प्रवचनकाराची अनोखी करामत, गावातून विवाहितेलाच पळवलं
भागवत सप्ताहासाठी आलेल्या महाराजाने चक्क गावातील एका विवाहित महिलेला पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकार भंडाऱ्यात घडला. भंडारा तालुक्यातील मोहदूरा येथे बुधवारी हा विचित्र प्रकार घडला.
भंडारा : भागवत सप्ताहासाठी आलेल्या महाराजाने चक्क गावातील एका विवाहित महिलेला पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकार भंडाऱ्यात घडला. भंडारा तालुक्यातील मोहदूरा येथे बुधवारी हा विचित्र प्रकार घडला (Maharaj Run With Married Woman). या महाराजाचं नाव दिनेशचंद्र मोहतुरे आहे. तो सावनेर तालुक्यातील कुबाडा येथील रहिवासी आहे. जीवनाची योग्य दिशा आपल्या प्रवचनातून सांगणाऱ्या महाराजानेच विवाहित महिलेला पळवल्याने संपूर्ण जिल्ह्यात याची चर्चा होत आहे (Maharaj Run With Married Woman).
दरवर्षीप्रमाणे मोहदूरा येथे 27 जानेवारी ते 3 फेब्रुवारीपर्यंत भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. भागवत करण्यासाठी सावनेरच्या दिनेशचंद्र मोहतुरे या तरुण महाराजाला बोलवण्यात आलं होतं. भागवत सप्ताहादरम्यान, या महाराजाने सात दिवस प्रवचनातून आध्यात्मतेचे बाळकडू भाविकांना पाजले. मात्र, भागवत सप्ताह संपताच त्याने गावातीलच एका विवाहित महिलेला पळवून नेले. या महिलेला एक पाच वर्षांची मुलगीही आहे.
दिनेशचंद्र मोहतुरे महाराज हा गेल्या वर्षीही मोहदूरा येथे प्रवचनासाठी आला होता. त्यादरम्यान, त्याचे गावातीलच एका तरुण विवाहित महिलेशी सूत जुळले. त्याने महिलेच्या कुटुंबियांशीही जवळीक निर्माण केली. त्याने तिच्या घरी मुक्कामही केला होता, अशी माहिती आहे. या महाराजाच्या गोडगोड बोलण्याने गावकऱ्यांना भुरळ घातली आणि या वर्षीही गावकऱ्यांनी या महाराजाला भागवत सप्ताहासाठी आमंत्रित केले.
गेल्या 3 फेब्रुवारीला भागवत सप्ताहाचा समारोप झाला. त्यानंतर हा महाराज त्याच्या गावी निघून गेला. दोन दिवसांनी म्हणजेच 5 फेब्रुवारीला महाराजाचा एक माणून दुचाकीसह गावात दाखल झाला. त्याने संबंधित महिलेच्या घरासमोर दुचाकी थांबवली. महिला घरातून निघाली आणि त्या दुचाकीवर बसून निघून गेली. रात्री पत्नी घरात नसल्याचं पाहून पती आणि सासऱ्यांनी तिची शोधाशोध केली. घरच्यांना या दोघांच्या संबंधाची कल्पना होती, त्यामुळे त्यांनी लगेच भंडारा पोलिसांत तक्रार केली.
भंडारा पोलिसांनी महिला बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवून तपासासाठी महाराजाच्या गावी धाव घेतली. परंतु, तिथे कुणीही आढळून आलं नाही. पोलीस या दोघांचा तपास घेत आहेत. या महाराजाचे याआधीही तीन लग्न झाले आहे, मात्र त्याच्या स्वभावामुळे त्याच्या तीनही बायका त्याला सोडून निघून गेल्याची माहिती आहे.