मोठी बातमी: एकनाथ खडसे आठवडाभरापासून बॉम्बे रुग्णालयात, प्रकृती स्थिर
Eknath Khadse | मूत्रमार्गाच्या संसर्गामुळे एकनाथ खडसे यांना रुग्णालयात दाखल करावे लागले होते. सध्या एकनाथ खडसे यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या आठवडाभरापासून ते बॉम्बे रुग्णालयात उपचार घेत आहेत. मूत्रमार्गाच्या संसर्गामुळे एकनाथ खडसे यांना रुग्णालयात दाखल करावे लागले होते. सध्या एकनाथ खडसे यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे आणि त्यांचे कुटुंबीय सक्तवसुली संचलनालयाच्या (ईडी) चौकशीच्या फेऱ्यात सापडले आहे. एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना जुलै महिन्यात ईडीने ताब्यात घेतले होते. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात गिरीश चौधरी यांना अटक करण्यात आली आहे. तर एकनाथ खडसे हेदेखील ‘ईडी’च्या चौकशीला सामोरे गेले होते.
एकनाथ खडसेंवर अटकेची टांगती तलवार?
माझ्यामागे ईडी लावली तर मी सीडी लावेन, असा इशारा एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी प्रवेशावेळी दिला होता. त्यामुळे ईडीची चौकशी लागल्यानंतर एकनाथ खडसे काय करतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. भोसरी एमआयडीसीतील जमीन गैरव्यवहार प्रकरणी ईडीचा तपास हा योग्य दिशेने सुरु आहे. गिरीश चौधरी यांच्या अटकेनंतर आता स्वतः एकनाथ खडसे आणि त्यांची पत्नी मंदाकिनी खडसे यांनाही अटक होण्याची शक्यता अॅडव्होकेट असीम सरोदे यांनी व्यक्त केली होती.
ईडीच्या चौकशीसाठी सहकार्य करायला तयार: एकनाथ खडसे
ईडीकडून एकनाथ खडसे यांचीही तब्बल 9 तास कसून चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर एकनाथ खडसे यांच्या वकिलांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना खडसे ईडीला सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार असल्याचे सांगितले होते. चौकशीवेळी आम्ही सर्व प्रकारचं सहकार्य दिलंय. या चौकशीत संपत्तीची संपूर्ण चौकशी करण्यात आलीय. ईडीने स्टेटमेंट्सची सत्यता तपासलीय. याशिवाय ईडीला जे कागदपत्रे हवी होती ती सगळी दिलीत. ईडीला आणखी काही कागदपत्रे हवी होती ती कागदपत्रे 10 दिवसात जमा करण्यास सांगितलं आहे. ईडीला जेव्हा चौकशीसाठी आमची गरज लागेल तेव्हा तेव्हा आम्ही यायला तयार आहोत, असे एकनाथ खडसे यांच्या वकिलांनी म्हटले होते.
संबंधित बातम्या :
एकनाथ खडसे सीडी कधी बाहेर काढतायत, याची वाट पाहतोय: राज ठाकरे
VIDEO: खडसे चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात, फडणवीस त्यावर नेमकं काय म्हणाले?
“जावयापाठोपाठ एकनाथ खडसे आणि मंदाकिनी खडसेंनाही अटकेची शक्यता”