पुण्यात तलावाजवळ सोडलेल्या जुळ्या बाळांचे आई-वडील सापडले, प्रेमसंबंधातून बाळांचा जन्म
पुण्यातील पाषाण तलावाजवळ सोडून दिलेल्या जुळ्या बाळांचे आई-वडील सापडले आहेत. या निर्दयी आई-वडिलांनी आठ दिवसांपूर्वी गोठवणाऱ्या थंडीत दोन जुळ्या अभ्रकांना पाषाण तलावाजवळ सोडलं होतं.
पुणे : पुण्यातील पाषाण तलावाजवळ सोडून दिलेल्या जुळ्या बाळांचे आई-वडील सापडले आहेत. या निर्दयी आई-वडिलांनी आठ दिवसांपूर्वी गोठवणाऱ्या थंडीत दोन जुळ्या अभ्रकांना पाषाण तलावाजवळ सोडलं होतं (Twin Babies Found Near Lake). या आई-वडिलांना शोधण्यात चतु:श्रुंगी पोलिसांना यश आलं आहे. प्रेमप्रकरणातून या बाळांचा जन्म झाल्याची माहिती समोर आली आहे. बाळाची आई आणि तिच्या प्रियकराला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. संतोष नागनाथ वाघमारे असं प्रियकराचं नाव आहे (Twin Babies Found Near Lake).
तब्बल आठ दिवसांनंतर या आई-वडिलांना शोधण्यात पोलिसांना यश आलं आहे. हे दोघे वडगाव धायरीमधील रहिवासी आहेत. संबंधित महिला ही विधवा असून ती तिच्या प्रियकरासोबत लिव्ह इन मध्ये राहत होती. तिला आधीच तीन मुली आहेत. त्यानंतर तिला प्रियकाराकडून दोन जुळी मुलं झाली. त्यामुळे या बाळांना तलावाजवळ सोडल्याची माहिती आहे.
पोलिसांच्या प्रयत्नांना यश
चतु:श्रुंगी पोलिसांनी 14 जानेवारीपासूनच या जुळ्या बाळांच्या आई-वडिलांचा शोध घेण्यास सुरुवात केली. पहिल्यांदा त्यांनी शहरातील कुठल्या रुग्णालयात किती जुळ्या मुलांचा जन्म झाला त्याचा तपास केला. त्यानंतर वाकड, हिंजवडी, वडगाव, कात्रज या परिसरातील रुग्णालयांमध्ये शोध घेतला. या दरम्यान, वारजे येथील एका रुग्णालयात जुळ्या मुलांचा जन्ंम झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरुन तपास करत पोलिसांनी त्यांचा पत्ता मिळवला. मात्र, संबंधित व्यक्ती सातत्याने घर बदलत असल्याचं पोलिसांच्या लक्षात आले. त्यानंतर, त्यांच्या मोबाईल लोकेशनवरुन पोलिसांनी या आई आणि तिच्या प्रियकराला ताब्यात घेतले. या प्रकरणातील आई आणि तिचा प्रियकर यांच्या प्रेमसंबंधातून मुलांचा जन्म झाला असून त्यांना त्या बाळांचा सांभाळ करायचा नव्हता. त्यामुळे त्यांनी या दोन्ही बाळांना तालावाजवळ सोडून दिले, अशी माहिती पोलिसांनी दिली.
14 जानेवारीला पाषाण तलावाजवळ जुळी बाळं आढळली
पुण्याच्या पाषाण तलाव परिसरात 14 जानेवारीला सकाळी दोन जुळी बाळं आढळून आली होती. पहिल्यांदा तलाव परिसरात सुरक्षा रक्षकांना ही बाळं सापडली होती. ही बाळं एक दिवसांची असून त्यांना ब्लँकेटमध्ये गुंडाळून तलावाजवळ सोडण्यात आलं होतं. परिसरातील नागरिकांनी त्या भूकेल्या बाळांना दूध पाजलं, त्यानंतर त्यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं.