Palkhi Sohala 2020 | तुकोबा- एकनाथांच्या पालख्यांचं प्रस्थान, सोशल डिस्टन्सिंगसह मोजकेच वारकरी
कोरोनाच्या संकटामुळे यंदा पायी वारी सोहळा रद्द करण्यात आली आहे. मात्र सर्व प्रथा परंपरांचे पालन केलं जात (Palkhi Prasthan Sohala 2020) आहे.
पुणे : जगतगुरु संत तुकाराम महाराजांचा 335 वा पालखी प्रस्थान सोहळा यंदा कोरोनाच्या सावटाखाली (Palkhi Prasthan Sohala 2020) साजरा होत आहे. कोरोनाच्या संकटामुळे यंदा पायी वारी सोहळा रद्द करण्यात आला आहे. मात्र सर्व प्रथा परंपरांचे पालन केलं जात आहे. खासदार श्रीरंग बारणे यांच्यासह तहसीलदार आणि मानाच्या 50 वारकऱ्यांच्या उपस्थितीत या सोहळ्याला सुरुवात झाली. सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमांचं पालन करत वारकऱ्यांनी टाळ मृदुगांचा तालावर ठेका धरला.
मोजक्याच वारकऱ्यासोबत ज्ञानोबा तुकोबांच्या जयघोषात देहूनगरी दुमदुमली. मोजके वारी विवेकाची पताका खांद्यावर घेत, वारीची परंपरा जपताना दिसत आहेत.
दरवर्षी इंद्रायणीचा काठ हा लाखो वारकऱ्यांनी गजबलेला असतो. इंद्रायणीत स्नान करत विठूनामाच्या जयघोषात तल्लीन होत असतात. पण वारकऱ्यांनी गजबलेला इंद्रायणीचा घाट यंदा शांत आहे.
कोरोनाच्या सावटामुळे पायी वारी सोहळा होणार नसल्यानं वारकऱ्यांच्या मनात दुःख आहे. मात्र, वारकरी संप्रदाय हा कायम विवेकाची कास जोपासत आला आहे. त्यामुळं यंदा सगुण वारकरी करण्याऐवजी वारकऱ्यांनी निर्गुण वारी करत एक झाड लावून पर्यावरण रक्षण करावं, असं आवाहन सोहळा प्रमुख माणिक महाराज मोरे यांनी केलं आहे.
कोरोनाच्या सावटाखाली होणाऱ्या पालखी प्रस्थान सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आज देहूमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. देहू गावच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. देहूमध्ये कलम 144 लागू करण्यात आलं आहे. मंदिराचंही निर्जंतुकीकरण करण्यात आलं आहे. तसेच कोण कुठे थांबेल याचे मार्किंगही केलं होतं.
संत एकनाथ महाराजांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा
तर संत एकनाथ महाराजांच्या पादुका पालखीचे अध्यात्म नगरी पैठण शहरातून प्रस्थान सोहळा आज पार पडला. कोरोनाच्या सावटाखाली मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत पालखीचे प्रस्थान झाले. दरवर्षी पालखी प्रस्थान सोहळ्याला लाखो भाविकांची उपस्थिती असते.
एकनाथ महाराजांची पालखी समाधी मंदिरात विसावली. या मंदिरात पुढील 18 दिवस पालखीचा मुक्काम राहणार आहे. त्यानंतर आषाढी एकादशीला मोजकेच मानकरी वाहनाने नाथांच्या पादुका पंढरपूरला रवाना होणार आहे.
उद्या ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळा
दरम्यान उद्या (13 जून) ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यास आळंदीतून पालखी प्रस्थान होईल. मंदिरातून पादुकांचं पालखीतून प्रस्थान होणार आहे. मंदिराला प्रदक्षिणा घालून पालखी माऊलींच्या आजोळ घरी जाईल. या सोहळ्यास मंदिर परिसरात केवळ 50 वारकऱ्यांची उपस्थिती बंधनकारक असेल. यानंतर दशमीला पुढील निर्णयानुसार पालखी पंढरपूरला प्रस्थान (Palkhi Prasthan Sohala 2020) करेल.
संबंधित बातम्या :
तुकोबा आणि माऊलींच्या पालख्या सज्ज, 50 वारकऱ्यांसह प्रस्थानास परवानगी
देहू, आळंदी पालखी सोहळ्याबाबत दोन दिवसात निर्णय, पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांची माहिती