक्ष प्रमुखांना पत्र (Letter) पाठविले आहे आणि बैठकीचे निमंत्रण दिले आहेत. त्यामुळे राष्ट्रपती पदाची निवडणूक ही चुरशीची होणार हे स्पष्टच झाले आहे. राष्ट्रपती निवडणूक 18 जुलै रोजी होत आहे. तर या निवडणुकीचा निकाल 21 जुलै रोजी जाहीर होईल.
Our hon’ble chairperson @MamataOfficial calls upon all progressive opposition forces to meet and deliberate on the future course of action keeping the Presidential elections in sight; at the Constitution Club, New Delhi on the 15th of June 2022 at 3 PM. pic.twitter.com/nrupJSSbT8
हे सुद्धा वाचा— All India Trinamool Congress (@AITCofficial) June 11, 2022
22 प्रमुख नेत्यांना एकजुटीचे आवाहन
भारताच्या पहिल्या नागरिकाची निवड करण्यासाठी निवडणूक होते. आता ही निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यासाठी ममता बॅनर्जी यांनी कंबर कसली आहे. विरोधकांन एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. नवी दिल्लीतील कॉन्सिटयुशन क्लबमध्ये भाजपाविरोधकांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीसाठी तृणमूल काँग्रेसने देशातील प्रमुख नेत्यांना पत्र पाठविले आहे. त्यात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भागवत मान, झारखंडचे हेमंत सोरेन, ओडिशाचे नवीन पटनायक, तेलंगणाचे के. चंद्रशेखर राव, तामिळनाडूचे एम के स्टॅलिन, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह एकूण 22 प्रमुख नेत्यांना संयुक्त बैठकीत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
राष्ट्रपती पदासाठी 18 जुलै रोजी मतदान प्रक्रिया पूर्ण होईल. या निवडणुकीत इलेक्टोरल कॉलेजचे 4,809 सदस्य, खासदार आणि आमदार त्यांच्या मतदानाचा हक्क बजावतील. राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या उत्तराधिका-याची घोषणा 21 जुलै रोजी करण्यात येईल. सध्याच्या राष्ट्रपतींचा कार्यकाळ 24 जुलै 2022 रोजी संपत आहे.
या नेत्यांना बैठकीचे आमंत्रण
फारूक अब्दुल्ला ( अध्यक्ष, जेकेएनसी) महबूबा मुफ्ती (अध्यक्ष, पीडीपी) अरविंद केजरीवाल (मुख्यमंत्री, दिल्ली ) भगवंत सिंह मान (मुख्यमंत्री, पंजाब) एस सुखबीर सिंह बादल (अध्यक्ष, शिरोमणि अकाली दल ) हेमंत सोरेन ( मुख्यमंत्री, झारखंड) अखिलेश यादव (अध्यक्ष, समाजवादी पक्ष) लालू प्रसाद यादव (अध्यक्ष, राजद ) जयंत चौधरी (राष्ट्रीय अध्यक्ष, रालोद) नवीन पटनायक (मुख्यमंत्री,ओडिशा) के चंद्रशेखर राव (मुख्यमंत्री, तेलंगणा) उद्धव ठाकरे (मुख्यमंत्री, महाराष्ट्र) एच. डी. कुमारस्वामी (कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री) पिनाराई विजयन( मुख्यमंत्री, केरळ ) थिरु एमके स्टालिन (मुख्यमंत्री, तमिलनाडू) पवन चामलिंग (अध्यक्ष, सिक्किम डेमोक्रेटिक फ्रंट) के एम कादर मोहिदीन ( अध्यक्ष, आईयूएमएल) डी. राजा ( महासचिव, भाकपा) सीताराम येचुरी (महासचिव, सीपीआईएम) सोनिया गांधी (अध्यक्ष, काँग्रेस ) शरद पवार (अध्यक्ष, राष्ट्रवादी) एच डी देवेगौड़ा ( खासदार, भारताचे माजी पंतप्रधान)