‘संपूर्ण देशावर एकहाती वर्चस्व गाजवण्याचा भाजपचा प्रयोग अल्पायुषी ठरेल; त्यांची गतही काँग्रेससारखीच होईल’
काही दिवसांपूर्वीच कृषी विधेयकाच्या मुद्द्यावरून अकाली दलाने भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (NDA) बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता.
नवी दिल्ली: भारतात एकाच पक्षाने संपूर्ण देशावर वर्चस्व गाजवण्याची संकल्पना ही आजवर फारशी यशस्वी ठरलेली नाही. अल्पकाळासाठी हा प्रयोग यशस्वी ठरू शकतो. त्यामुळे भविष्यात भाजप पक्षही काँग्रेसप्रमाणे कोसळू शकतो, असे मत अकाली दलाचे नेते सुखबीर सिंग बादल यांनी व्यक्त केले. (Sukhbir Singh Badal criticised BJP)
देशातील प्रमुख पक्ष असलेल्या भाजपने गेल्या काही वर्षांत घटकपक्षांशी बोलण्याची तसदी घेतलेली नाही. भाजपचे केवळ दोन खासदार होते तेव्हापासून अकाली दल आणि शिवसेना राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (NDA) आहेत. परंतु, गेल्या दहा वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकदाही घटकपक्षांशी संवाद साधलेला नाही. या आघाडीची भविष्यातील वाटचाल कशी असेल, याविषयी कधी चर्चाच झाली नाही. एवढेच नव्हे तर नागरिकत्व सुधारणा कायदा आणि अनुच्छेद ३७० रद्द करण्याच्या निर्णयावेळीही अकाली दल आणि शिवसेनेला विश्वासात घेण्यात आले नाही, अशा शब्दांत सुखबीर सिंग बादल यांनी भाजपविषयीची आपली नाराजी व्यक्ती केली.
काही दिवसांपूर्वीच कृषी विधेयकाच्या मुद्द्यावरून अकाली दलाने भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (NDA) बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. या पार्श्वभूमीवर ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत बोलताना भाजपच्या विस्तारवादी भूमिकेवर टीका केली. विविध प्रदेशांतील लोकांच्या आवाजाची दखल घेतल्यामुळे आजवर आपला देश यशस्वी ठरला. प्रादेशिक घटक हे केंद्रीय यंत्रणेचा भाग असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे तुम्ही ज्या क्षणाला एकहाती वर्चस्व गाजवायला सुरुवात करता तेव्हा सर्वकाही कोसळायला सुरुवात होते, असे बादल यांन सांगितले.
यासाठी सुखबीर सिंग बादल यांनी कृषी विधेयकांचे उदाहरण दिले. पंजाबमध्ये देशातील देशातील ५० टक्के अन्नधान्याचे उत्पादन होते. तरीही कृषी विधेयके आणताना आमचे साधे मतही विचारात घेण्यात आले नाही. तुम्ही प्रादेशिक घटकांशी चर्चा न करताच परस्पर वरिष्ठ स्तरावर निर्णय घेऊ लागता, हेच चुकीचे निर्णय घेण्याच्यादृष्टीने टाकलेले पहिले पाऊल असते. भारत हा बहुआयामी देश आहे. एकाच पक्षाने संपूर्ण देशावर वर्चस्व गाजवण्याचा प्रयोग हा फार अल्पकाळासाठी यशस्वी ठरतो. त्यामुळे ज्याप्रमाणे हळूहळू काँग्रेस पक्ष कोसळला, तशीच गत भाजपचीही होऊ शकते, असा इशारा सुखबीर सिंग बादल यांनी दिला.
संबंधित बातम्या:
ना शिवसेना, ना अकाली, पासवानांच्या निधनानंतर NDA जवळपास रिकामी, एकट्या आठवलेंवर भाजपची भिस्त
शेतकर्यांच्या समर्थनात एनडीएबाहेर पडल्याबद्दल आभार, शरद पवारांकडून अकाली दलाचे अभिनंदन
(Sukhbir Singh Badal criticised BJP)