Rohit Pawar | मा. अजितदादा, प्रतिगामी शक्तींशी… पुतण्याचं काकाला पत्र… रोहित पवार यांनी काय लिहिलंय पत्रात ?
शरद पवार गटाचे तरूण नेते आणि कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांना लिहीलेलं एक पत्र चर्चेत आलं आहे. भाजपचे हैदराबादमधील आमदार टी. राजा यांना कोल्हापूर येथील एका कार्यक्रमासाठि निमंत्रित करण्यात आले आहे. त्याच पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी हे पत्र लिहीलं आहे.
मुंबई | 30 जानेवारी 2024 : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधील फुटीनंतर शरद पवार गट आणि अजित पवार गट यांच्या दरम्यान अनेकदा संघर्ष झाल्याचं पहायला मिळालं आहे. त्यातच आता, शरद पवार गटाचे तरूण नेते आणि कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांना लिहीलेलं एक पत्र चर्चेत आलं आहे. भाजपचे हैदराबादमधील आमदार टी. राजा यांना कोल्हापूर येथील एका कार्यक्रमासाठि निमंत्रित करण्यात आले आहे. मात्र ते प्रक्षोभक द्वेषपूर्ण भाषणांसाठी प्रसिद्ध असल्याने त्यांच्यामुळे कोल्हापूर आणि राज्यातील वातावरण दूषित होऊ शकते, अशी भीती रोहित पवार यांनी या पत्रातून व्यक्त केली आहे. त्यामुळे त्यांचा कार्यक्रम रोखण्याचं साकडं रोहित पवार यांनी अजित पवारांना घातलं आहे.
X (पूर्वीचं ट्विटर) या सोशल मीडिया अकाऊंटवरून त्यांनी अजित पवार यांना एक पत्र लिहीलं आहे. ‘ आदरणीय पवार साहेबांना सोडून प्रतिगामी शक्तींशी संगत केली असली तरी आपल्यातील पुरोगामी विचारांचा दादा अद्यापही तसाच आहे. असं मानून टी राजा यांच्या कार्यक्रमास परवानगी देऊ नये हीआपणास नम्र विनंती’ असे रोहित पवारांनी नमूद केलं आहे.
काय म्हणाले रोहित पवार ?
रोहित पवार यांनी म्हटलं आहे , ‘ मा. अजितदादा, आपण नेहमीच पुरोगामी विचारांना आपल्या जीवनात प्राधान्य दिलं आहे. पुरोगामी विचारांचे उद्गाते शहर आणि महाराष्ट्राच्या सामाजिक न्यायाची वैचारिक राजधानी असलेल्या कोल्हापूर शहरात आपण नुकतंच जाऊनही आलात. कोल्हापूरने नेहमीच महाराष्ट्राला वैचारिक दिशा दिली परंतु याचाच राग मनात धरून प्रतिगामी शक्तींकडून राजर्षी शाहू महाराजांच्या करवीर नगरीवरच वैचारिक आक्रमण करून इथलं वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न होत आहे परंतु कोल्हापूर शहराची स्वतःची एक वैचारिक प्रतिकारशक्ती असल्याने अद्याप तरी प्रतिगामी शक्तींना यश आलेलं नाही.
याच प्रयत्नांचा भाग म्हणून आपल्या प्रक्षोभक द्वेषपूर्ण भाषणांसाठी प्रसिद्ध असलेले आमदार टी राजा यांना कोल्हापूरमध्ये बोलावण्यात आलंय. हे आमदार कोल्हापुरात येऊन इथलं वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करतील म्हणून अशा व्यक्तीचे कार्यक्रम कोल्हापुरसह महाराष्ट्रात कोठेही होऊ नये, अशी पुरोगामी विचारधारा जपणाऱ्या सामान्य कोल्हापूरकरांची इच्छा आहे.
उपमुख्यमंत्री म्हणून या प्रश्नी लक्ष घालावे
दादा, आपण पुरोगामी विचारधारेचे आधारस्तंभ आहात. आदरणीय पवार साहेबांना सोडून प्रतिगामी शक्तींशी संगत केली असली तरी आपल्यातला पुरोगामी विचारांचा दादा अद्यापही तसाच आहे असं मानून टी राजा यांच्या कार्यक्रमास परवानगी देऊ नये ही सामान्य कोल्हापुरकरांच्या वतीने आपणास नम्र विनंती. स्वतःचं अपयश लपविण्यासाठी सत्ता असूनही सामान्यांच्या हिताला प्राधान्य न देता भाजपकडून केवळ महाराष्ट्र धर्म आणि महाराष्ट्राची विचारधारा पुसण्याचं काम केलं जात असल्याने आपण पुरोगामी विचारधारेचे पाईक व उपमुख्यमंत्री म्हणून या प्रश्नी लक्ष घालाल ही अपेक्षा !
मा. अजितदादा, आपण नेहमीच पुरोगामी विचारांना आपल्या जीवनात प्राधान्य दिलं आहे. पुरोगामी विचारांचे उद्गाते शहर आणि महाराष्ट्राच्या सामाजिक न्यायाची वैचारिक राजधानी असलेल्या कोल्हापूर शहरात आपण नुकतंच जाऊनही आलात. कोल्हापूरने नेहमीच महाराष्ट्राला वैचारिक दिशा दिली परंतु याचाच राग… pic.twitter.com/6kZth8Piv3
— Rohit Pawar (@RRPSpeaks) January 30, 2024